Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल ०८, २०१९

कर्मचाऱ्यांना मतकर्तव्याचा हक्क देणारी प्रणाली


               निवडणूक विशेष लेख            


पोस्टल बॅलेट सिस्टीम  
जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचा निवडणूक महोत्सव सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. सर्व शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शासनामार्फत दरवेळेस सुट्टी जाहीर केली जाते. या निवडणुकीसाठीही शासनाने सुट्टी जाहीर केली असून देशातील 90 कोटी नागरिक आपले मतकर्तव्य बजावणार आहे. परंतु बहुतेक शासकीय अधिकारी, कर्मचारी, सीमेवरील जवान,पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्यावर असल्याने त्यांना या मतदान प्रक्रियेत प्रत्यक्षपणे सहभागी होता येत नाही. देशात 45 लाखावर शासकीय कर्मचारी निवडणुका सुरळीत पाडण्याचे कर्तव्य बजावत आहेत. त्यात विविध विभागाचे कर्मचारी अधिकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अशा सर्वाना मताधिकाराचा हक्क बजावण्यासाठी पोस्टल बॅलेट सिस्टीम प्रणाली निवडणूक आयोग राबवते.

तसेच सेवा मतदारांना प्रत्यक्ष मतदान करता येत नसल्याने भारतीय निवडणूक आयोगाद्वारे त्यांना मतदानासाठी विशेष सुविधा पुरवली जाते . सेवा मतदार म्हणजे जे भारतीय नागरिक वायुदल, नौदल, भूदल मध्ये देशाची सेवा करत आहे. जे नागरिक केंद्रीय दलांमध्ये सैनिक आहेत तसेच विदेशात भारत सरकारच्या कर्तव्यावर आहेत, अशा सर्व कर्तव्यदक्ष कर्मचारी, अधिकारी, पोलिस आणि सैनिक यांच्यापर्यंत भारतीय निवडणूक आयोग स्वतः पोहोचणार आहे.

राष्ट्रसंरक्षणाचे कर्तव्य बजावणाऱ्या सेवा मतदारांना आणि निवडणुकीच्या कामात व्यस्त असणाऱ्या राज्य प्रशासनातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना पोस्टल बॅलेट (डाक मतपत्रिका) द्वारे मतदान करता येते. निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांना डाक मतपत्रिका मिळवण्यासाठी नमुना 12 (अ) यात अर्ज करावा लागतो. तसेच सैनिकांना पोस्टल बॅलेट मिळवण्यासाठी ऑनलाइन सुविधा पुरवण्यात आली असून www.servicevoter.nic.in या पोर्टलवर नोंदणी करता येते. सेवा मतदार असलेल्या व्यक्तींना स्वतःच्या पत्नीलाही सेवा मतदार म्हणून घोषित करता येते. त्यासाठी घोषणापत्रा द्वारे नोंदणी करावी लागते.

नमूना 12 (अ) मध्ये अर्ज केलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना तसेच निवडणूक आयोगाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केलेल्या सैनिकांना निवडणूक आयोग पोस्टल बॅलेट उपलब्ध करून देते. त्यामध्ये

नमूना 13 (क) घोषणापत्र असून त्यात मतदाराला स्वतःच्या संपूर्ण माहितीची नोंद करावी लागते आणि राजपत्रित अधिकाऱ्यांकडून घोषणापत्र प्रमाणित (अटेस्टेड) करून घ्यावं लागते. तसेच

नमूना 13 (ख) ही निवडणूक आयोगाने पाठवलेली मतपत्रिका असून त्यामध्ये मतदाराच्या लोकसभा क्षेत्रांमधील अंतीम उमेदवारांच्या नावाची चिन्हासहीत यादी दिलेली असते. त्यापैकी एकाच उमेदवाराच्या नावासमोर खूण करून मतदान करावे लागते.

नमूना 13 (ग) हा रिटर्निंग ऑफिसरकडे पोस्टल बॅलेट पाठवण्यासाठी वापरायचा मोठा लिफाफा असतो.

नमूना 13 (घ) ही पोस्टल बॅलेट वापरण्याची मार्गदर्शिका असते. त्यामध्ये पोस्टल बॅलेट वर मतदान करण्याची संपूर्ण प्रक्रिया लिहिलेली असते.

पोस्टल बॅलेट च्या प्रक्रियेमध्ये नमूना 13 (अ) मधील घोषणापत्रावर स्वतःविषयी ची संपूर्ण माहितीची नोंद करून ते घोषणापत्र नजीकच्या राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित (अटेस्टेड) करून ते निवडणूक आयोगाने पाठवलेल्या मोठ्या लिफाफ्यात ठेवावे.

नमूना 13 (क) मधील मतपत्रिकेवर आपले मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाने पाठवलेल्या लहान लिफाफा मध्ये ही मतपत्रिका ठेऊन लहान लिफाफा घोषणपत्रासाहित मोठया लिफाफ्यात ठेवावा आणि त्याला व्यवस्थित रित्या बंद करून संपूर्ण पोस्टल बॅलेट पोस्टाद्वारे किंवा स्वतः रिटर्निंग ऑफिसरला पाठवाव. अशा पद्धतीने पोस्टल बॅलेट ची प्रक्रिया पार पाडून मतदान करता येण्याची सुविधा निवडणूक आयोगाद्वारे पुरवली जाते. पोस्टल बॅलेट द्वारे झालेले मतदान मोजण्याची प्रक्रिया उमेदवारांच्या प्रतिनिधी समोर राबवली जाते.

परंतु मतदानाच्या या प्रक्रियेमध्ये काळजी न घेतल्यास अनेकदा हे पोस्टल बॅलेट हे अपात्र ठरण्याची शक्यता असते. मतदाराने एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर खूण केल्यास, पोस्टल बॅलेट वर हस्ताक्षर, शब्द किंवा इतर चिन्हांची नोंद केल्यास, लिफाफा योग्यरीत्या बंद न केल्यास, घोषणा पत्र किंवा इतर दस्तऐवज नमूना 13 (ग) च्या लिफाफ्यात असल्यास, घोषणा पत्रावर मतदाराची स्वाक्षरी नसल्यास किंवा राजपत्रित अधिकाऱ्याकडून प्रामाणित केले नसल्यास, पोस्टल बॅलेटद्वारा केलेले मतदान अपात्र ठरण्याची शक्यता असते. म्हणून सेवा मतदार सैनिक आणि निवडणूक कर्मचारी अधिकारी यांनी मार्गदर्शन तीमध्ये केलेल्या सूचनेनुसार पोस्टल बॅलेट वर काळजीपूर्वक मतदान करावे ही मत पत्रिका मतमोजणीच्या दिवसापर्यंत पोहोचेल अशा रितीने पाठवावी आणि तुमच्या मता कर्तव्याने लोकशाहीच्या बळकटीकरणात भर पाडावी.



श्रीकांत श्रीरंग एकुडे, चंद्रपूर

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.