एलपीजी गॅस घरोघरी वापरला जातो. यात कधी - कधी काही नादुरुस्तीमुळे अडचणी येतात. या त्रुटींचा शोध घेण्यासाठी कळंब येथील एलपीजी गॅसचे वितरक प्रशांत डेहनकर (prashant Deahankar) यांनी उपकरणे तयार केली आहेत. ग्रामायण नागपूरच्या 'सृजनगाथा' कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली. त्यांची मुलाखत श्री. केळापुरे यांनी घेतली.
नॅनोमीटर
एलपीजी वापरात रेग्युलेटर हे सर्वात महत्त्वाचे उपकरण आहे. कधी - कधी यात गळती (लिकेज) होते. हे धोकादायक असते. आधी या गळतीचा शोध घेण्याचे विश्वसनीय असे साधन उपलब्ध नव्हते. वितरकाकडील मेकॅनिकचा याबाबतचा निर्णय अंतिम असायचा. प्रशांत यांनी या गळतीचा शोध घेण्यासाठी 'नॅनोमीटर' तयार केले. या नॅनोमीटरने गळती तपासता येते.
सुरक्षा पाईप कटर
काही वर्ष आधीपर्यंत गॅसचा सुरक्षा पाईप रबरी असायचा. त्याला तडा जाण्याचा, कापल्या जाण्याचा व त्यातून गॅसची गळती होण्याचा धोका असायचा. आता सर्व गॅस कंपन्या स्टीलची जाळी असलेला सुरक्षा पाईप वापरतात. पण, स्टीलच्या जाळीमुळे हा पाईप गरजेनुसार तोडणे कठीण होते. प्रशांत यांनी यासाठी 'सुरक्षा पाईप कटर' तयार केला. आता हा पाईप सहज गरजेनुसार तोडता येतो.
'ओ' (O) रिंग फिक्सर आणि रिमूव्हर
O-Ring removal tool Kit
गॅस सिलेंडरच्या व्हॅल्व्हमध्ये काळ्या रंगाची बारीक 'ओ' रिंग असते. ही रिंग खराब झाली गॅसची गळती होते. ही रिंग काढणे आणि बसवणे बरेच जिकरीचे होते. यासाठी प्रशांत यांनी 'ओ' रिंग फिक्सर आणि 'ओ' रिंग रिमूव्हर अशी दोन उपकरणे तयार केली. आता हे काम अतिशय सोपे झाले आहे. कर्मचाऱ्यांचा वेळ वाचला आहे.
व्हॅल्व्ह लीक डिटेक्टर
The Leak Detector
सिलेंडरच्या व्हॅल्व्हमधील गळती शोधणे हे देखील कठीण आणि जोखीमीचे होते. यासाठी प्रशांत यांनी 'व्हॅल्व्ह लीक डिटेक्टर' तयार केला. हे उपकरण सिलेंडरच्या व्हॉल्व्ह मध्ये टाकले की गळती ओळखता येते.
सिलेंडर ट्रॉली
cylinder trolley
सिलेंडरची हलवाहलव करताना किंवा अरुंद गल्लींमध्ये (जिथे वाहन जाऊ शकत नाही) सिलेंडर डिलेव्हरी बॉयला सिलेंडर खांद्यावर उचलून न्यावा लागायचा. हे काम कष्टदायक आणि थकवणारे होते. प्रशांत यांनी या कर्मचाऱ्यांसाठी 'सिलेंडर ट्रॉली' तयार केली. सिलेंडर डिलेव्हरी बॉयला या ट्रॉलीवर सिलेंडर ठेवून अगदी सहज कुठेही नेता येतो. सौ. सुरभी धोंगडी यांनी श्री डेहनकर यांचा परिचय करून दिला तर श्री किशोर केळापुरे यांनी आभारप्रदर्शन केले.