Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर १३, २०२१

15 ऑक्टोंबर, जागतिक हातधुवा दिवस |

संयुक्‍त राष्‍ट्र संघाने आरोग्‍य अबाधित राहावे, यासाठी आंतरराष्‍ट्रीय हात धुवा दिवस 15 ऑक्‍टोबर ( October 15, World Handwashing Day) हा दिवस जगात साजरा करण्‍यात येतो. स्‍वच्‍छता आणि आरोग्‍यशास्‍त्र हया गोष्‍टी लोकांच्‍या आरोग्‍यासाठी व विकासासाठी आवश्‍यक आहेत. दरवर्षी लाखो लोग अस्‍वच्‍छतेमुळे मरण पावतात. विशेष करुन मुलांमध्‍ये स्‍वच्‍छतेचा प्रसार करण्‍यासाठी समर्पित प्रयत्‍नांची गरज आहे. विशेषत्‍वाने साबनाचा वापर करुन हात धुणे व स्‍वच्‍छतागृहाचा वापर करण्‍यासाठी शाळेतील मुलांना व त्‍यामार्फत समाजाला जागरुक करण्‍यासाठी एका कल्‍पक राष्‍ट्रीय मोहिमेचा प्रारंभ करण्‍यात आला आहे.

चंद्रपुर जिल्यात सर्वप्रथम संपुर्ण स्वच्छता अभियान, जिल्हा परिषद चंद्रपुर अंतर्गत व युनिसेफ़ यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2011 मध्ये जिल्हास्तरावर जिल्हातील 13000 शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जागतिक हाथधुवा दिवसाचा (World Handwashing Day) भव्य कार्यक्रम घेवुन, एकाच वेळी सर्व विद्यार्थांना साबणाने हाथ स्वच्छ कसे धुवायचे, या प्रात्याक्षिकासह, मोठ्या स्वरुपाचा संदेश देण्यात आला होता. या कार्यक्रमाचे फ़लित असे झाले की, सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीने चंद्रपुर जिल्ह्यातील प्रत्येक कुंटुबा पर्यंत हाथ धुण्याचा संदेश देता आला.

 आपणां सर्वांना हे माहित आहे की, जिवाणू, विषाणू, परोपजिवी यासारख्‍या अनेक जिवाणूंपासून अतिसार व इतर रोग होतात. मानवी विष्‍ठा ही अतिसाराच्‍या रोग वाहकाचा प्रमुख स्‍त्रोत आहे. हे रोग वाहक विषमज्‍वर, कॉलरा, जंतांचा संसर्ग, चिकन गुनीया स्‍वाईनफ्ल्‍यू, कोरोणा, श्‍वसन संस्थेशी संबंधित काही रोग यांचाही स्‍त्रोत आहे. एक ग्रॅम विष्‍ठेमध्‍ये एक कोटी विषाणू, दहा लाख जिवाणूं व एक हजार परोपजिवी अंडी व कोष असतात. माशा, हात, द्रवपदार्थांमधून या रोगांचा प्रसार मोठया प्रमाणात पसरतो.

आपला हात आरोग्याच्या दृष्टीने एक महत्वाचा अवयव आहे. आपण अन्न सेवन आपल्या हातांनी करीत असतो. म्हणूनच या हातांची स्वच्छता ही महत्वाची ठरत असते .आपल्या हातांच्या स्वच्छतेवर आपल्या पोटाचे आरोग्य अवलंबून आहे. नियमितपणे हात स्वच्छ ठेवणे यासाठीच आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी बाहेरुन आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुण्याची प्रथा होती. त्यासाठी अंगणात कायम पाण्याची एक बादली भरुन ठेवलेली असायची आता काळाच्या ओघात ही परंपरा मागे पडली आहे. शास्त्रोक्त पध्दतीने विचार केल्यास ती पध्दत योग्यच होती . हे आपणास सांगता येईल, व मान्य सुध्दा केलेच पाहीजे.

