Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट ०२, २०२३

सौर ऊर्जानिर्मिती पॅनेलच्या कार्यक्षमतेसाठी ‘स्पार्क’ उपकरण विकसित

महावितरणचे मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ यांचे संशोधन
नागपूर:
 सौर ऊर्जेच्या पॅनेलमधून वीज निर्मितीची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी ‘स्पार्क’ उपकरणाची (Solar Panel Analysing and Reporting Kit - SPARK) निर्मिती करण्यात आली आहे. महावितरणचे मुख्य अभियंता (चाचणी) डॉ. मनीष वाठ यांनी या उपकरणाचे संशोधन केले आहे. नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेमध्ये (VNIT) विकसित या उपकरणाची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली.

केंद्र व राज्य शासनाच्या प्रोत्साहनामुळे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना वेग आला आहे. नागरिकांकडून देखील प्रतिसाद वाढत आहे. सौर ऊर्जेच्या निर्मितीमध्ये सौर फोटोव्होल्टेइक (पीव्ही) पॅनेल केंद्रबिंदू आहे. सौर पॅनेलद्वारेच सूर्याच्या उष्णतेचा, ऊर्जेचा उपयोग करून त्याचे वि‍जेमध्ये रुपांतर केले जाते. प्रत्येक सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये निर्धारित वीजनिर्मितीच्या क्षमतेनुसार सौर पॅनेल बसविले जातात. मात्र वीजनिर्मितीच्या क्षमतेत सातत्य राखण्यासाठी साधारणतः २५ वर्षांचे आयुर्मान असलेल्या सौर पॅनेलची देखभाल व दुरूस्ती अतिशय महत्वाची आहे. सौर पॅनेलकडून निर्धारित क्षमतेएवढी वीजनिर्मिती होत नसल्यास त्यासाठी कारणीभूत सौर पॅनेलमधील बिघाड, दोष किंवा विविध प्रकारचे अडथळे याबाबतची तपासणी व देखरेख ठेवण्यासाठी मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ यांनी ‘स्पार्क’ तंत्रज्ञान विकसित केले आहे. याद्वारे सौर फोटोव्होल्टेइक (पीव्ही) पॅनेलमधील बिघाड त्वरित शोधले जाऊन निर्धारित क्षमतेएवढी सौर ऊर्जा निर्मितीमधील सातत्य कायम ठेवणे आता शक्य झाले आहे.

‘स्पार्क’ उपकरणामध्ये प्रामुख्याने सौर पॅनेलच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी देखरेख प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यासाठी पॅनेलच्या आवश्यक सर्व घटकांचा वारंवार आढावा घेतला जातो. तसेच फोटोव्होल्टेइक (पीव्ही) पॅनेलसाठी किमान व्होल्टेज सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. या सेन्सरद्वारे पॅनेलच्या निर्धारित केलेल्या क्षमतेएवढ्या वीजनिर्मितीमध्ये काही अडथळे आल्यास ते शोधले जातात व त्याची माहिती दिली जाते. पीव्ही पॅनेल्सच्या आऊटपूट व्होल्टेजचे सातत्याने निरीक्षण, विश्लेषण व रिअलटाईम मॉनिटरींग केले जाते. तसेच निर्धारित व प्रत्यक्ष सुरु असलेली सौर ऊर्जा निर्मिती यांची तुलना केली जाते. सौर पॅनेलमधील ओपन सर्किट व शॉर्ट सर्किटची माहिती दिली जाते. त्यासाठी या उपकरणात खास डिस्प्ले युनिट बसविण्यात आले आहे.

किफायतशिर खर्चात तयार करण्यात आलेले ‘स्पार्क’ उपकरण देखभालमुक्त आहे. वापरासाठी वीजदेखील अत्यंत कमी लागते. तसेच सौर पॅनलमधील दोष हे उपकरण अचूकपणे शोधत असल्याचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत झालेल्या चाचणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सौर पॅनेलच्या निर्धारित क्षमतेएवढ्या सौर ऊर्जा निर्मितीचे सातत्य कायम ठेवणे या उपकरणाद्वारे शक्य झाले आहे. मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ संशोधित या उपकरणाच्या पेटंटसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या संशोधनासाठी डॉ. वाठ यांना डॉ. मकरंद बल्लाळ (नागपूर) यांनी मार्गदर्शन केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.