चंद्रपूर दि. 21 फेब्रुवारी : आदर्श गावे तयार करण्यासाठी केवळ योजना व नीधीच लागत नाही तर माझ्या गावाचे नंदनवन मीच करणार असा दृढनिश्चय लागतो. पालकमंत्री म्हणून अशा दृढनिश्चयी सरपंचाच्या मागे मी ताकदीने उभा आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आदर्श ग्राम व आदर्श ग्रामसेवक यांच्या पुरस्कार सोहळ्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी या मेळाव्याचे अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यक्रमाला दुपारच्या सत्रात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरपंचाशी संवाद साधला.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आ. नानाभाऊ शामकुळे, आ. सुरेश धानोरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे , सभापती ब्रिजभूषण पाझारे, संतोष तगडपल्लीवार, अर्चना जिवतोडे, गोदावरी केंद्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जलसंधारणाच्या संदर्भात प्रत्येक गावाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, 1972 मध्ये दिल्लीतील एका प्रदर्शनीत प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी तयार करण्याची प्रक्रिया पहिल्यांदा बघितली होती. त्यावेळी प्रश्न पडला होता की, या बाटल्यांचा खरोखर आपल्या भागात काय उपयोग? मात्र आज प्लास्टिकच्या बॉटल मधील पाणी वापरणे ग्रामीण भागात सुद्धा नियमित झाले आहे . पाण्याचे महत्त्व समजून आता गावागावांमध्ये कामाला सुरुवात झाली पाहिजे. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे. जल पुरुष राजेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात नुकतेच चंद्रपूर येथील जलसंवाद यात्रेला सुरुवात झाली. पाण्याच्या थेंबा, थेंबाची जपणूक कशी करावी यासाठी त्यांनी अनेक सूचना केल्या आहेत. त्याचे पालन प्रत्येक सरपंच ,ग्रामसेवक यांनी करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीची इमारत उत्तम असावी. गावामध्ये शंभर टक्के शुद्ध पेयजल उपलब्ध असावे, नळाद्वारे पाण्याचा पुरवठा व्हावा, शाळा उत्तम असाव्यात, यासाठी हवी ती मदत करायला आपण तयार आहोत. शिक्षणाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा खोली उत्तम प्रतीची असावी यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे,असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 64 कोटी रुपये दिले आहेत. जिल्ह्यात मिशन सेवा, मिशन शक्ती, मिशन मंथन अशा वेगवेगळ्या योजना सुरू आहेत.आपल्या गावातील मुलांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी या योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी जागरूकतेने प्रयत्न करण्याचे, त्यांनी आवाहन केले.
प्रत्येक सरपंचाने आपल्या अधिकाराची किमान जाणीव ठेवावी, सरपंच रडणारा नव्हे गावासाठी लढणारा असावा,अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक गावांमध्ये प्राथमिक सुविधा परिपूर्ण असाव्यात, किमान स्मशान भूमीमध्ये तरी जाण्या येण्याचा रस्ता असावा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असावी अशा माफक अपेक्षा जनतेला गावाच्या यंत्रणेकडून असतात. त्यामुळे अशा प्राथमिक सुविधा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची आपली तयारी आहे .या जिल्ह्यांमध्ये पक्ष ,धर्म यापलीकडे जाऊन पायाभूत सुविधांसाठी मदत करायला पालक मंत्री म्हणून पाठिशी भक्कमपणे असल्याचेही त्यांनी भाषणाच्या शेवटी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या सत्रांमध्ये सरपंचांना संबोधित करताना केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्पष्ट केले की, शेतकरी शेतमजूर व गरीब जनतेला केंद्रस्थानी ठेवून राज्य व केंद्र शासनाने अनेक योजना तयार केल्या आहेत. या योजनांचा योग्य पद्धतीने उपयोग गावाच्या कल्याणाकरिता करण्यात यावा असे आवाहन त्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना केले. अन्य मान्यवरांनी देखील या कार्यक्रमाला संबोधित केले. गावाच्या विकासासाठी विशेष चुणूक दाखवणारी सरपंच व ग्रामसेवक यांचा यावेळी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.