आपण विविध ठिकाणी वेगवेगळया वस्तूंना कामानिमित्य स्पर्श करीत असतो. त्या पदार्थावर वातावरणातील धुळीसोबत जीव-जंतूंचा संसर्ग झालेला असतो त्यामुळे कुठेही आणि कधीही अन्नसेवन करण्यापूर्वी हात स्वच्छ धूवून घेणे आवश्यक आहे. असे न केल्यास ते जीव जंतू हातांच्या माध्यमातून पोटात जातात. यातून अगदी विषबाधेपर्यंत धोका असतो. शौचाला जाऊन आल्यानंतर तसेच लघवीहून आल्यानंतर हात धुणे अत्यंत आवश्यक आहे. लहान मुलांना आपण याची जाणीव करुन द्यायला हवी. लहान मुले ब-याचदा मातीत खेळतात, ही माती अनेक जीवजंतूचा साठा असू शकते . त्यामुळे त्यांना वेळोवेळी नखे कापण्याची सवय आपण लावायला हवी . या नखातील माती हात धुतल्याने निघत नाही, मात्र जेवताना त्याचे अंश पोटात जात असते. त्यातून आरोग्य हमखासपणे बिघडते. म्हणूनच पालकांनी याबाबत जागरुक राहण्याची आवश्यकता आहे. नखे वाढविण्याची सवय मोठया व्यक्तींनाही असते. पाश्चात्य पध्दतीने अनुकरण करताना आपण असे करतो. मात्र पाश्चात्य संस्कृतीत जेवण हे काटयाच्या चमच्याने केले जाते. हातांचा स्पर्श देखील अन्नाला होत नाही . हे आपण लक्षात ठेवायला हवे. आपल्या हातांची स्वच्छता राखणे म्हणजे आरोग्य संपन्न होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकणे होय. त्यासाठी आता निर्धार करा आणि आरोग्य संपन्न व्हा.

इ.स.1840 मध्‍ये डॉ.ईगनाज, सेमेलवाईस यांनी हात धुण्‍याचा महत्‍वाचा शोध लावला. युरोपमध्‍ये एका शैक्षणीक इस्पितळात ते डॉक्‍टर होते. दवाखाण्‍यात बाळांतपणासाठी येणा-या महिलांचा मोठया प्रमाणात मृत्‍यू होत होता. एका प्रयोगामध्‍ये त्‍यांनी सर्व वैद्यकीय विद्यार्थ्‍यांना व इतर डॉक्‍टरांना स्‍त्रीला हात लावण्‍यापूर्वी स्‍वच्‍छ हात धुण्‍यास सांगितले. केवळ या हात धुण्‍यामुळे प्रसूती विभागातील मृत्‍यू जवळ-जवळ 50% नी कमी झाले. अशा रितीने हात धुण्‍याचा महत्‍वाचा शोध लागला. जे लोक नियमित हात स्‍वच्‍छ ठेवतात त्‍यांचे आरोग्‍य नेहमीच चांगले राहते. शाळेत जाणा-या विद्यार्थ्‍यांची संख्‍या मोठी असल्‍यामुळे त्‍याच्‍या मार्फत घरा-घरात हात धुण्‍याचा व स्‍वच्‍छतेचा संदेश देण्‍यात येणार आहे. स्‍वच्‍छतेच्‍या सवयी शाळेतून लागाव्‍यात यासाठी मुलां-मुलींसाठी स्‍वतंत्र स्‍वच्‍छतागृहाची सोय करण्‍यात आली आहे. ते स्‍वच्‍छ व वापरात राहण्‍यासाठी शाळेसह गावक-यांनी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. जगात वाढत चाललेले कोरोणाचे संक्रमण, यात मोठ्या प्रमाणात वेळोवेळी गरजेनुसार हाथ साबणाने स्वच्छ धुण्यास व सर्वांगिण स्वच्छ्तेला महत्व दिले आहे. प्रत्येक कुंटुबा पर्यंत आज हा संदेश गेला असुन, आजच्या काळात पुन्हा हाथ केव्हा व कधी धुवावे . हे स्वतःहुन आत्मसात करण्याची वेळ आली असुन, सर्वांगिण स्वच्छतेसह वेळोवेळी हाथ साबनाने स्वच्छ धुतले पाहिजे. हा एक नित्याचा व चागंल्या सवयीचा भाग असायलाच हवा.

