Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे ३०, २०२१

शेअर्सला तर्कवितर्कांचे बूस्ट!




-    मंगेश दाढे

 "कंपन्यांचे शेअर पायऱ्यांप्रमाणे चढतात आणि लिफ्टसारखे आपटतात", असे एमबीए शिक्षणात आणि शेअर मार्केटच्या प्रशिक्षणात आम्हाला आवर्जून तज्ज्ञ सांगायचे. आज 10 वर्ष या शेअर मार्केटमध्ये असल्यानंतरही उपरोक्त वाक्यात कोणताही बदल झालेला नाही. अनेक क्षेत्रात तर्कवितर्कातून अंदाज बांधले जातात. पत्रकारितेतही तर्कवितर्कातून बातम्या तयार केल्या जातात. पण, पत्रकारितेत पाहिजे तसा पैसा नाही आणि अस्थिरतेचे काळे ढग डोक्यावर कायम असते. त्यापेक्षा भांडवली बाजारातील तर्कवितर्क आत्मसात करून जीवनाला नवी दिशा द्या...!!!

 आधी वेळ द्या
भांडवली बाजारात विचाराच्या पलीकडे पैसा आहे. एक मात्र नक्की 'पैशातून पैशाची निर्मिती करायची आहे', हे विसरू नका. या प्रक्रियेला समजून घ्या, शेअर बाजार काय आहे, तुम्ही यात नवीन असल्यास रोज बाजारातील बारीकसारीक गोष्टी समजून घ्या... जसे की, किती कंपन्या सेन्सेक्स आणि निफ्टीत आहेत. प्रत्येक कंपनीऐवजी मोजक्या कंपनीचा सखोल अभ्यास केल्यास लाभ होईल का, निर्देशांकाची भूमिका काय आहे. जर आज नैसर्गिक आपत्ती आली तर कोणते शेअर आपटू शकतात व कोणते चढू शकतात. तर, कोरोना लसीकरण करतेवेळी आणि झाल्यानंतर कोणते शेअर झेप घेऊ शकतात. यावर विचार करावा. एक उदाहरण देतो, एखाद्या कंपनीला कोरोना लस तयार करण्याचं कंत्राट मिळालं, तर त्या कंपनीचे शेअर आपोआप वाढतील आणि त्यानंतर ती लस पोहचविण्याची जबाबदारी कोणत्या लॉजिस्टिक कंपनीकडे असेल, हे माहित झाल्यास तुम्ही चांगला पैसा त्या शेअरमध्ये गुंतवून कमवू शकता. या बाबी आत्मसात करणे एका रात्रीत शक्य नाही. रोज 2 तास एखाद्या नावाजलेल्या कंपन्याचा अभ्यास करा, नेमके अमुक कंपनीचे शेअर का वाढते. तमुक कंपनीचे का घसरते, याकडे बारकाईने लक्ष द्या.
 

 नोट्स तयार करा
शेअर मार्केट शिकायचे असेल तर स्वतःच्या नोट्स तयार करा. डोक्यात काही मोजक्या नावाजलेल्या कंपनीची माहिती साठवून ठेवा. इतकी ओळख झाली पाहिजे की, कंपनीचे नाव घेताच तिचं चित्र, ती कशाचं उत्पादन करते, किती पदार्थ तयार करते, मागणी आहे काय, आपण त्या कंपनीचे उत्पादन वापरतो काय, या सर्व गोष्टी हळूहळू आत्मसात कराव्या लागतील. यासाठी रोज वृत्तपत्र आणि काही मोबाईल अँप्सचा आधार घेऊ शकता.

 *शेअर का आपटतात?*

“शेअर मार्केटचा ग्राफ कसा वाढतोय आणि कमी होतोय, याचा तंतोतंत थांगपत्ता आजपर्यंत लागू शकलेला नाही,” असे वक्त्यव्य बॉम्बे स्टॉक एक्सचेंचच्या (बीएसई) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही(सीईओ) एका बिझनेस टीव्हीला मुलाखत देताना केले. ही बाब जेव्हा सेन्सेक्सने पन्नास हजारांचा टप्पा ओलांडला तेव्हा सीईओंनी नमूद केली. शेअर घसरण्याची वेगवेगळी कारणे आहेत. फक्त तर्कवितर्क समजून कधी कोणता शेअर घसरेल व कधी उसळी घेईल, याचा अभ्यास करावा. काही वेळा आपण म्हणतो की, कोरोना वाढल्यामुळे शेअर मार्केट घसरला. तर, काही वेळा कोरोनाचा तांडव सुरु असतानाही मार्केट तेजीत होता. कधी-कधी मोठ्या ऑपरेटरकडूनही कंपन्याचे शेअर वर-खाली करण्याचा डाव खेळला जातोय. एक किंवा दोन दिवस मार्केट कोसळला असेल तर तिसऱ्या दिवशी कारण नसताना सावरण्याची शक्ती कशी येते, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याला मोठे ऑपरेटर कारणीभूत आहेत. शेअर मार्केटमध्ये ऑपरेटर हा विषयच वेगळा आहे. ऑपरेटरची कार्यप्रणाली काय आहे, त्यात कोण गुंतले असतात, यावर वेगळा लेख तयार होईल.  

