Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे ०२, २०२२

चंद्रपूरात महाराष्‍ट्र राज्‍य वृत्‍तपत्र विक्रेता संघटनेचे राज्‍यव्‍यापी अधिवेशन



वृत्‍तपत्र विक्रेता वृत्तपत्र क्षेत्रात रक्‍तवाहीनीचे काम करतो – आ. सुधीर मुनगंटीवार


सोन्‍यासारखे मुलद्रव्‍य प्राप्‍त व्‍हायला त्‍यालाही तप्‍त अग्‍नीतुन जावे लागते तसेच तुम्‍ही जगातील सर्वात उष्‍ण शहरात आला आहात. इथून जाताना तुम्‍ही सुध्‍दा घडून जाल असा मला विश्‍वास आहे, असे विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार पेपर विक्रेते संघाच्‍या महाराष्‍ट्र राज्‍यव्‍यापी अधिवेशनात बोलत होते.

दिनांक २ मे २०२२ रोजी सोमवारला वृत्‍तपत्र विक्रेते संघाचे राज्‍यव्‍यापी अधिवेशन राजीव गांधी कामगार भवन चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले.यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या उदघाटक तेलंगणा न्‍युज पेपरचे सेल्‍स कमिटीचे वनमाला सत्‍यम, महाराष्‍ट्र टाईम्‍सचे संपादक श्रीपाद अपराजीत, भाजपा महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपाध्‍यक्ष रामपाल सिंह, जिल्‍हा बार असोसिएशनचे माजी सचिव अॅड. सुरेश तालेवार, महाराष्‍ट्र राज्‍य वृत्‍तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्‍यक्ष सुनिल पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, कोषाध्‍यक्ष गोरख भिल्‍लारे, सल्‍लागार शिवगोंडा खोत, विनोद पन्‍नासे, प्रशांत विघ्‍नेश्‍वर, संजय वद्दलवार, राजेश सोलापन यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, शरीरामध्‍ये रक्‍तवाहीनी ज्‍या पध्‍दतीने कार्य करते तेच काम आयुष्‍यामध्‍ये वृत्‍तपत्र विक्रेता संघटना करीत आहे. जगामध्‍ये सर्वाधिक वाघ असलेला जिल्‍हा म्‍हणून चंद्रपूर आहे. वाघ आपले लक्ष्य पराक्रमाने पूर्ण करतो. तसेच पत्रकार व पत्रकार विक्रेता संघ सुध्‍दा आपले लक्ष्य पराक्रमाने पूर्ण करतो. जसे सुर्योदयाला कधिही उशिर होत नाही तसेच वृत्‍तपत्र घरी यायला वृत्‍तपत्र विक्रेता कधिही उशिर करीत नाही. मी अर्थमंत्री असताना आमच्या कार्यकाळात पत्रकारांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांचे हिताचे संरक्षण यासाठी आमचे सरकार असताना ७ मार्च २०१९ रोजी आम्ही समिती गठीत केली होती, त्या समितीचा अहवाल आता शासनाला सादर करण्यात आला आहे. या अहवालातील शिफारशीची अंमलबजावणी व्हावी या साठी विधानसभेत संसदीय आयुधांचा वापर करून निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडू असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.



१९३० ते १९४८ या काळात महात्‍मा गांधी सेवाग्राम मध्‍ये होते. इथूनच त्‍यांनी देशाच्‍या स्‍वातंत्र्य चळवळीचे नेतृत्‍व केले. त्‍यांचे विचार वृत्‍तपत्रांनीच जगभर पोहचविले. १९४२ मध्‍ये चले जाव चळवळ सुरू झाली त्‍यावेळी चंद्रपूर जिल्‍हयातील चिमूरमध्‍ये सर्वात प्रथम तिरंगा फडकविण्‍यात आला. भारत-चिन युध्‍दामध्‍ये चंद्रपूर जिल्‍हयाने भारत देशाच्‍या मदतीसाठी सर्वाधिक सुवर्णदान केले आहे. अशा या पावन भूमीध्‍ये आयोजकांचे मी अभिनंदन करतो व सत्‍कारमुर्तीना शुभेच्‍छा देतो. सत्‍ता असो अथवा नसो मी कायमच तुमच्‍यासाठी संसदीय आयुधांचा वापर करून तुमचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी प्रयत्‍न करेन असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विनोद पन्‍नासे यांनी केले. यावेळी महाराष्‍ट्रातील विविध जिल्‍हयातून आलेले संघटनांचे पदाधिकारी, एजंट, पत्रकार बंधू आदींची उपस्थिती होती.


State-wide convention of Maharashtra State Newspaper Vendors Association at Chandrapur

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.