Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर ०९, २०११

जन्मदिनाच्या आनंदावर मृत्यूची छाया

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
गोंदिया - एक डिसेंबर रोजी मनोज बिंझाडे यांचा 31 वा वाढदिवस होता. पत्नीने सकाळीच फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पोलिस सेवेत यश येवो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थनाही केली. मात्र, नियतीला त्यांच्या जन्मदिनाचा आनंद मान्य नव्हता. अवघ्या दोन-तीन तासांतच पुन्हा फोन खणखणला आणि पोलिस ठाण्यातून आलेल्या निरोपाने सर्वांच्या काळजाचे तुकडे झाले. मनोज शहीद झाल्याची बातमी कानावर पडली अन्‌ पत्नी अरुणासह कुटुंबीयांनी हंबरडाच फोडला.



देवरी तालुक्‍यातील धमदीटोला-गणूटोलाजवळील जंगलात माओवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मनोज आत्माराम बिंझाडे (वय 31) हा जवान गुरुवारी शहीद झाला. मनोज मूळचे गोंदिया तालुक्‍यातील चांदणीटोला येथील रहिवासी होते. चांदणीटोला हे गाव गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. चार वर्षांपूर्वी मनोज पोलिस सेवेत दाखल झाले. कवलेवाडा येथील अरुणासोबत त्यांनी काही वर्षांपूर्वीच विवाह केला होता. वडील आत्माराम बिंझाडे हे पोलिस मुख्यालयाच्या शेजारीच चप्पल दुरुस्तीचे काम करतात. आई आणि अन्य दोन भावंडे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा जन्म एक डिसेंबर 1980 रोजी झाला. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या मनोजला वायरिंग, जनरेटरचे काम अवगत होते. 29 सप्टेंबर 2007 मध्ये ते गोंदिया पोलिस दलात रुजू झाले. 26 मार्च 2010 रोजी सशस्त्र दूरक्षेत्र गणूटोला येथे नेमणूक झाली. नक्षलविरोधी अभियानात ते उत्कृष्ट दर्जाचे पायलट म्हणून कर्तव्य बजावत होते. बुधवारी (ता. 30) मनोज गावी येऊन गेले. तेथून कवलेवाडा येथे सासरीही गेले. दुसऱ्याच दिवशी एक डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसानिमित्त रजा घ्या, अशी विनंती पत्नी अरुणाने केली. मात्र, ड्यूटीमुळे त्यांना थांबता आले नाही. गुरुवारी वाढदिवसानिमित्त पत्नीने मनोजला फोन केला. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आई आणि वडिलांसोबतही ते बोलले. आपली खुशाली कळविली. मी लवकरच रजा घेऊन गावाकडे येईन, असे आश्‍वासन देत त्यांनी फोन ठेवला. वाढदिवसानिमित्त सर्वत्र आनंद असताना त्याच दिवशी काही विपरीत घडेल, असे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. मात्र, नियतीने आपला खेळ अखेर खेळला. देवरी तालुक्‍यातील गणूटोला येथील आउटपोस्ट चौकीवर कार्यरत मनोज आणि त्यांचे सहकारी शाळेवर लावलेले नक्षलपत्रक काढण्यासाठी गेले होते. यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यात ते जागीच शहीद झाले. या घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात देण्यात आली. ही दु:खद बातमी कानी पडल्यानंतर शहरापासून जवळच राहणाऱ्या चांदणीटोला येथील कुटुंबीयांना धक्काच बसला. मनोजच्या मागे पत्नी अरुणा (वय 25), आई मेहतरीन (वय 50), वडील आत्माराम (वय 55), मोठा भाऊ मयनलाल, लहानभाऊ चैनलाल, विवाहित बहीण सत्यशीला तरवरे असा परिवार आहे.



वडिलांचे स्वप्न

शहीद मनोजचे वडील आत्माराम बिंझाडे हे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या शेजारी चप्पल दुरुस्तीचे काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते खाकीवर्दीतील पोलिसांच्या बुटांना पॉलिश करताना आपलाही मुलगा पोलिस व्हावा, असे त्यांना वाटायचे. मनोजने ते स्वप्न पूर्ण केले. मात्र, बुटांना पॉलिश करीत असतानाच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून मनोज शहीद झाल्याची बातमी कानावर पडली आणि वृद्ध वडिलाच्या काळजाचे तुकडेच झाले. संबंधित बातम्या

गोंदिया जिल्ह्यात पोलिस-माओवाद्यांत चकमक
पोलिस चकमकीत दोन माओवादी ठार
मशानझुरवाच्या जंगलात पोलिस-माओवादी चकमक
खोटी माहिती देऊन साधला गेम
पोलिस- माओवाद्यांच्या चकमकीत एक जवान शहीद, पाच गंभीर



प्रतिक्रिया

On 03/12/2011 09:57 AM amit babhulkar said:

देशासाठी शहीद झालेल्या मनोज बिझांडे यांना सलाम वंदे मातरम

 
manoj binzade

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.