Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे १८, २०११

जागतिक परिचारिका दिन

देवनाथ गंडाटे

चंद्रपूर - फ्लॉरेन्स नाईटिंगेल ही जगातील पहिली परिचारिका. युद्धकाळात तिने जखमींवर औषधोपचार करून सामाजिक सेवेला सुरवात केली. तेव्हापासून वैद्यकीय क्षेत्रात "नर्स'चा जन्म झाला. रुग्णसेवेकरिता "नर्स' घडविण्याचे काम पूर्व विदर्भात एकमेव जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहे. येथे दहावी-बारावी उत्तीर्ण 220 मुलींसह 20 तरुण मुले "परिचारिका' अभ्यासक्रमाचे धडे गिरवीत आहेत.

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत 1957 मध्ये परिचारिका प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाली. हे नागपूर विभागात एकमेव प्रशिक्षण केंद्र असून, येथे 240 प्रशिक्षणार्थी परिचारिका प्रशिक्षण घेत आहेत.

येथे दहावी आणि बारावी उत्तीर्ण अशा दोन पात्रतेचे प्रशिक्षण दिले जाते. दहावीच्या पात्रतेवर दीड वर्ष मुदतीचे जिल्ह्यातील स्थानिक मुलींसाठी सहायक परिचारिका या पदाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर बारावीच्या पात्रतेवर तीन वर्षे मुदतीचा परिचारिका प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे. सहायक परिचारिका प्रशिक्षणाला 80, तर परिचारिकेला 160 अशी मान्यता आहे. वर्षाला नवीन 40 प्रशिक्षणार्थ्यांची भरती होत असते. एकूण 240 प्रशिक्षणार्थ्यांत 20 मुलांचा समावेश आहे. 18 महिन्यांच्या अभ्यासक्रमात जिल्ह्यातील स्थानिक प्रशिक्षणार्थी असून, त्यांना दरमहा 500 रुपये विद्यावेतन देण्यात येते. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा चार जिल्ह्यांतील प्रत्येकी दहा विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येत असून, विद्यावेतन 300 रुपये आहे. विद्यार्थिनींना राहण्यासाठी वसतिगृहाची सुविधा आहे. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थी परिचारिकांना जिल्हा सामान्य रुग्णालय आणि तालुक्‍यातील आरोग्य केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठविले जाते.

कर्मचारीवर्ग
शिक्षक कर्मचाऱ्यांत प्राचार्य, नर्सिंग ऑफिसर, पाट्य निर्देशक, चिकित्सक सलाईन निर्देशक, लोकस्वास्थ्य परिचारिका आदी पदे असून, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांत वॉर्डन, चौकीदार, स्वयंपाकी, सहायक मदतनीस, सफाईगार, चालक, वाहक, लेखापाल, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदी पदांचा समावेश आहे.


उच्च प्रशिक्षण
प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण घेतल्यानंतर परिचारिकेच्या उच्च अभ्यासक्रमासाठी नागपूर येथे सुविधा आहे. पब्लिक हेल्थ, कॅन्सर नर्सिंग, शस्त्रक्रियागृह यासाठी प्रमाणपत्र आणि पदवी अभ्यासक्रम आहेत. त्यानंतर दोन वर्षांचा बेसिक बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम, एमएस्सी नर्सिंग, एमफिल आणि पीएचडी अशा पदव्यांचे अभ्यासक्रम आहेत. राज्य शासनाने नुकताच चार वर्षांचा बेसिक बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू केला असून, नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेज, लता मंगेशकर हॉस्पिटल, सावंगी मेघे आणि सेवाग्राम येथे शिक्षणाची सोय आहे.


वसतिगृह झाले कोंडवाडा
परिचारिका प्रशिक्षणार्थ्यांसाठी 1957 मध्ये वसतिगृह बांधण्यात आले. आज प्रशिक्षणार्थ्यांची संख्या वाढली. मात्र, इमारतीची जागा अपेक्षेनुसार वाढविण्यात आलेली नाही. दोन वसतिगृहांत 220 मुलींना राहावे लागत आहे. येथे नवीन बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे दुमजली इमारतीच्या बांधकामाची आवश्‍यकता आहे. प्रशिक्षण संस्थेने यासंदर्भात पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले. मात्र, काहीही फायदा झालेला नाही.

