Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल १०, २०१९

पोलींग पार्टी रवाना; मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

  •  एकूण 13 उमेदवार रिंगणात
  •  19 लाख 4 हजार 32 मतदार
  •  सकाळी 7 ते सांयकाळी 6.00 पर्यंत मतदान
  •  2193 मतदान केंद्र
  •  13 हजार मनुष्यबळ सज्ज
  •  6269 दिव्यांग मतदार
  •  12 सखी मतदार केंद्रे
  •  अंशत: अंधांसाठी मॅग्निफायर

चंद्रपूर दि.10 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यातील 19 लाखावर मतदार उद्या मतदानाचा मताधिकार बजावणार आहेत.जिल्हा प्रशासनाने आज सकाळी 7 वाजता पासून पोलींग पार्ट्या रवाना केल्या असून रात्री उशीरापर्यंत सर्वजन आपआपल्या निश्चित स्थळी पोहचले आहेत. 13 हजारावर कर्मचारी व 3 हजारावर पोलीस कर्मचारी उद्याच्या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणार आहे.जिल्ह्यातील समस्त मतदारांनी उन्हापासून स्वत:चे संरक्षण करत आपले मताधिकार कर्तव्य पूर्ण करावेत, शांततेत मतदानाला सामोरे जावे व आदर्श आचारसंहितेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात 13 उमेदवार रिंगणात आहेत.यामध्ये भाजपचे हंसराज अहीर, कॉग्रेसचे सुरेश धानोरकर, बहुजन समाज पार्टीचे सुशील वासनिक, बहुजन मुक्ती पार्टीचे डॉ.गौतम गणपत नगराळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे दशरथ पांडुरंग मडावी, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नामदेव माणिकराव शेडमाके, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे नितेश आनंदराव डोंगरे, प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाचे मधुकर विठ्ठल निस्ताने, वंचित बहुजन आघाडीचे ॲड. राजेंद्र श्रीरामजी महाडोळे,अपक्ष उमेदवार अरविंद नानाजी राऊत, नामदेव केशव किनाके, मिलिंद प्रल्हाद दहिवले, राजेंद्र कृष्णराव हजारे यांचा समावेश आहे.

चंद्रपूरसह विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. त्यामूळे पारा चढला असून मतदारांनी उन्हापासून स्वत:चे संरक्षण करीत मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर पुरेशा सावलीत मतदान करता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय पिण्याचे पाणी, निवडणुकीच्या साहीत्यापासून तर मतदान केंद्रावरील रॅम्प, विद्युतव्यवस्था, शेड, मेडीकल किट, व्हीलचेअर या सर्व सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी दिवस रात्र काम करीत असून ही सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

दरम्यान आज चंद्रपूर शहरात दिव्यांगांनी मोठी रॅली काढत सर्व मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केले आहे.यावेळी चंद्रपूर मतदार संघात सर्वसाधारण मतदार 19 लाख 4 हजार 32 मतदार असून 6 हजार 269 दिव्यांग, 896 अंध मतदार, 4 हजार 697 शारीरिक दुर्बलता मतदार, 4 हजार 500 ऑस्टियोपोरोसिस मतदार, 426 इतर दिव्यांग मतदार आहे.प्रशासनाने 1335 व्हिल चेअरची तसेच अंशत: अंध मतदारांसाठी 200 मॅग्निफायरची व्यवस्था मतदान केंद्रावर करण्यात आलेली आहे.जिल्ह्यामध्ये 23 तृतीयपंथी मतदार असून चंद्रपूर मध्ये हि संख्या अधिक आहे. मतदार संघात 53 केंद्र संवेदनशिल आहे.

या इ.व्ही.एम मशीन सोबत कंट्रोल युनिट 2569, बॅलेट युनिट 2576 आणि व्हीव्हीपॅट 2554 असे 3 युनिट प्रत्येक मतदान केंद्रावर असणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रथमच व्हिव्हिपॅट वापरण्यात येणार असल्याने मतदारांमध्ये व्हिव्हिपॅट विषयी उत्सुकता असणार आहे.

दरम्यान यावर्षी मतदानाची संख्या वाढावी यासाठी 1950 या टोल फ्रि क्रमांकाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला या क्रमांकावर 3 हजार 637 कॉल सायंकाळ पर्यंत आले होते तर 74 तक्रारी देखील करण्यात आल्या या तक्रारीचे निरसन करण्यात आले आहेत.

यासोबतच सी-व्हिजील या ॲपद्वारे 17 तक्रारीची नोंद झाली असून संबंधित विभागा अंतर्गत याचे निरसन देखील करण्यात आलेले आहे.

210 मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया ऑनलाईन बघता येणार आहे.याठिकाणच्या लोकशाही उत्सवाचे वेब कास्टिंग होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात बघता येणार आहे. त्याचबरोबर 15 आधुनिक मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत.तर जिल्हयामध्ये 12 सखी मतदान केंद्र असून याठिकाणी केंद्रातील सर्व मतदान प्रक्रिया महिलांच्यामार्फत पुर्ण केल्या जाणार आहे.

कलम 144 लागू

जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी फौजदार प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अंतर्गत 9 ते 12 एप्रिल पर्यंत 144 कलम लागू केली आहे. यामुळे या काळात सार्वजनिक सभा व पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध घातले आहेत. तसेच 11 एप्रिल रोजी खाजगी वाहनांवर देखील बंदी घातली आहे. मतदारांना मतदान केंद्रावर वाहून नेण्याच्या प्रथेला पायबंद घालण्यासाठी खासगी टॅक्सी, कार, ट्रक, ॲटोरिक्षा, मिनीबस, स्टेशन वॅन, स्कुटर आदी प्रकारच्या सर्व वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहे. तथापि, यातून ॲम्बुलन्स, दुध गाडया, टँकर व निवडणूक कर्मचा-यांच्या,पोलीसांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.