Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर १३, २०२१

परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानणारा बौद्धधम्म आपणास दिला- हरिश्चंद्र लाडे


प्रशिक बुद्ध विहारात आज पासून तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन

संजीव बडोले/प्रतिनिधी

नवेगावबांध ता.१३ ऑक्टोबर:-

परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानणारा बौद्धधम्म आपणास दिला. प्रज्ञा,शील, मैत्री या तत्वांशी आपल्या जीवनाची सांगड घातली. विज्ञाननिष्ठ, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता हे तत्व मानणारा, मैत्रीला अग्रस्थान देणारा धम्म असून बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली ही देणगी आहे. हे तत्त्व आपण जीवनात अंगीकारले पाहिजे. असे प्रतिपादन प्रबोधनकार हरिश्चंद्र लाडे यांनी केले. ते नगर बौद्ध समाज नवेगावबांध च्या वतीने आज दिनांक 13 ऑक्टोंबर रोज बुधवारला दुपारी तीन वाजता आयोजित अशोक विजयादशमी निमित्त धम्म प्रबोधन कार्यक्रमात बोलत होते. आज धम्म प्रबोधनाचे पहिले पुष्प होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबोधनकार हरिश्चंद्र लाडे हे होते. तर अतिथी म्हणून प्रा. अश्विन लांजेवार, सपना बनसोड, भास्कर बडोले ,भीमराव मोटघरे, समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे,कोषाध्यक्ष देवदास बडोले,दुर्योधन राऊत उपस्थित होते.

प्रारंभी अतिथींच्या हस्ते विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना दीप प्रज्वलित करून व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

सर्वांना बुद्ध धम्माची जाणीव असणे गरजेचे आहे. प्रबोधन कार्यक्रमातून आपण जे ऐकतो, त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वतःला बदलण्याची मानसिकता बनविणे गरजेचे आहे. मनाचा दृढनिश्चय हाच सर्व वाईट व्यसनावर विजय मिळविण्याचा मार्ग आहे. बाबासाहेबांचा धम्म रथ मागे न नेता, सर्वांनी पुढे नेण्याचे आवाहन प्रा. अश्विन लांजेवार यांनी केले. सपना बनसोड यांनी, जगात दुःख आहे. त्याला कारण आहे. अन ते निवारण्याचे उपायही आहे. अशी विचारसरणी भगवान बुद्धाने जगाला दिली आहे. मी म्हणतो म्हणून ते स्वीकारा असा हट्ट न धरता, जानिए, छानिए और मानिए असे विचार स्वातंत्र्य बुद्धाने जगाला दिले. आपले विचार जगावर लादले नाही. बुद्ध भूमी, बुद्ध व त्यांचे विचार आपणापर्यंत पोचण्याचे अनमोल कार्य बाबासाहेबांनी केले. असे प्रतिपादन सपना बनसोडे यांनी आपल्या भाषणातून केले. भास्कर बडोले यांचेही यावेळी भाषण झाले.

भिमराया मुळे मी पाहिली मंगल धम्म प्रभात ही कविता सरगम शहर यांनी उपस्थितांना ऐकवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजाचे सचिव सरगम सहारे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार हेमचंद लाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदीश सहारे हेमलता बडोले, भिमाबाई सहारे, निरुपा राऊत यांनी सहकार्य केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.