जनता महाविद्यालयात वन्यजीव सप्ताहाची सांगता
जंगल आणि वन्य जीवांच्या अप्रत्यक्ष सेवांचा अभ्यास करा : डॉ. जितेंद्र रामगावकर
जनता महाविद्यालय चंद्रपूर येथे वन्यजीव सप्ताह विविध पर्यावरणीय आणि वन्यजीव विषयक उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. वन्यजीव सप्ताहाचे आयोजन महाविद्यालयातील भूगोल, पर्यावरण अभ्यास, वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विभागांच्या वतीने जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष तसेच चांदा शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात केले गेले होते. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने जनता महाविद्यालयात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वन्यजीव विषयक जनजागृती पर मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेचा विषय चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यजीव असा होता, तर चित्रकला स्पर्धेचा विषय चंद्रपूर जिल्ह्यातील तृणभक्षी मांसभक्षी प्राणी तसेच पक्षी असा होता. जनता महाविद्यालयातील कला वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला. निबंध स्पर्धेचे पहिले बक्षीस बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी शुभम अर्जुन बोंगाडे याने, दुसरे बक्षीस बीएससी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी देवयानी संजय चंद्रगिरवार हिने तर तिसरे बक्षीस बीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी मुस्कान नरुलहक खान हिने पटकावले. चित्रकला स्पर्धेत प्रथम बक्षीस एमएससी द्वितीय वर्षाचा रोहित तळवेकर या विद्यार्थ्याने पटकावले, द्वितीय बक्षीस बीएससी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी अर्थिका उपाध्ये हिने तर तृतीय बक्षीस एमएससी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी साक्षी कोलोजवार हिने पटकावला. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा रोख बक्षीस, पर्यावरणावर आधारित पुस्तक तसेच प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, स्पर्धेत भाग घेणार्या सर्व विद्यार्थ्यांना उपस्थिती प्रमाणपत्र दिले गेलेत.
वन्यजीव सप्ताहानिमित्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ जितेंद्र रामगावकर यांनी चंद्रपूर परिसरातील वन आणि वन्यजीव यांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सेवा मनुष्याला कशा मिळतात याचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले पाहिजे असे आवाहन केले. वनातून लाकूड हे मनुष्य मिळवतो ही प्रत्यक्ष सेवा आहे परंतु जंगले मनुष्याला शुद्ध हवा देतात, तुमच्या घरी येणारे शुद्ध पाणी हे जंगलामुळेच गुणवत्तापूर्ण आणि शुद्ध असते, तुम्ही जो श्वास घेत आहे ती हवा जंगलांच्या द्वारेच शुद्ध केली जाते अशा कितीतरी अप्रत्यक्ष सेवा जंगले आणि वन्य जीव देतात. विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी, प्राध्यापकांनी, या सेवांचे निरीक्षण केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मंचावर जनता महाविद्यालयातील मानवशास्त्र विभागाचे प्राचार्य डॉ. आशिष महातळे यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती, याशिवाय विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. कुंदन पाटील, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेचे उपप्राचार्य डॉ. विनायक बोढाले, महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पृथ्वीराज खिंची वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मुकुंद शेंडे, पर्यावरण अभ्यास विभागाचे समन्वयक डॉ. योगेश दुधपचारे इत्यादींची विचारपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. योगेश दुधपचारे यांनी केले, संचालन बीए अंतिम वर्षाची विद्यार्थिनी मेघा बोरकर हिने केले तर आभार प्रदर्शन अंजली कोटनाके हिने केले. कार्यक्रमाला डॉ. सचिन मिसार, डॉ उमाकांत देशमुख, डॉ. ज्ञानदेव गायधने, निर्दोष दहिवले, दिनेश चामाटे, प्रभाकर नेवारे, सचिन सुरवाळे, भागवत शेंडे तसेच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.