 इकडेही द्यावे लक्ष

काही कंपनीचे न्यायालयात वाद सुरु असतात. अशा वेळी गुंतवणूकदारांनी अभ्यास करून गुंतवणूक करावी. अन्यथा नुकसान होऊ शकते.

*काही कंपन्याचे पदार्थ/उत्पादन ऋतूनुसार बाजारात येतात. (उदा. पावसाळ्यात कृषीसंदर्भातील शेअर कंपनी) तेव्हा उत्पादनाचा सुवर्णकाळ असेपर्यंतच गुंतवणूक ठेवावी आणि नंतर काढून घ्यावी किंवा नाही, याचा विचार कंपनीनुसार ठरवावा.

*एखादी कंपनी एकाच प्रकारचे उत्पादन घेत असेल तर थोडं अभ्यास करूनच गुंतवणूक करावी. एका पेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांचे शेअर घसरल्यास त्या लवकर सावरू शकतात.

*एखाद्या कंपनीच्या एका शेअरचा भाव 5 आणि दुसऱ्या कंपनीच्या शेअरचा भाव 500 रुपये असेल तर कोणत्या कंपनीचे शेअर तुम्ही खरेदी कराल? 5 रुपयाचे शेअर स्वस्त आहेत. मात्र, ते 5 वरून लवकरच 1 रुपये होऊ शकतात व अशा कमी किंमतीच्या शेअरमध्ये जोखीम जास्त असते. 500 रुपयाचा एक शेअर असलेल्या कंपनीची बॅलन्सशीट, टर्नओवर आणि अन्य बाबी मजबूत असतील तर तो शेअर कधी हजारचा पल्ला ओलांडेल,हे तुम्हाला माहितीही पडणार नाही. अर्थात पेनी स्टॉकमध्ये(कमी किंमत)गुंतवणूक करताना जरा सांभाळून.

*काही कंपन्या एव्हरग्रीन असतात. (येथे कंपनीचे नाव घेणे उचित नाही) तेथे गुंतवणूक नक्की करावी. त्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला नक्की नफाच मिळेल.

*कंपनीच्या मोठ्या पदावरील व्यक्तीने तडकाफडकी राजीनामा दिल्यास तेथे गुंतवणूक करताना विचार करावा. कोणती व्यक्ती पदभार स्वीकारणार आहे, यावरून गुंतवणूकीची दिशा ठरवावी.

*देश-विदेशातील मोठ्या गुंतवणूकदारांनी एखाद्या भारतीय कंपनीत गुंतवणूक केल्यास त्या शेअरकडे विशेष लक्ष द्यावे.

*भारतातील कंपनीने विदेशातील कंपनीसोबत करार केल्यास अशा कंपनी लवकर नावारूपास येतात. सोबतच शेअरमध्येही चमक दाखवितात.

*आरबीआयने एखादा प्रकरणात बँकेवर कारवाई केल्यास त्याचा परिणाम त्या बँकेच्या शेअरवर पडतोच. अशा वेळी संबंधित शेअरविषयी सतर्कता बाळगावी.

 *'वेट अँड वॉच'* 

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक म्हणजे गलेलठ्ठ पैसा, असे बोलले जाते. पण, तसे नाही. शेअर मार्केटमध्ये वेळ देऊन संयम ठेवावा लागतो. एका रात्रीत शेअर मार्केटमध्ये श्रीमंत होता येत नाही. त्यासाठी कितीतरी वर्षांच्या रात्रींची प्रतीक्षा करावी लागते. शेअर मार्केटचा अभ्यास करून पैशांची गुंतवणूक केल्यास झटपट पैसे वाढतील, अशी शक्यता कमी आहे. यासाठी 'वेट अँड वॉच'ची भूमिका ठेवावी. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, अन्य गुंतवणूकदार तर रोज लाखो, करोडो रुपये कमवितात. तर तसे नाही त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असते. त्यांना बातम्या आणि चार्टचा चांगल्याप्रकारे अभ्यास असतो. त्यांच्याकडे लाखो, करोडो रुपये दररोज गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध असतात. अर्थात पैशातून पैशांची निर्मिती करण्यात येते. इन्ट्राडे (ज्या दिवशी शेअर घेतले, त्याच दिवशी विक्री केल्यास) पेक्षा गुंतवणूक दीर्घकालीन कधीही उत्तम ठरेल.

