राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. टाळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. अशातच प्रत्येकाला शासकीय मदतीची असलेली गरज ओळखून समाजमाध्यमांवर विविध लिंक पाठविण्यात येत आहेत. आतातर थेट प्रधानमंत्री बेरोगार भत्ता योजनेसाठी अर्ज करा असे आवाहन या संदेशातून करण्यात आले आहे. मात्र सदर संदेश पूर्णत: बनावट असल्याची माहिती चंद्रपूर पोलिसांकडून देण्यात आली आहे. अश्या प्रलोभनांना बळी पडून वैयक्तीत माहिती शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
टाळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेल्याने हजारो हात बेरोजगार झाले आहे. याच गोष्टीचा गैरफायदा घेत काही सायबर चोरट्यांनी ऑनलाईन लूट, फेसबुक हॅकिंग, फसवणुकीच्या विविध प्रकाराने पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे.
महिनाभरापासून जिल्ह्याच्या विविध व्हॉट्सअॅप व फेसबुक ग्रुपवर एक लिंक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजनेसाठी अर्ज करण्याचे अवाहन केलं आहे. याकरता लिंक दिली असून त्यात सर्व वैयक्तिक माहिती व बँक खात्याची डिटेल्स मागण्यात आले आहे. लिंक ओपन केल्यावर प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना २०२१ असे दिसते. सोबतच सदर योजना केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली असून मे २०२१ पर्यंत १० कोटीपेक्षा अधिक नागरिकांना योजनेचा लाभ होणार असून प्रत्येकाच्या खात्यात २५०० ते ३५०० रुपये प्रति महिना जमा करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला
आहे.