नागपूर/प्रतिनिधी:
'फ्लाइट लेफ्टनंट विजय तांबे इज मिसिंग' |
भारतीय वायुसेनेत विंग कमांडर म्हणून कार्यरत असलेले अभिनंदन वर्थमान यांची पाकिस्तानातून जिनिव्हा कराराच्या आधारे सुटका करण्यात आली. ते युद्धकैदी आहेत की नाही, इथपासून अनेक प्रकारे पाकिस्तानने यांत खोडा घालण्याचा प्रयत्न केला.मात्र अखेरीस भारताची कूटनीती तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव लक्षात घेऊन पाकिस्ताने अभिनंदन वर्थमान यांची सुटका केली आणि तीन दिवसाच्या आत अटारी सीमेकडून ते भारतात परतले.
सन १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात नागपूरचे फ्लाइट लेफ्टनंट विजय तांबे यांनी पराक्रम गाजवत पाकिस्तानच्या हद्दीत आपले विमान घुसविले.… शत्रूंवर हल्ले चढवत त्यांनी विशेष कामगिरी केली.… मात्र, या युद्धात त्यांचे विमान क्षतिग्रस्त झाले आणि ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. या घटनेला आता ४८ वर्षे झाली आहेत. आजही ते पाकिस्तानच्या कारागृहातच आहेत. जांबाज विजय भारतात येणार याच अपेक्षेने त्यांचे कुटुंबीय आजही लढा देत आहेत.
विजय तांबे यांचे काका मधुसूदन तांबे नागपुरातील पांडे लेआउट येथे राहतात. 'मटा'ने त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. दोन दिवसांत विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झाल्याचे वृत्त ९२ वर्षांचे मधुसूदन दूरचित्रवाहिन्यांवर बघत होते. विंग कमांडर अभिनंदन यांची अवघ्या ५६ तासांत पाकिस्तानातून सुटका झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. याचवेळी ४८ वर्षांपासून पाकिस्तानच्या कैदेत असलेला पुतण्या फ्लाइट लेफ्टनंट विजयला सोडविण्याची संघर्षगाथाही त्यांच्या मुखातून बाहेर पडली.
'फ्लाइट लेफ्टनंट विजय तांबे इज मिसिंग'
नागपूरकर असलेले विजय यांचे शिक्षण बिशप कॉटन स्कूलमध्ये झाले. पुढे आपल्या कर्तबगारीने ते फ्लाइट लेफ्टनंट झाले. अंबाला येथे त्यांचे पोस्टिंग होते. बॅडमिंटनपटू असलेल्या दमयंती यांच्याशी त्यांनी विवाह केला. १९७१च्या भारत-पाक युद्धात फ्लाइट लेफ्टनंट विजय मिग-२१ या विमानावर स्वार होत शत्रूंवर तुटून पडले. मात्र, ५ डिसेंबर १९७१मध्ये मुख्यालयातून एक संदेश आला…, 'फ्लाइट लेफ्टनंट विजय तांबे इज मिसिंग'. त्यानंतर विजय हे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असल्याचे वृत्त पाकिस्तान हेरॉल्डमध्ये प्रसिद्ध झाल्याचे त्यांचे काका मधुसूदन यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा
विजय यांच्या पत्नी दमयंती पतीच्या शोधात पाकिस्तानलाही जाऊन आल्या. मात्र, पतीची भेट होऊ शकली नाही. काका मधुसूदन, छोटे भाऊ प्रदीप आदी सर्वांचा विजय यांच्या सुटकेसााठी लढा सुरू आहे. चुलतकाका जयंत जटार पाकिस्तानी कारागृहात जाऊन विजय यांना भेटून आले होते. सरकारचे प्रयत्न अपुरे पडले असल्याची खंत काका मधुसूदन यांनी व्यक्त केली. भारताने पाकिस्तानचे ९३ हजार सैनिक परत केले. पाकिस्तानच्या कैदेत असलेले ५४ सैनिक परत यावेत, अशी एकच अपेक्षा मधुसूदन यांनी व्यक्त केली. आपल्या भावाच्या सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा विजय यांचे पुण्यात राहणारे छोटे बंधू कर्नल प्रदीप तांबे यांनी व्यक्त केली.
साभार:महाराष्ट्र टाइम्स