Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ३०, २०१९

लांब पल्ल्याच्या रेल्वेतून मतदार जनजागृती


निवडणूक आयोगाचा अभिनव उपक्रम : केरळ एक्स्प्रेसचे नागपुरात स्वागत

 नागपूर, ता. ३० : ‘कोई मतदाता ना छुटे’, ‘ वोट करने अवश्य जाएँ’, ‘#गो कॉल १९५०’ अशी माहिती देणारे पोस्टर्स शनिवारी पहाटे नागपुरात दाखल झालेल्या केरळ एक्स्प्रेस पाहून फलाटावर उपस्थित प्रवाशांनी रेल्वेगाडीसोबतच सेल्फी काढले. निवडणूक आयोग आणि भारतीय रेल्वेच्या या उपक्रमाचे कौतुक करीत ‘आपण मतदान करणारच’ अशी शपथ प्रवाशांनी घेतली.

लोकसभा निवडणूक २०१९ च्या निमित्ताने देशभरातील १०० टक्के मतदारांनी मतदान करावे, मतदानाविषयी जनजागृती व्हावी या हेतून निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने आणि भारतीय रेल्वेच्या सहकार्याने संपूर्ण देशभरात रेल्वे गाड्यांच्या माध्यामतून जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. देशभरात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर मतदार जनजागृतीचे फलक लावून प्रवासी मतदारांपर्यंत प्रभावी संदेश पोहचविण्याचे कार्य सुरू झाले आहे. या मोहीमेचा शुभारंभ शुक्रवारी (ता. २९) नवी दिल्ली येथे झाला. नवी दिल्ली स्थानकावरून २९ मार्च रोजी सकाळी ११.२५ वाजता सुटणाऱ्या नवी दिल्ली-त्रिवेंद्रम (गाडी क्र. १२६२६) या गाडीला वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी हिरवी झेंडी दाखवून रेल्वेच्या माध्यमातून मतदार जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला. या गाडीच्या संपूर्ण कोचवर मतदार जनजागृतीचे संदेश लावण्यात आले आहेत. निवडणूकसंबंधी कुठलीही माहिती जाणून घेण्यासाठी असलेला टोल फ्री क्रमांक १९५०, निवडणूक जनजागृतीसाठी देशाचे ऑयकॉन असलेले मुष्टियोद्धा मेरी कोम, क्रिकेट खेळाडू राहुल द्रविड यांचे मतदान करण्याविषयीचे संदेश यासह विविध माहिती देण्यात आली आहे.

दिल्लीहून निघालेल्या या गाडीचे आग्रा कॅन्ट, ग्वालियर, झांसी, भोपाळ, इटारसी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नागपूर रेल्वे स्थानकावर ही गाडी शनिवारी (ता. ३०) पहाटे ३.५० वाजता पोहचली. निवडणूक नोडल अधिकारी (नागपूर शहर) डॉ. रंजना लाडे, निवडणूक नोडल अधिकारी (नागपूर ग्रामीण) राजेंद्र भुयार, नागपूर रेल्वे स्थानक संचालक दिनेश नागदिवे, ॲमेनिटी सुपरवायझर प्रवीण रोकडे, उपस्थानक प्रमुख (व्यावसायिक) दत्तु गाडगे यांनी केरळ एक्स्प्रेसचे स्वागत केले. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वतीने मतदान करण्याचा संदेश असलेले बॅनर्स आणि सेल्फी प्वॉईंट फलाटावर उभारण्यात आला होता. प्रवाशांनी सेल्फी प्वाईंटसमोर आणि जनजागृतीचे फलक असलेल्या रेल्वेसमोर सेल्फी काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत संदेश पोहचविण्याचा विश्वास यावेळी दिला. प्रवाशांनी येणाऱ्या निवडणुकीत मतदान करावे आणि मतदानाचा संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन नोडल अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी यावेळी केले. नोडल अधिकारी राजेंद्र भुयार यांनीही प्रवाशांना शुभेच्छा देत आपआपल्या गावात मतदार जनजागृतीचा संदेश देण्याचे आवाहन केले.

स्थानक संचालक दिनेश नागदिवे यांनी रेल्वे स्थानकावर निवडणूक काळात मतदानाचा संदेश ध्वनिक्षेपकावरून वेळोवेळी देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

पहाटे ४.१० वाजता नोडल अधिकारी डॉ. रंजना लाडे आणि नोडल अधिकारी राजेंद्र भुयार यांनी हिरवी झेंडी दाखवून जनजागृतीच्या पुढील प्रवासाकरिता रेल्वेला रवाना केले. यावेळी कपिलनगर उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पुसेकर, शिक्षण विभागाचे विनय बगळे, विनीत टेंभुर्णे, रेल्वेचे आरोग्य निरिक्षक अरुण सेन, श्रीमती अगाथा फ्रान्सीस उपस्थित होते.

केरळ एक्स्प्रेसव्यतिरिक्त जम्मू-कन्याकुमारी हिमसागर एक्स्प्रेस, अहमदाबाद-कोलकाता हावरा एक्स्प्रेस, ओखा-गुवाहाटी एक्स्प्रेस या गाड्यांच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात येणार आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.