2006 पासून संस्थेकडे स्वत:चे वाहन नाही. नादुरुस्त झालेले वाहन अद्याप दुरुस्त करून देण्यात आले नाही. 240 प्रशिक्षणार्थी संख्या असतानादेखील केवळ चार वर्गखोल्या आहेत. त्यामुळे परिचारिकेचे प्रशिक्षण घेणारे बालवाडीतील विद्यार्थ्यांप्रमाणे कोंडले जात आहेत. वसतिगृहातील स्वच्छतागृहाचे सांडपाणी वाहून नेण्यासाठी जुनी गटारलाइन आहे. प्रशिक्षणार्थी वाढल्यानंतर स्वच्छतागृहांची वाढीव व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे 1977 पासून जुन्याच पद्धतीची गटारव्यवस्था असल्याने ती वेळोवेळी तुंबत असते.


89 लाखांचा निधी
आरोग्य विभागाच्या निधीतून 89 लाखांचा निधी मिळाला होता. त्यातून 50 लाखांचे बांधकाम करण्यात आले, शिक्षण साहित्यावर 20 लाख रुपये, मुलींसाठी 10 लाख रुपयांच्या सुविधा आणि अन्य तीन लाख रुपये कंत्राटी पद्धतीच्या कर्मचाऱ्यांवर खर्च करण्यात आले. वसतिगृहात प्रशिक्षणार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून, पलंग, चादर, कूलर, खेळ आणि मनोरंजनाचे साहित्य उपलब्ध आहेत.



प्रशिक्षणार्थ्यांवर जोखीम
प्रशिक्षणार्थी परिचारिकांना शासनाच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी करून घेतले जाते. मात्र, त्यांना वैद्यकीय संपूर्ण ज्ञान अवगत नसल्याने भविष्यात धोका संभवू शकतो. पल्स पोलिओ, रक्तदान शिबिर, यात्रा आदींमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना पाठविण्याच्या सूचना अधिकारी देतात. ते चुकीचे असून, प्रशिक्षित परिचारिकांनाच जोखमीच्या उपक्रमात सहभागी करून घेणे अपेक्षित आहे.


खासगी रुग्णालयात अप्रशिक्षित परिचारिका
शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये अप्रशिक्षित परिचारिकांचा भरणा करण्यात आला आहे. 800 ते हजार रुपये या अल्पशा मानधनावर अनेक अप्रशिक्षित परिचारिका काम करीत आहेत. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील कोणतेही ज्ञान नसल्याने रुग्णांचा जीव जाऊ शकतो. प्रशिक्षण केंद्रातून पदवीप्राप्त परिचारिका नियुक्त करण्याऐवजी बारावी उत्तीर्ण झालेल्यांकडून रुग्णसेवा करवून घेण्यात येत आहे.



अत्याधुनिक सुविधायुक्त परिचारिका प्रशिक्षण केंद्र होण्याची गरज आहे. इतक्‍या वर्षांनंतरही सुविधा अपुऱ्या आहेत. त्या सोडविण्यासाठी शासनाने निधी द्यावा.

- डी. एम. मडावी, प्राचार्य (परिचारिका प्रशिक्षण केंद्र)


प्रशिक्षण घेतल्यानंतर रुग्णसेवा करायची आहे. भविष्यात वैद्यकीय क्षेत्रातील नवीन अभ्यास अवगत करण्याचा प्रयत्न राहील.

      - सचिन साठवणे, प्रशिक्षणार्थी (भंडारा)





या क्षेत्रात नोकरीची संधी आहे. रुग्णसेवा करण्याचा उद्देश ठेवूनच वैद्यकीय क्षेत्रातील परिचारिका अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत आहे.

        - गीता बुधवारे (अमरावती)




आईसुद्धा नर्स असल्याने बालपणापासूनच रुग्णसेवेची आवड होती. आईच्या संस्कारातूनच हा अभ्यासक्रम करून ग्रामीण रुग्णांची सेवा करीन.

- सोनल नरडे (गडचिरोली)







पहिली महिला  
1854 ते 1856 या काळात तुर्कस्तान आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू होते. त्यानंतर झालेल्या क्रिनिया युद्धात जखमी झालेल्या सैनिकांवर कंदिलाच्या प्रकाशात उपचार करून सेवा देण्याचे काम फ्लॉरेन्स नाईटिंगेल या इंग्लिश घराण्यातील मुलीने केले. राजकारणात आवड असतानादेखील सामाजसेवेत मन लागल्याने रुग्णसेवा केली. हीच ती जगातील पहिली परिचारिका. 12 मे हा फ्लॉरेन्सचा जन्मदिन जागतिक परिचारिकादिन म्हणून साजरा करण्यात येतो.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.