चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूरसह संपूर्ण देशात भूजल पातळी खालावत आहे. जमिनीखालील पाणी संपूर्णपणे नष्ट झाले, तर ती पाण्याची पातळी पूर्ववत करण्याकरिता किमान दहा वर्षांच्या कालावधीसाठी पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरविले जाणे गरजेचे आहे. पाण्याचा मन मानेल तसा वापर केला जात असल्याने पाण्याचे स्तर कमी होत चालले आहे. बेसुमार वाढत चालेले नवनवीन इमारतींचे निर्माण, मोठमोठ्या कारखान्यांमध्ये पाण्याचा होणारा अपव्यय, मान्सून मध्ये कमी वृष्टी होणे, जास्त प्रमाणात खोदलेल्या बोरवेल्स ह्या आणि अश्या काही कारणांमुळे जमिनीखालील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. हि खूप गंबीर बाब आहे.
ही विपरीत परिस्थिती बदलण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी एक पर्याय आहे रेन वॉटर हार्व्हेस्टिंगचा, म्हणजेच पाऊस पडत असताना, ते पाणी वाहून न जाऊ देता, ते जमिनीमध्ये जिरेल अशी व्यवस्था करणे. रेन वॉटर हार्व्हेस्टिंग मध्ये पावसाचे पाणी घराच्या छतावरील टाकीमध्ये किंवा घराच्या जवळ जमिनीमधे असलेल्या टाकीमध्ये साठविले जाऊन, ते शुद्ध करून पाईप्सद्वारे पुन्हा जमिनीमध्ये जिरविले जाते. आजकाल देशातील अनेक राज्यांमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये रेन वॉटर हार्व्हेस्टिंगची व्यवस्था असणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. रेन वॉटर हार्व्हेस्टिंग करण्याचे अनेक फायदे आहेत.
सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी खूप जास्त खर्च करण्याची गरज नाही. जमिनीखाली जे पाणी असते, ते प्रदूषित असण्याची शक्यता असते. मात्र पावसाचे पाणी प्रदूषणरहित असल्याने ते साठविल्या जाणाऱ्या टाक्यांना किंवा पाईप्सना गंज लागण्याची शक्यता अगदीच कमी असते. शिवाय पावसाचे पाणी साठविले गेल्याने ज्या काळामध्ये पाण्याची कमतरता होते, त्या काळामध्ये हे पाणी उपयोगी पडू शकते.
रेन वॉटर हार्वेस्टिंग द्वारा पुन्हा जमिनीमध्ये जिरविले गेलेले पाणी शेतीच्या कामी वापरले जाऊ शकते. विशेषतः कमी पाऊस झाल्यास, किंवा ज्या भागांमध्ये पाण्याची कमतरता आहे, अश्या ठिकाणी ह्या साठविलेल्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच गुरांना, जनावरांना पाजण्यासाठी देखील हे पाणी वापरले जाऊ शकते. जसजशी लोकसंख्या वाढत आहे, तसतशी पाण्याची मागणी देखील वाढत आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी रहिवासी भागांमध्ये पाण्याची गरज भागविण्याकरिता बोरवेल्स खणल्या जात आहेत. परिणामी जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. जर पावसाचे पाणी जमिनीखाली जिरविले गेले, तर जमिनीखालील पाण्याच्या पातळीमध्ये पुन्हा वाढ होणे शक्य आहे.
पावसाळा सुरु झाला की रस्त्यांमध्ये पाणी तुंबू लागते. नाले भरून वाहू लागतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. रस्त्यांमध्ये वाहणारे हे पाणी जर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मदतीने साठविले गेले तर पाण्याचे दुर्भिक्ष नक्कीच कमी होईल. चंद्रपूर शहर महानगरपालिका तर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना मालमत्ता करात २ टक्के सूट व रु. २५००/- अनुदान देण्यात येणार आहे. अशी माहिती महापौर सौ. अंजली घोटेकर यांनी दिली.
तरी आपण सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे. जेणेकरून भविष्यात पाण्याविषयी गंभीर समस्या चा निवारण करण्यास मदत होईल व पाणी वाचविता येईल. असे आवाहन महापौर सौ. अंजली घोटेकर यांनी सर्व चंद्रपूर करांना केले आहे.