हात धुण्‍यासाठी शाळा व गावपातळीवर मोठया प्रमाणात जनजागृती करण्‍यात येत आहे. पुष्‍कळ लोकांना हात कसे धुवावे हे माहितीच नाही. हात धुण्‍याच्‍या योग्‍य पध्‍दतीचे पाच टप्‍पे आहेत. सुरुवातीला पाण्‍याने हात ओले करावे व त्‍यानंतर हाताला साबण लावावी. हाताचे तळवे एकमेकांवर घासावे. बोट एकमेकांत अडकवून ती एकमेकांवर घासावी. उजव्‍या हाताच्‍या बोटांची टोके डाव्‍या हाताच्‍या तळव्‍यावर गोल फिरवून घासावी आणि त्‍यानंतर तीच क्रिया दुस-या हाताने करा म्‍हणजे नखं स्‍वच्‍छ होतील व पाणी वापरुन हात खळवळून घ्‍यावेत. या पाच टप्‍प्‍याव्‍दारे हाताची स्‍वच्छता करणे गरजेचे आहे. याचे प्रात्‍यक्षिक प्रत्‍येक गावात आज दिनांक 15 ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात यावे, जिल्‍हयातील सर्व ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडयांमधून कार्यक्रमांचे आयोजन केल्यास. हात धुण्‍याच्‍या प्रात्‍यक्षीकातून लोकांना हात धुण्‍याची सवय लागेल. शालेय विद्यार्थ्‍यांमार्फत घरातील सर्व सदस्‍यापर्यंत हा संदेश देता येईल. या संदेशाचे सर्वस्‍तरातून वापर झाला तर, सर्वांचे हात स्‍वच्‍छ राहतील. परिणामी रोगराईस आळा बसेल यात शंका नाही. आपल्या सभोवतालच्या परिसरात हानीकारक किटाणू असतात आणि हे किटाणू अस्वच्छ हाताला स्पर्श केल्यास ,दुषित पाणी किवा अन्नातून ,खोकल्यातून किंवा शिंकेतून बाहेर येणाऱ्या हवेद्वारे ,आजारी व्यक्तीच्या शरीर द्रव्याच्या संपर्कात आल्यास, शरीरात प्रवेश करतात आणि यातूनच पुढे मेंदू, फुफ्फुस्, यकृताचे दुर्धर आजार जडतात, त्यामुळे हात धुणे किती महत्वाचे आहे हे लक्षात येते. परंतु या रोगांपासून बचाव करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे तो म्हणजे "स्वच्छ हात धुणे".

स्वच्छ हात कसे धुवावे?
World Handwashing Day
हात धुण्यासाठी साबणाचा वापर करावा, प्रथम हात पाण्याने ओले करुन त्यावर साबण घासावी, दोन बोटांमधील जागा तसेच नखाच्या खालचा भाग व मनगटे घासावी, हात धुण्याची क्रिया कमीत कमी 20 सेकंदा पर्यंत चालने आवश्यक, हात धुवून झाल्यानंतर स्वच्छ कापडाने किंवा टॉवेलने हात पुसावे, आपल्या मुलांसमोर किंवा शाळेत विद्यार्थ्यां समोर आपण वारंवार हात धुतल्यास मुले ते पाहून पाहून शिकतील.

हात कधी धुवावे
World Handwashing Day
जेवणाआधी व स्वयंपाकापुर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर, झाडझूड केल्यानंतर, पाळीव प्राणीमात्रांना स्पर्श केल्यानंतर, आजारी व्यक्तीच्या भेटीपुर्वी व नंतर बाहेरुन खेळून, फिरुन आल्यानंतर, दुसऱ्यांच्या खोकला किंवा शिंकेच्या संपर्कात आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावेच. हात धुण्याला कमी लेखू नका, त्याला आपली सवय बनवा, स्वच्छ हात धुतल्याने तुमचा डॉक्टरकडे जाण्याचा चक्कर, पैसा , वेळ, श्रम वाचेल व आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.यातुनच स्वतःसह देशाच्या विकासात हाथ भार लावण्यास मदत झाल्या शिवाय राहणार नाही.स

- कृष्णकांत म. खानझोडे, माहिती शिक्षण संवाद तज्ञ, जि. प. चंद्रपूर.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.