शशांक कुलकर्णी यांच्या पुस्तकाचा डोगरी भाषेतील अनुवाद जम्मू काश्मीर चे साहित्य विश्व समृद्ध करेल : महामंडलेश्वर स्वामी अक्षरानंद गिरी
विदर्भातील शेतकरी आत्महत्यांवर संशोधन करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी धोरण शास्त्रज्ञ शशांक कुलकर्णी यांच्या मराठी पुस्तकाचा डोगरी भाषेत नुकताच अनुवाद झाला आहे. या निमित्त झालेल्या कार्यक्रमात महामंडलेश्वर स्वामी अक्षरानंद जी या बहुचर्चित डोगरी अनुवादित पुस्तक 'वैज्ञानक अध्यात्मवाद दी बत्ते पर चलने दी' या पुस्तकावर निरंजन संन्यास वेदांत आश्रम, ग्राम पाटी, जम्मू काश्मीर येथे बोलत होते .
मराठीतून डोगरीत आलेला हा ग्रंथ जम्मू काश्मीर राज्याच्या आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देईल, असे स्वामीजी म्हणाले. मानवी जीवन परिपूर्णतेने जगण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणे अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात हे पुस्तक महत्त्वाचे आहे. मध्य प्रदेशातून आलेले स्वामी राजेश्वरानंद जी आणि आचार्य गोविंद जी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
या मूळ मराठी पुस्तकाचा अनुवाद जम्मू काश्मीर कल्चरल अकादमीच्या संपादक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डोगरी लेखक डॉ. रत्न बसोत्रा यांनी केला आहे. या पुस्तकास डोगरी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. ओम गोस्वामी यांची प्रस्तावना प्राप्त झाली आहे. हे जम्मूच्या हायब्रो पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला महाराष्ट्राचा महत्त्वाचा संत तुकाराम संत साहित्य पुरस्कार मिळाला आहे.
शशांक कुलकर्णी हे प्रख्यात कवी, लेखक, वक्ता आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी धोरण शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म १९९० साली महाराष्ट्रातील साखराळे (जिल्हा सांगली) गावात झाला.
त्यांनी लोकनीती आणि लोक प्रशासन विभाग, जम्मू केंद्रीय विद्यापीठात विद्यापीठ अनुदान आयोगाचा वरिष्ठ संशोधक म्हणून विशेष काम केले आहे. त्यांच्या संशोधन आणि लेखन कार्यासाठी जगातील विविध देशांनी त्यांचा गौरव केला आहे.
विविध विषयांवर त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये दहाहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल्समध्ये लेखन केले आहे. पूज्य द्वारकानाथ शास्त्री राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना 'बाबा लक्ष्मण दास राष्ट्रीय स्मारक निर्माण सेवा समितीचे प्रणेता म्हणूनही ओळखले जाते, ही जम्मू आणि काश्मीरची एक अभिनव सामाजिक आणि आध्यात्मिक चळवळ आहे. भारताच्या शेतकरी धोरणाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या मूलभूत संशोधन कार्याची दखल घेऊन दक्षिण अमेरिकेतील प्रसिद्ध स्वाहिली विद्यापीठाने त्यांना सन्मानित केले आहे.
Translation in Dogri language will enrich the literature of Jammu and Kashmir: Mahamandleshwar Swami Aksharananda Giri