- नागपुरात आज होणार होती प्रमोशन पत्रपरिषद
- पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचे प्रदर्शन रोखले
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील "पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला चित्रपटाचा नायक अभिनेता विवेक ओबेरॉय प्रमोशनसाठी नागपुरात आला. दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आयोजित होती. पण दरम्यानच्या काळात या चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याची बातमी समाजमाध्यमांवर झळकली. त्यामुळे विवेक विमानतळावरुनच परत गेला.
पत्रकार परीषद रद्द झाल्याचे समजल्यावर विवेकला केवळ अनौपचारीकपणे भेटू देण्याची मागणी काही पत्रकारांनी आयोजकांकडे केली. तेही शक्य नसेल तर विवेकचे विमानतळावरील एखादे छायाचित्र उपलब्ध करुन देण्याबाबतही म्हटले. पण आयोगाने स्थगिती दिल्यामुळे विवेक "लॅंड'च झाले नाही, असे आयोजकांनी सांगितले. विवेक येणार म्हणून वाट बघत बसलेल्या त्याच्या चाहत्यांचाही हिरमोड झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचे प्रदर्शन आज निवडणूक आयोगानं रोखले. आगामी लोकसभा निवडणुकांमुळं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं 'यू' प्रमाणपत्र दिलं होतं. या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली होती आणि चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात टोलवला होता.
उद्या म्हणजेच 11 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता आणि आता निवडणूक आयोगाने 'पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. या चित्रपटामुळे आचारसंहितेला धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू असेपर्यंत हा चित्रपट कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमावर दाखवू नये, असे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं 'U' प्रमाणपत्र दिलं आहे.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. ही याचिका फेटाळत असताना सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाचा निर्णय निवडणूक आयोगावर सोपवला होता.