Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २१, २०१९

राज्यात सुरू होणार आपला दवाखाना



  • परिपूर्ण प्राथमिक आरोग्य सेवेसाठी १५१ आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पण
  • 100 युनिटला मंजुरी मिळाल्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई, दि. २२ :- राज्यात परिपूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य उपकेंद्रांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात येत आहे. आयुष्यमान भारत अंतर्गत राज्यातील १५१ आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पण आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. व सार्वजनिक यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण करण्यात आले. या केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना प्राथमिक स्तरावर १३ विविध प्रकारच्या आरोग्य सेवा पुरविण्या बरोबरच उपकेंद्रांचे बळकटीकरण केले जाणार आहे. दरम्यान राज्यात आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा पुरविण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू करण्यात येत असून केंद्र शासनाच्या माध्यमातून 100 युनिटला मंजुरी मिळाल्याची माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी वस्त्रोद्योग, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त डॉ अनुप कुमार यादव, आरोग्य अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार, सहसंचालक डॉ. कंदेवाड आदी उपस्थित होते. यावेळी पुलवामवा येथील हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

*आरोग्यवर्धिनीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला परिपूर्ण आरोग्यसेवा - आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे*

सर्वसामान्य जनतेला खासगी आरोग्यसेवा परवडण्याजोग्या नसतात. राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी आरोग्य उपकेंद्रांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या घराजवळील आरोग्य केंद्रात औषधांची उपलब्धता, औषोधोपचार, वैद्यकीय तपासण्या, तसेच मानसिक आरोग्य, माता व बाल आरोग्य संबंधीच्या अत्यंत महत्वाच्या १३ प्रकारच्या आरोग्यसुविधा मोफत मिळणार असून त्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्यात हेल्थ वेलनेस सेंटरच्या माध्यमातून 12 हजार आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. राज्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत असून त्यामाध्यमातून झोपडपट्टीमधील नागरिकाला मोफत आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे. काल ठाण्यात आपल्या दवाखान्याच्या 2 केंद्रांचे उदघाटन करण्यात आले असून राज्यात 100 सेंटर्ससाठी मंजुरी मिळाल्याची माहिती आरोग्यमंत्री यांनी यावेळी दिली.

मंत्री श्री. शिंदे या पुढे म्हणाले, दुर्गम भागात उत्तम आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आशा वर्कर्स यांचा सिंहाचा वाटा आहे. व त्याच्या मागण्यांसाठी शासन सकारात्मक असून योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर डॉक्टर व इतर वैद्यकित कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

राज्यमंत्री खोतकर यांनी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट होणे गरजेचे असल्याचे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.

सुदृढ युवा पिढी घडविण्यासाठी मानसिक व

मौखिक आरोग्य अत्यंत महत्वाचे- शिवसेना नेते आदित्य ठाकरे

बदलत्या जीवनशैली मुळे जीवनातील ताणतणाव वाढत चालला आहे. शारीरिक आरोग्य सोबत मानसिक आरोग्यवर योग्य निदान होणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रात मानसिक आरोग्य नियोजन व तपासणी सारख्या आरोग्य सुविधा मिळणार असल्यामुळे त्याचा सामान्य माणसाला नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर मौखिक आरोग्य उत्तम असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. मौखिक आरोग्याचा आपल्या आहार पद्धतींवर प्रभाव पडतो. आरोग्यवर्धिनी च्या माध्यमातून दंत व मुखरोग आरोग्य सेवा जनतेला मिळणार आहेत. सुदृढ युवा पिढी घडविण्यासाठी मानसिक व मौखिक आरोग्य उत्तम असणे महत्वाचे असल्याचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे या वेळी म्हणाले. त्याचबरोबर आजार होऊन नयेत म्हणून म्हणून शाळांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर १०८ रुग्णवाहिकेला रुग्णाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ सांगणारी ऍप्लिकेशन असणे गरजेचे आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन रुग्णाचा जीव वाचवणे शक्य होईल. पोलिओ प्रमाणे आपण इतर आजारांवर देखील नक्किच मात करू शकतो अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी आरोग्यवर्धिनी पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री, श्री. ठाकरे यांनी हरीसाल, नंदुरबार येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातील डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

राज्यातील आरोग्य सोयी सुविधा बळकटीकरणासाठी चालू आर्थिक वर्षात १ हजार १२ आरोग्य उपकेंद्रे, ग्रामीण भागातील ४७९ व शहरी भागातील १२५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील ४ आकांक्षीत गडचिरोली, वाशिम,उस्मानाबाद व नंदुरबार व इतर १५ भंडारा, चंद्रपूर, वर्धा, सातारा, पालघर, नाशिक, लातूर, पुणे, अहमदनगर, नांदेड, हिंगोली, गोंदिया, अमरावती,सिंधुदुर्ग, जळगांव जिल्ह्यातील येऊन ३१२ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेतलेले आरोग्य अधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्य सेवक, आशा वर्कर यांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रांवर औषधी व प्रयोगशालेय तपासण्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

आरोग्यवर्धिनी या शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पा अंतर्गत राज्यामधील सर्व १० हजार ६६८ उपकेंद्रे, ६०५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व १ हजार ८२८ ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (हेल्थ अँड वेलनेस सेंटर) रूपांतर करण्यात येणार आहे

आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा



प्रसूतीपूर्व व प्रसूती सेवा

नवजात अर्भक व नवजात बालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा

बाल्य व किशोरवयीन आजार व लसीकरण सेवा

कुटुंब नियोजन

संसर्गजन्य रोग नियोजन व सामान्य रुगांची बाह्य रुग्ण तपासणी

संसर्ग जन्य रोग नियोजन व तपासणी

असंसर्गजन्य रोग व नियोजन व तपासणी

मानसिक आरोग्य नियोजन व तपासणी

नाक, कान, घसा व डोळे सामान्य आजार संबंधीच्या सेवा

दंत व मुख आरोग्य सेवा

वाढत्या वयातील आजार व परिहरक उपचार

प्राथमिक उपचार

आपत्कालीन सेवा

आयुर्वेद व योग

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.