आदिवासी समाज मेळाव्यात पालकमंत्री वडेट्टीवार यांचे प्रतिपादन
चंद्रपूर ( कार्यालय )
देशातील जनतेचे लक्ष विचलित करीत धर्मांध सत्ता पिपासू विरोधकांकडून जातीपातीच्या राजकारणातून अराजकता पसरविण्याचे कार्य सध्या सुरू आहे. विरोधकांचे हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी तसेच भविष्यकाळात आदिवासी समाजाच्या आरक्षणावर येऊ घातलेले गंडांतर रोखण्यासाठी आदिवासी समाजाने संघटीत होऊन ठाम पणे उभे राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रम्हपुरी येथे आयोजित आदिवासी समाज प्रबोधन मेळावा व समाज सभागृहाच्या भूमिपूजन सोहळा प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
बिरसा क्रांती दल च्या वतीने ब्रम्हपुरी येथील आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बिरसा क्रांती दल संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी , तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष डी. बी. अंबोरे जिल्हा संघटक प्रभाकरजी गेडाम ॲड.राम मेश्राम, गिरिजाताई उईके, विलास विखार ,बाळू राऊत ,प्रमोद चीमुरकर तसेच संघटनेचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी 25 लक्ष रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन सोहळा पार पडला.
या प्रसंगी पुढे बोलतांना नामदार वडेट्टीवार म्हणाले की, आदिवासी समाजाला वीर बिरसा मुंडा व विर बाबुराव शेडमाके या वीरांचा वारसा लाभलेला आहे. आदिवासी समाजातील या महान थोर पुरुषांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते याची इतिहासात जरी नोंद नसली तरी प्रत्येकाच्या हृदयात याची नोंद आहे. मात्र आता परिस्थिती विपरित झाली असून सत्ता पिपासूनी धर्मांधतेचे सोंग पांघरून कधी भोंगे तर कधी हनुमान चालीसा अशा नव्या विवादित फंड्यांचा वापर करून देशातील वाढत्या महागाई ,बेरोजगारी व अनेक ज्वलंत प्रश्नांना बाजूला सारून देशाला डबघाईच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न चालविला आहे. तद्वतच केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी बहुजनांच्या आरक्षणावर वार करून बहुजन समाजाला मूलभूत सोयीसुविधांपासून दूर सारले. अगदी त्याचप्रमाणे भविष्यकाळात देशात समान नागरी कायद्याच्या रूपाने विविध समाजासह आदिवासी समाजाचेही आरक्षण गिळंकृत करण्याचे षड्यंत्र रचण्यात येत असल्याची शक्यता वर्तविली. अशा ढोंगी धर्माधिकार्यांना थारा न देता आदिवासी समाज बांधवांनी संघटनात्मक बांधणी तून समाज विकास साधावा असे आदिवासी समाजाच्या विकासात्मक धोरणाला आपण प्रत्येक वेळी यथाशक्ती मदत करणार तसेच आदिवासी समाजातील वीर व थोर हुतात्म्यांचे स्मारक उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आवाहन यावेळी ना. वडेट्टीवार यांनी केले. तसेच समाज सभागृह हे समाजाला नवी दिशा देणारे व संघटीत करणारे केंद्र ठरावे असे ही विचार ना. वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी आदिवासी समाज बांधवांकडून ना. विजय वडेट्टीवार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आदिवासी समाजातून ज्ञानेश्वर उर्फ पिंटू जुना कि राहणार चिमूर यांनी आचार्य पदवी शिक्षण पूर्ण केल्याने त्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यानंतर बिरसा क्रांती दलसंघटनेच्या अनेक मान्यवरांनी आपली मते मांडली. याप्रसंगी प्रामुख्याने शेकडोंच्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.
Need to unite and fight the tribal community inherited from heroes - Guardian Minister Vadettiwar