- राजकुमार बडोले
मुंबई, दि. 21 : नागपूर येथील दीक्षाभूमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर, संत चोखामेळा शासकीय वसतिगृह, शांतीवन (चिंचोली) येथील प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
नागपूर येथील दीक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर, संत चोखामेळा शासकीय वसतिगृह, शांतीवन (चिंचोली) येथील विकास कामांबाबत आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री. बडोले बोलते होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. बडोले म्हणाले, दीक्षाभूमी येथील विविध विकास कामे ही आंतरराष्ट्रीय दर्जाची असावी यासाठी आवश्यक तो निधीही उपलब्ध करुन दिला जाईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरचे व शांतीवन (चिंचोली) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक वापराच्या वस्तुंचे जतन व संरक्षण/संवर्धन करणेकामी संग्रहालयाचे आधुनिकीकरण करणे व परिसराचे सुशोभिकरण करणे ही कामे जून अखेर पूर्ण करुन जुलैमध्ये याचे उद्घाटन करणार आहे. तसेच एक हजार क्षमतेचे मागासवर्गीय मुलांचे नागपूर येथील संत चोखामेळा शासकीय वसतीगृह इमारतीचे बांधकामही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.