 *'चार्ट'ची भानगड?* 

‘चार्ट’ पाहणे म्हणजे काय आहे? ‘चार्ट’ समजल्यास पैशांचा पाऊस पडतो काय? ‘चार्ट’ न समजल्यास शेअर मार्केटमध्ये तग धरता येऊ शकते काय? या सर्वांचे उत्तर ‘चार्ट’चा अभ्यास न केल्यासही पैसे कमवू शकता, हे आहे. चार्टचा अभ्यास केल्यास कोणत्या कंपनीचा शेअर लवकर वर पोहोचू शकतो, नेमका कोणता खाली येऊ शकतो, याचा तर्क लावता येतो. ‘चार्ट’ समजण्यासाठी दोन ते तीन वर्ष दररोज विविध ‘चार्ट’ पॅटर्नचा अभ्यास करावा लागेल. ‘चार्ट’ ऐवजी बातम्याच्या आधारावर तुम्ही शेअर्समधील होणारी घालमेल व गुंतागुंतीचे गणित सोडवू शकला, तर बरेच. मात्र, तुम्हाला कोणत्या बातमीमुळे कोणत्या कंपनीचा शेअर झेप घेऊ शकतो, याचे ज्ञान आत्मसात करावे लागेल. असे केल्यास तुम्ही लवकर या क्षेत्रातून पैसे मिळवू शकता.

 *बाजारात उसळी का?* 

कोरोना रुग्णवाढ आटोक्यात येत आहे. अनेक कंपन्यांचे तिमाही व चौथाई निकाल उत्तम आहेत. जागतिक आणि आशियाई भांडवली बाजारातील अनुकूल सकारात्मकतेमुळे सेन्सेक्समधील 30 व निफ्टीमधील 50 कंपन्याचे शेअर बरेच दिवस हिरव्या आकड्यांमध्ये दिसतात. बऱ्याच दिवसांपासूनचा काळोख दूर सारून निर्देशांक मोठय़ा मुसंडीस कारणीभूत ठरण्यासाठी खालील मुद्देही लक्षात घ्यावे लागतील.

(1) डिसेंबरपर्यंत कोरोना लसीकरण 80% होण्याची शक्यता आहे. यातून बाजारावर असलेले अस्थिरतेचे मळभ दूर होण्यास मदत होईल.

(2) महिनाभरापासून देशस्तरावर दैनंदिन करोनाबाधित रुग्णवाढ कमी होत आहे. एकदम वाढलेली दुसरी लाट ओसरू लागल्याने दिलासा मिळालाय.

(3) अनेक मोठ्या कंपन्यांच्या तिसऱ्या व चौथ्या तिमाहीचे आणि पर्यायाने २०२०-२१ या संपूर्ण आर्थिक वर्षांचे अपेक्षेपेक्षा उत्कृष्ट निकाल आलेले आहेत. यातून बाजार सावरण्यास मदत झाली.

(4)यंदा पर्जन्यमान समाधानकारक असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे शेअर बाजारात संधी उपलब्ध आहेत.

 *फर्म, आरबीआयचा इशारा* 
 
‘सेन्सेक्स डिसेंबरअखेरीस 60 हजारांचा पल्ला गाठेल’, असा विश्वास एका बढ्या फर्मने(शेअर मार्केट कंपन्यांचा अभ्यास करणारी संस्था) केला आहे. तर, ‘निरंतर तेजी ही बुडबुडा ठरण्याची जोखीम आहे, असा दावा आरबीआय करते. तसा अहवालही आरबीआयने प्रसिद्ध केलेला आहे. गुंतवणूकदारांनी सतर्कता ठेवावी. ही तेजीची सुरु असलेली घोडदौड मुख्यत: विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांमुळे आहे. अमेरिका आणि यूरोपमधील वातावरण शांत आहे. सध्यातरी कुठेही युद्धजन्य परिस्थिती दिसत नाही. चीनचा भारतीय बाजारातील प्रभाव ओसरला असून ‘स्वदेशी’ व ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसतोय. आता काही घटकांकडून या उपक्रमाला विरोध होत आहे. पण, याचे परिणाम अत्यंत चांगले भविष्यात दिसतील, असे बँकिग, मार्केट तज्ञ सांगतात. परिणामी, शेअर बाजारात आणखी उसळी पाहायला मिळू शकते, असे फर्मचे म्हणणे आहे. तरीही,हा सर्व खेळ तर्कवितर्कांचा असून कधी कोणते संकट येईल, याचा नेम नाही. त्यासाठी सतर्कता आणि नावाजलेल्या कंपनीच्या शेअरकडे लक्ष दिलेले बरे.

 

(उपरोक्त मत वैयक्तिक आहेत. गुंतवणूक करतांना सल्लागारांचा सल्ला घ्यावा)

 

-मंगेश दाढे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.