Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून २९, २०१९

धक्कादायक:विजेच्या खांबाला स्पर्श होताच २० वर्षीय काजलचा मृत्यू

सुरत/गुजरात: 
पावसाळ्यात वीज खांबांना हात लावू नका अशी वारंवार महावितरणकडून सूचना केली जाते, मात्र या सूचनेकडे नागरिक गांभीर्याने घेत नाहीत.या सुचनांकडे दुर्लक्ष झाल्याने सुरत येथे एका 20 वर्षीय काजलचा वीज खांबाला स्पर्श होताच मृत्यू झाला.

काजल छावडा असे या २० वर्षीय तरुणीचे नाव आहे,सुरतच्या पुना परिसरात राहणारे छावडा कुटुंबिय आपली मुलगी लंचसाठी घरी येणार असल्याची वाट बघत होते.मात्र घरी येतांना वाटेतच तिचा दक्षिण गुजरात मंडळाच्या वीज खांबांना स्पर्श झाला आणि सेकंदात तिचा मृत्यू झाला.

शुक्रवारी दिनांक २८ जून रोजी लगबगीने घरी जात असताना २० वर्षीय काजलने चुकून वीजेच्या खांबाला स्पर्श केला, खांबात उतरलेल्या वीजेच्या प्रवाहाने क्षणात होत्याचे नव्हते केले.काजल खांबाला चिकटली आणि क्षणात गतप्राण झाली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार काजल सुरत (गुजरात)मधील कारगिल चौकाजवळ प्रभू दर्शन सोसायटीत राहते. काजल कारगिल चौकाजवळच असणा-या नार्वेद सागर सोसायटीत असलेल्या जरीकाम युनिटमध्ये काम करून कुटुंबाला हातभार लावत होती. दुपारच्या सुट्टीत ती जेवायला घरी जात होती.

बाहेर पाउस सुरु होता,तिने चुकून पोलला हात लावला आणि काजलला करंट लागला.एका मुलगीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण खुप उशीर झाला होता,लोकांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला. एका व्यक्तीने काजलला लाकडी काठीच्या साह्याने खांबापासून बाजूला केले.आरडा ओरडा ऐकून घटनेच्या ठिकाणी आलेल्या वडिलांनी काजलला तातडीने रुग्णालयात हालवले, पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच काजल मृत झाल्याचे घोषित केले.
<

या घटनेनंतर स्थानिकांनी वीज कंपनीच्या विरोधात रोष प्रकट केला. पुना परिसरातले स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले वीज कंपनीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
महावितरण नागपूर रिजन कडून जनतेला सतर्कतेचा ईशारा 

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी 24 तास सुरु असणार्‍या कॉलसेंटर्सचे 1800-102-3435 किंवा 1800-233-3435, 19120, 1912 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे. 

वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना केवळ एकदाच ग्राहक क्रमांक सांगावा लागणार आहे. वीजग्राहकाने कॉल सेंटरमध्ये रजिस्टर्ड केलेल्या तीनपैकी कोणत्याही वैयक्तिक दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांकावरून तक्रार केल्यास फक्त तक्रारीचा तपशील सांगावा लागणार आहे.

 पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करण्यात येतो. अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणार्‍या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. 

याशिवाय विजेच्या खाबांना जनावरे बांधू नयेत, त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

महावितरणची एसएमएस सेवा


वीज यंत्रणा देखभाल व दुरुस्तीसाठी प्रस्तावित वीज खंडित करण्याची (आऊटेज) पुर्वसुचना ग्राहकांना मिळावी सोबतच मीटर रिडींग, वीज देयक, वीजपुरवठा खंडित, बीलभरण्याची मुदत आदीबाबत माहिती देण्यासाठी एसएमएस देण्याची सुविधा महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली असल्याने वीज ग्राहकाने एसएमएस साठी MLANG <ग्राहक क्रमांक> टाईप करून 9225592255 या क्रमांकावर मेसेज पाठवून आपला मोबाईल क्रमांक नोंदवायचा आहे, सोबतच महावितरणचे www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून, महावितरण मोबाईल ॲप वरून अथवा महावितरण कॉल सेंटरच्या 18002333435, 18001023435 किंवा 1912 या क्रमांकावरूनही मोबाईल क्रमांकाची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरच एसएमएस सेवा उपलब्ध होत असल्याने, ग्राहकांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.