Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल १३, २०१९

महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प) पदी वी.थंगपांडियन

नागपूर/प्रतिनिधी:

 देशातील वीज उत्पादन क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या अग्रमानांकित महानिर्मिती या कंपनीमध्ये वीज क्षेत्रातील चतुरस्त्र अनुभव संपन्न असे वी. थंगपांडियन हे महानिर्मितीच्या संचालक(प्रकल्प) पदी १० एप्रिल रोजी रुजू झाले असून महानिर्मितीच्या प्रस्तावित औष्णिक व सौर ऊर्जा प्रकल्पांना साकारण्यासाठी त्यांची महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. 

याप्रसंगी महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(वित्त)  संतोष आंबेरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन  वी. थंगपांडियन यांचे स्वागत केले. 
वी. थंगपांडियन यांनी सन १९८१ मध्ये मदुराई कामराज विद्यापीठातून बी.ई.(मेकॅनिकल) हि पदवी प्रथम श्रेणीत प्राविण्यासह उत्तीर्ण केलेली आहे. २x५०० मेगावाट नेवेली लिग्नाईट वीज प्रकल्प, ३x६६० मेगावाट घाटमपूर वीज प्रकल्प,३x८०० मेगावाट नेवेली ओरिसा प्रकल्प, २x६६० नेवेली-२ अश्या विविध वीज प्रकल्पांचे  अभियांत्रिकी, बांधकाम, विकास व उभारणी कामे तसेच सुमारे ४२४० मेगावाट औष्णिक ऊर्जा, ५१ मेगावाट पवन ऊर्जा, ४४० मेगावाट सौर ऊर्जा केंद्रांच्या संचालनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. 

नागपूर जिल्ह्यातील एन.टी.पी.सी. मौदा येथील २३२० मेगावाट, विंध्याचल येथील ३२६० मेगावाट येथील वीज प्रकल्पांचे प्रमुख म्हणून तर  ३x२०० मेगावाट, ३x५०० मेगावाट रामागुंडम वीज प्रकल्प उभारणी कामे व विशेषत: बाष्पक देखरेख कार्यभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळला आहे. 

संचालक (पॉवर) नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन, ग्रुप जनरल मॅनेजर/ जनरल मॅनेजर(एन.टी.पी.सी. मौदा), जनरल मॅनेजर(संचलन व सुव्यवस्था) / अतिरिक्त जनरल मॅनेजर एन.टी.पी.सी. विंध्याचल अश्या विविध महत्वपूर्ण जबाबदारीची पदे त्यांनी समर्थपणे भूषविली आहेत. राष्ट्रीय पातळीवरील अग्रगण्य अश्या वीज क्षेत्रातील कार्याचा सुमारे ३७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांचे पाठीशी आहे. 
देश-विदेशात तांत्रिक व प्रशासकीय व्यवस्थापन  विषयक अत्याधुनिक प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे त्यात जर्मनी येथे “सौर उर्जेचा अवलंब आणि औष्णिक संचांचे लवचिक संचलन”, अमेरिका येथे “रणनीती आणि नेतृत्वगुण” इत्यादींचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स(इंडिया) या संस्थेचे २०१५ पासून ते सदस्य आहेत. एन.टी.पी.सी. राष्ट्रीय परिषदेत त्यांचा   टेक्निकल पेपर प्रसिद्ध झाला आहे.  

कोळसा मंत्रालय भारत सरकारच्या प्रशासकीय नियंत्रणातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या नवरत्न कंपनी “नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड” तामिळनाडू येथून संचालक(पॉवर) म्हणून ते ३१ मार्च २०१९ रोजी नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.
महानिर्मितीचे मुख्यालय मुंबई येथील कार्यकारी संचालक, मुख्य अभियंते तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी नव्याने पदभार स्वीकारलेल्या संचालकांचे स्वागत केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.