जिल्ह्यातील उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जात आहे. परंतु, संबंधित यंत्रणेकडून प्रदूषण कमी करण्यासंदर्भात कोणत्याच उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे मागील काही दिवसांत चंद्रपूर शहर व जिल्ह्यात प्रदूषणाच्या समस्येने गंभीररूप धारण केले आहे. यामुळे अनेक नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. तर, दुसरीकडे प्रदूषणामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रदूषण तातडीने कमी करून पिकांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी विधानपरिषदेत केली आहे.
चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. चंद्रपूर शहराच्या सुमारे २५ किलोमीटरच्या परिसरात सर्वाधिक उद्योगधंदे आहेत. यात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, वेकोलिच्या खाणी, कोलवॉशरिज, एमआयडीसी, स्पॉन्ज आयर्न, सिमेंट कारखाने यांचा समावेश आहे. या उद्योगांतून बाहेर पडणारे पाणी प्रक्रिया न करता सोडण्यात येत आहे. रात्रीच्या सुमारास या उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जात आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना शद्ध हवा मिळणे कठीण झाले आहे. यासोबतच प्रदूषणामुळे परिसरातील शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे.
परंतु, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा प्रकार येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रदूषण तातडीने कमी करून पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार अडबाले यांनी केली आहे.
सभापतींनी दिले बैठक घेण्याचे निर्देशआमदार सुधाकर अडबाले यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाची गंभीरता सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर विधानपरिषदेच्या सभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी यांसदर्भात तातडीने बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. तर, मंत्री दीपक केसरकर यांनी, चंद्रपूर जिल्ह्यातील एमआयडीसी, सिमेंट कारखाने यासह अन्य दोन अशी एकूण चार ठिकाणे निर्धारित करून प्रदूषण कमी करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच पिकांच्या नुकसानभरपाईसंदर्भात तातडीने चौकशी करून कार्यवाही केली जाईल, असे या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले