विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
चंद्रपूर/प्रतिनिधी:
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तब्बल ७० ते ८० गावातील २० हजार नागरिकांच्या घरांची शंभर टक्के झडती घेणारे आणि त्यांच्या नातेवाईकांना येण्यास बंदी करणारे पत्र काढणाऱ्या ताडोबा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करून संबंधित परिपत्रक ताबडतोब रद्द करा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
सिंदेवाही तालुक्यातील १७ गावे, चिमूर तालुक्यातील १२ गावे, मूल तालुक्यातील १५ गावे, वरोरा आणि चंद्रपूर तालुक्यातील गावांसह तब्बल २० हजार सामान्य लोकांचे स्वातंत्र्य या परिपत्रकाने धोक्यात आले आहे. या परिपत्रकाच्या आधारे वन अधिकाऱ्यांनी शंभर टक्के घरांची, घरातील पेट्या, आलमाऱ्यांसह सर्व सामानांची झडती घेतल्यास तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना बंदी केल्यास जनतेमध्ये मोठा असंतोष माजेल. लोकांना स्वातंत्र्य आहे की नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. अशा फतव्यामुळे लोक दहशतीखाली असून कारवाईस येणाऱ्या अधिकाऱ्यांची ते डोके फोडतील. यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी शासनाला दिला..
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गावांसाठी काढलेल्या ७० ते ८० गावांपैकी तब्बल १२ गावे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदार संघातील आहेत. वाघांना वाचवण्यासाठी असे फतवे काढल्यास लोकांनी वनक्षेत्रातील पाहुण्यांकडे येऊ नये, अनोळखी लोकांनी येऊ नये हे योग्य नाही. वाघांची शिकार करणे खरोखरच गुन्हा आहे. अशा गुन्हेगारांना कठोर शासन करा मात्र सामान्य जनतेचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका, असे सांगत वडेट्टीवार यांनी सदरील परिपत्रक तातडीने रद्द करण्याची आग्रहाची मागणी केली.
केंद्राने जमीन हस्तांतरण व भूसंपादन कायदा करून सुद्धा राज्य आद्योगिक विभागाने तो स्वीकारायला एवढा उशीर का केला ?आणि आता स्वीकारणार असणार तर तो कायदा अस्तित्वात आल्यापासून आजच्या तारखेपर्यंतचा मोबदला शेतकऱ्यांना सरकार देणार का ? #Monssonsession @INCMaharashtra @NCPspeaks pic.twitter.com/d1S0HxtDlj— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) June 29, 2019
तपासणीदरम्यान सामान्यांना त्रास होणार नाही : प्रवीण
ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरात शिकारीच्या घटना व प्रयत्न उघडकीस आले आहे. भामडेळीत वाघाची शिकार झाली आहे. पळसगावनजिक वाघाची शिकार करण्यात आली. या अनुषंगाने तपासणी सुरू केल्यानंतर कारवा गावाच्या परिसरात शिकारी फासे बेवारस आढळून आले. चोरगाव येथे निलगायीची शिकार झाली. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रयत्न केले जातात. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ५० अन्वये संशयास्पद ठिकाणाची झडती घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने व लोकांना शिकार करण्याच्या प्रयत्नापासून दूर राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबत वनाधिकाऱ्यांना सूचित केले आहे. सर्व घरांची तपासणी करण्यात येणार नाही. मात्र, तपासणी दरम्यान सामान्य लोकांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घेतली जाणार असल्याचे पत्र प्रधान मुख्य वनसंरक्षकांना (वन्यजीव) ताडोबाचे क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांनी पाठविले आहे. .