मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. त्यामुळे गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा लवकरच पुन्हा गजबजणार आहेत. राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार सुरु आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक पार पडणार आहे. सध्या आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत.
ब्रेक द चेन अंतर्गत 1 ऑगस्टला जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत. आता लवकरच शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते.
सीएसआर फंडातून राज्य सरकार 471 शासकीय शाळांचं करणार परिवर्तन
सीएसआर फंडातून राज्य सरकार 471 शासकीय शाळांचं परिवर्तन करण्यात येणार आहे. आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि 40 नामांकित कंपन्यांचे उद्योजक उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात सीएसआर फंडातून 471 शाळांच परिवर्तन आहे. या शाळांमध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, इमारत आणि इतर सुविधा उपलब्ध असणार आहेत.
येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा विचार : उदय सामंत
येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असं उदय सामंत यांनी काल सांगितलं. कुलगुरूंची बैठक पार पडली. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे, त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. प्रत्येक विभागात कुलगुरुंना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोनाचा आढावा घ्यायला सांगितला आहे. संपूर्ण स्थितीचा आढावा 15 दिवसात प्राप्त होईल. त्यामुळे 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असं उदय सामंय यांनी सांगितलं.