सावधान,बनावट फेस बुक खाते बनवीणारी टोळी सक्रिय
नागपूर / अरूण कराळे ( खबरबात )
एक आठवड्यापासून फेसबुकवर आपला फोटो व आपल्या नावाचा वापर करून स्वतःचा नंबर टाकून बनावट दुसरे फेस बुक खाते उघडून आपल्या जवळच्या लोकांना विविध कारणे सांगत पैशाची मागणी करणारी परप्रांतीय टोळी सक्रिय झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वाडी येथील पत्रकार सुरेश फलके यांचे फेसबुक खाते असून ते नियमित वापरत असतात. गुरुवार २७ मे रोजी रिता देवी असे नाव धारण केलेल्या कुणीतरी अज्ञात परप्रांतीय इसमाने सुरेश फलके यांच्या फोटोचा व नावाचा वापर करून व स्वतःचा मोबाईल नंबर टाकून बनावट फेसबुक खाते तयार केले व त्यांच्या फेसबुकवर वर त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवून ज्यांनी रिक्वेस्ट ऍक्सेपट केली त्यांच्या व्हाट्सएपवर माझी फॅमिली अडचणीत आहे.मित्राच्या आजारी मुलीला मदत करायची आहे.अत्यंत महत्त्वाचे काम आहे कृपया मला पैशाची मदत करा असे मॅसेज पाठवून ८ हजार रुपये , १० हजार रुपये, १३ हजार रुपये , १५ हजार रुपये तर कुणाला २० हजार रुपयांची मागणी केली.उदया पैसे परत करतो असाही मॅसेज पाठविला.
समाजसेवेमध्ये तत्पर असणारे वाडी ब्राम्हण सेनेचे अध्यक्ष राजू मिश्रा यांनाही १० हजार रुपये त्वरीत पाठवा असा मॅसेज आला. त्यांनी पत्रकार अरुण कराळे यांना फोन करून सांगीतले की मला सुरेश फलके यांनी १० हजार रुपये पाहीजे असा मॅसेज पाठविला मी त्यांना सांगीतले की सुरेश फलके असे कोणालाही पैसे मागत नाही तुम्ही त्यांच्या सोबत फोनवर बोला. लगेच परत त्यांना मॅसेज पाठविला त्या मॅसेज मध्ये लिहीले होते की, मला अतिशय महत्वाचे काम आहे कमीत कमी एक हजार रुपये तरी पाठवा. ब्राम्हण सेना अध्यक्ष राजू मिश्रा यांनी सहानुभुती दाखवत एक हजार रुपये त्वरीत पाठविले असता ते पैसे रिता देवी या नावाने गेल्याचे राजु मिश्रा यांच्या लक्षात येताच राजु मिश्रा यांनी अरुण कराळे यांना फोन करुन अकाउंट बोगस असल्याचे सांगीतले तोपर्यंत असे मॅसेज १०० नागरीकापर्यंत पोहचले. काही नागरीकांनी सुरेश फलके यांना फोन करून तुम्हाला पैशाची गरज आहे का असे विचारले असता तेव्हा सुरेश फलके यांच्या लक्षात आले की काहीतरी गडबड असून आपल्या नावाने कोणीतरी पैसे मागत आहे.
लगेच सुरेश फलके यांनी वाडी पोलिसात संबंधित अज्ञात इसमाच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली व तात्काळ स्टेटस,फेसबुक व व्हाट्सएप वर या प्रकाराची माहीती दिली. हा प्रकार मागील काही दिवसांपासून अनेकांशी घडलेला असल्याची माहिती पुढे आली असून कुणीही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना शहानिशा करून किंवा पैशाची मागणी केल्यास संबंधितांशी प्रत्यक्ष बोलून आर्थिक व्यवहार करावा,तसेच अशा मॅसेजला प्रतिसाद न देता याबाबत सक्रिय राहत कुणीही बळी न पडण्याचे आव्हान वाडीचे ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी यांनी केले आहे.