दोषी पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
चंद्रपूर/प्रतिनिधी:
पोंभुर्णा नगरपंचायतीअंतर्गत बाजारासाठी आधीच राखीव जागा खरेदी केली असताना परत दोघांची जमीन जास्त भाव देऊन खरेदी करण्यात आली. या व्यवहारात सांत्वना व प्रोत्साहनपर रक्कमेच्या नावाखाली त्यांना चारपटीने मोबदला दिला आहे. त्यामुळे जमीन विक्रीची रक्कम त्यांच्या खात्यात कशाप्रकारे वापरली, याबाबतची चौकशी करून जबाबदार पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी चंद्रपूर प्रेसक्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेत राजू झोडे यांनी केली.
एकीकडे पोंभुर्णा नगरपंचायती अंतर्गत धनदांडग्यांच्या शेतीचा भाव ४० ते ५० लाख रुपये एकर देण्यात आला. तर पोंभुर्णा एमआयडीसीअंतर्गत शेती गेलेल्या शेतकऱ्यांना केवळ ४ लाख रुपये एकर भाव देण्यात येत आहे. एकाच नगरपंचायत क्षेत्रात दोन्ही ठिकाणच्या जमिनी येत असताना यामध्ये मोठी तफावत असून, एमआयडीसीमध्ये शेती गेलेल्या शेतकऱ्यांची यातून थट्टा करण्यात आली आहे. त्यामुळे एमआयडीसीमध्ये शेती जाणाऱ्या शेतकऱ्यांना नगरपंचायत अंतर्गत भावानुसार रक्कम देऊन जमीन खरेदी करण्यात यावी व जाणीवपूर्वक धनदांडग्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी आणि शासनाचा निधी घशात घालण्यासाठी जबाबदार असणाऱ्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या प्रकरणात दोषींवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. पत्रपरिषदेला संपत कोरडे, विजय ढोंगे, रुपेश निमसरकार, प्रशांत उराडे, गुरू भगत, पंचशील तामगाडगे, अविनाश वाळके उपस्थित होते.