Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, सप्टेंबर ०३, २०२३

खाणीच्या पाण्यात पोहताना तीन मित्र बुडाले | Breaking news




यवतमाळ : वणी शहरातील तीन अल्पवयीन मुले शनिवारी दुपारी शहरापासून जवळच असलेल्या वांजरी येथे लाँग ड्राईव्हला गेले होता. त्या ठिकाणी एका बंद असलेल्या खाणीच्या तळ्यात पोहण्याचा त्यांना मोह झाला. मात्र त्या ठिकाणी तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. संध्याकाळी ही घटना उघडकीस येताच वणी शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र रविवार पहाटेच्या सुमारास त्यांचे मृतदेह सापडले.

माहितीनुसार आसिम अब्दुल सत्तार शेख (१६), नुमान शेख सादिक शेख (१६) वर्ष दोघेही रा. एकता नगर व प्रतीक संजय मडावी (१६) वर्ष रा. प्रगती नगर असे मृताचे नाव आहे. ते तिघेही वणी येथील एका महाविद्यालयात ११ वी मध्ये शिक्षण घेत होते. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे.

सुटीच्या दिवशी किंवा वेळ मिळाला की ते लाँग ड्राईव्हला जायचे. बाहेर जाऊन फोटो काढण्याची त्यांनी आवड होती. शनिवार असल्याने ते त्यांच्या मोपेडने (MH२९ Y५३४२) शहरापासून जवळच असलेल्या नांदेपेरा रोडवरील वांजरी परिसरात फिरायला गेले. तिथे त्यांनी मोबाईलवर सेल्फी काढल्या व काही रिल्स देखील तयार केल्या.

वांजरी परिसरातच आधी चुनखडकाची खाण होती. मात्र यातील खनिज संपल्याने ही खाण बंद झाली आहे. त्यामुळे या जागेवर विस्तीर्ण असा खड्डा तयार झाला आहे. पावसाचे पाणी साचून येथे छोटा तलाव बनला आहे. सदर तलाव हा सुमारे १५० ते २०० फूट रुंद व सुमारे ६० फूट खोल आहे.

तळे बघून या तिघांनाही यात पोहण्याची इच्छा झाली. त्यांनी आपले कपडे, चप्पल बाजूला काढले तर मोबाईल त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवले व ते पाण्यात पोहायला गेले. मात्र त्यानंतर ते बाहेर आलेच नाही. संध्याकाळ होत आली तरी मुली घरी परतले नाही. या मुलांजवळ असलेला मोबाईल सुरु होता. मुलांचे पालक त्या मोबाईलवर सातत्याने कॉल करीत होते. मात्र मोबाईलवर केवळ रिंगच जात होती. वांजरी येथील स्वप्रिल रहाटे नामक एका शेतकऱ्यांची वांजरी शेतशिवारात शेती आहे. ते संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास शेतातून बैल घेऊन घरी जात होते. दरम्यान त्यांना या खड्ड्याजवळ मुलांची मोपेड उभी असलेली आढळली. त्यामुळे ते त्या तळ्याजवळ गेले. तिथे त्यांना डिक्कीतून मोबाईलची रिंग वाजत असल्याचे आढळले. बाजूला कपडे असल्याने त्यांना संशय आला व मात्र डिक्की लॉक असल्याने ते तातडीने वांजरी येथे परतले. स्वप्निल यांनी गावातील काही लोकांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. दरम्यान मुलांचे पालक सातत्याने कॉल करीत असल्याने मुलांच्या मोबाईलची रिंग वाजत होती. एकाने कपडे चेक केले असता त्यांना त्यात दुचाकीची चाबी आढळली. त्या चाबीने त्यांनी डिक्की उघडली व मोबाईल रिसिव्ह केला. गावकऱ्यांनी त्यांना घटनास्थळ सांगून मुले घटनास्थळी नसल्याची माहिती दिली. मुलांच्या पालकांनी तातडीने वणी पोलिसांना संपर्क साधत मुले बेपत्ता असल्याची माहिती दिली व ते घटनास्थळी रवाना झाले.

ठाणेदार अजीत जाधव यांनी तातडीने याची माहिती गोताखोरांना दिली. त्यांच्या मदतीने संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास शोधमोहिमेला सुरुवात झाली. मात्र रात्री उशिर झाल्याने ८ वाजताच्या सुमारास शोधमोहीम थांबवण्यात आली. दरम्यान या ठिकाणी पोलिसांचे पथक व गोताखोर तळ ठोकून होते. रात्री उशिरा एकाचा मृतदेह वर आला तर पहाटे दोघांचे मृतदेह मिळाले.

अल्पवयीन मुलांचा बुडुन मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.