Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०९, २०१९

मतदान करतांना ओळखपत्र बाळगणे अनिवार्य




नागपूर/ चंद्रपूर  दि.9 एप्रिल :- भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार बजाविण्यासाठी प्रत्येक नागरिकाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे निवडणूक ओळखपत्र दिले जाते. निवडणुकीबरोबरच नियमित अनेक कामांसाठी हे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. दिनांक 11 एप्रिल रोजी होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी निवडणूक ओळखपत्राबरोबरच 11 प्रकारचे ओळखपत्र मतदारांना आपली ओळख म्‍हणून वापरता येणार आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदान करतांना या 11 पैकी कुठलेही एक ओळखपत्र मतदान केंद्रावर मतदारांनी सोबत आणावे, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी केले आहे.


चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील 70 राजूरा, 71-चंद्रपूर, 72-बल्लारपूर, 73-ब्रह्मपूरी, 74-चिमूर व 75-वरोरा या 6 विधानसभा मतदार क्षेत्रात एकूण 2131 मतदान केंद्रावर 11 एप्रिलला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. जे मतदार ओळख पटविण्यासाठी फोटो ओळखपत्र दाखवू शकणार नाही, अश्या मतदारास पुराव्यांदाखल ओळ्ख पटवून देण्यासाठी भारत निवडणूक आयोगानी 11 प्रकारचे ओळखपत्र प्रस्तुत करणे/दाखविणे अनिवार्य व बंधनकारक केले आहे. 18 वर्षावरील सुज्ञ नागरिकांना मतदान करण्याची संधी प्राप्त व्हावी याकरिता चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी मतदार नोंदणी अभियान राबविले आहे. 



 निवडणूक आयोगाचे ओळ्खपत्रही नागरिकांना प्राप्त झाले आहे. ज्या नागरिकांनी मतदार नोंदणी केलेली आहे, अश्या समस्त नागरिकांना मतदान करता येणार आहे. परंतू ज्या नागरिकांना अजूनही निवडणूक आयोगाचे मतदान ओळखपत्र प्राप्त झाले नसेल त्यांनाही दिलेल्या 11 पैकी सुस्पष्ट छायाचित्र असलेले कुठलेही ओळखपत्र मतदान कक्ष अधिकाऱ्याला दाखवून मतदान करता येणार आहे
यामधे 1) पारपत्र ( पासपोर्ट ), 2) वाहन चालक परवाना ( ड्रायव्हींग लायसन्स ), 3) केंद्र / राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम/पब्लिक लि. कंपन्यानी कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटोसहीत सेवा ओळखपत्र, 4) बँक/पोस्ट ऑफिसद्वारे दिलेले खातेदाराचे फोटो असणारे पासबुक, 5)आयकर विभागाकडील ओळखपत्र (पॅन कार्ड), 6) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी ( NPR ) अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड, 7) महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे (मनरेगा) जॉब कार्ड, 8) श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, 9) पेन्शनचे फोटोसहीत दस्तऐवज, 10) खासदारांना,आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, 11) आधार ओळखपत्र यांचा समावेश करण्‍यात आलेला आहे. त्‍यामुळे मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानाला जातेवेळी यातील एक ओळखपत्र म्‍हणून सोबत आणावे. यावेळी निवडणुकीत मतदारांच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर मतदान केले याची खूण म्हणून शाई लावण्यात येणार आहे.

जर एखाद्या मतदारांचे नाव ज्या ठिकाणी मतदान करीत आहे. त्या मतदान केंद्राच्या संबंधित मतदार यादीत असेल आणि तो अन्य विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याने जारी केलेले मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करीत असेल तर असे मतदार ओळखपत्र देखील मतदाराची ओळख पटविण्यासाठी दाखविता येईल. उपरोक्त नमूद केलेल्या दस्तैवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज मतदानाच्यावेळी ओळख पटविण्यासाठी दाखविणे अनिवार्य आहे. याशिवाय मतदान करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.