पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलन चिमुरात
अध्यक्षपदी प्रा. दीपककुमार खोब्रागडे
चंद्रपूर - जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूर यांच्या वतीने पहिले अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन दि १६ व १७ मार्च रोजी चिमूर, जि . चंद्रपूर येथे घेण्यात येत आहे़ साहित्यिक, कवी, समीक्षक व विचारवंत तसेच डॉ़ आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमी येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
जागतिक आंबेडकरवादी कार्यकारी मंडळ व चिमूर येथील संमेलन आयोजकाची नुकतीच बैठक झाली. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस करतील, तर प्रमुख अतिथी ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी राहतील. त्याचप्रमाणे दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय किर्तीचे विचारवंत व लेखक अशोक भारती, भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, किशोर गजभिये (आयएएस) विशेष उपस्थिती म्हणून संमेलनात सहभागी होणार आहेत.
प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांचा जन्म खापरी (ध) ता . चिमूर येथे झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतिकारी चिमूर भागात हे साहित्य संमेलन होत असल्याने आयोजन समितीने त्यांच्या नावाचा प्रस्ताव महामंडळाकडे पाठविला होता़ चिमूर परिसरातील साहित्यिकाची, त्यांचे वाङ्मयातील योगदान लक्षात घेवून निवड केली. खोब्रागडे यांचे एकूण १६ ग्रंथ प्रकाशित आहेत.