कोराडी/:
सुखी, समृद्ध आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर दिवसाला फक्त १५ सेकंद टाळ्या वाजवा, तळहात आणि तळपायाची विशेषतः काळजी घ्या, बोटांचे प्रेशर पॉईंट्स संबंधी व्यायाम करणे तसेच दैनंदिन गरजेच्या कृत्रिम वस्तूंचा वापर टाळा, असा बहूउपयोगी सल्ला प्रसिद्ध मार्गदर्शक अरुण ऋषी यांनी दिला. तांब्याच्या भांड्यात पाणी पिऊन, लाळ, नैसर्गिक वस्तूंचा वापर आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवल्यास उत्तम आरोग्य आणि त्वचा तजेल आणि उत्साहवर्धक राहील, असा दावाही त्यांनी केला.
महानिर्मितीच्या कोराडी येथील "६६० मेगावॅट " सभागृहात आयोजित "अनमोल आयुष्यासाठी " या कार्यक्रमात अरुण ऋषी यांनी उपस्थितांना आयुष्य आनंदात जगण्याचा जणू मूलमंत्रच दिला. याप्रसंगी मुख्य अभियंते अभय हरणे, राजकुमार तासकर, अनिल आष्टीकर, उपमुख्य अभियंते सुनील सोनपेठकर, प्रफुल्ल कुटेमाटे, विराज चौधरी तसेच अधीक्षक अभियंते, विभाग प्रमुख, अभियंते-कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
निरोगी जीवनाचे रहस्य उलगडून दाखविताना ऋषी म्हणाले, सकाळी उठल्याबरोबर आपण टूथब्रश, टूथपेस्ट, चहा, साबण, शॅम्पू, सौंदर्यप्रसाधने, चॉकलेट, शीतपेये या कृत्रिम वस्तूंचा वापर करतो. याशिवाय पान, तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारूच्या व्यसनाला आहारी जातो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊन आरोग्य बिघडत जाते. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सर्व कृत्रिम वस्तूंचा वापर टाळून खाण्यापिण्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी पिऊन फक्त नैसर्गिक वस्तूंचा वापर केल्यास विविध व्याधी झाल्या असतील तर त्या नियंत्रणात राहतील आणि झाल्या नसतील तर भविष्यात होणार नाही याचे सूत्र समजावून सांगितले.
सध्या जगभरात केवळ एकूण गुणवत्ता व्यवस्थापनाला विशेष महत्व दिले जात असून एकूण गुणवत्तापूर्ण व्यक्तीला महत्व दिले जात नाही. त्यामुळे लोकांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले असल्याचे त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे आपण कार खरेदी करताना तिची कार्यक्षमता,देखभाल दुरुस्ती खर्च आणि आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या गोष्टीचा विचार करतो, अगदी तसाच विचार आपले शरीर स्वस्थ आणि निरोगी ठेवण्याबाबत करण्याची गरज असल्याचे त्यांनी विशेषतः तुलनात्मक दृष्ट्या स्पष्ट केले. त्यादृष्टीने आहारावर नियंत्रण ठेवणे हा महत्वाचा घटक आहे. दिवसाला एकवेळेस भोजन करणारा "योगी" दोन वेळेस भोजन करणारा "भोगी" तीन वेळेस भोजन करणारा "रोगी" आणि चार वेळेस भोजन करणारा "महारोगी" अशी मानवी सवयींची व्याख्याही त्यांनी केली. आपण परिश्रम करून एक तृतीयांश पैसा स्वतःसाठी तर दोन तृतीयांश पैसा हा डॉक्टरांसाठी कमावत असल्याचे त्यांनी मार्मिक उदाहरणासह सांगितले. १५ सेकंद टाळी वाजवून औषध मुक्त जीवन जगण्यासाठी , निरोगी राहण्याचे प्रात्यक्षिक त्यांनी यावेळी करून दाखविले. सूत्रसंचालन श्रद्धा सुके यांनी केले. अरुण ऋषी यांनी स्वानुभव, अभ्यासपूर्ण माहिती अतिशय सोप्या आणि रंजक पद्धतीने सांगितल्याने उपस्थितांची मने जिंकली. दर्जेदार सादरीकरणासह कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.