अविश्रांत कामांद्वारे महावितरणची ‘तौक्ते’वर मात
चक्रीवादळग्रस्त 99.96 टक्के भागात वीज सुरळीत
मुंबई, दि. 29 मे 2021:* चक्रीवादळाच्या आगमनाचा अंदाज घेत योग्य नियोजन व आपत्कालीन कृती आराखड्याची जलदगतीने अंमलबजावणी तसेच जमीनदोस्त झालेल्या वीजयंत्रणेची विक्रमी वेळेत उभारणी व दुरुस्ती करून महावितरणने ‘तौक्ते’ चक्रीवादळावर मात केली आहे. गेल्या पंधरवड्यात टप्प्याटप्प्याने ‘तौक्ते’बाधीत प्रमुख सात जिल्ह्यांतील 35 लाख 87 हजार (99.96 टक्के) ग्राहकांचा वीजपुरवठा जलदगतीने सुरळीत केला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीला धडक देत प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड तसेच पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांतील वीजयंत्रणेला मोठा तडाखा दिला होता. यामध्ये 201 उपकेंद्र, 1342 उच्चदाब वीजवाहिन्या व 36030 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता व हानी देखील झाली होती. त्यामुळे या सातही जिल्ह्यातील 5575 गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला व 35 लाख 87 हजार 261 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी उच्चस्तरीय बैठका घेऊन चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी पूर्वतयारीला वेग दिला होता. त्याप्रमाणे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी आपत्कालीन आराखडा तयार केला व तो क्षेत्रीय कार्यालयांना पाठविण्यात आला. हाय अलर्टवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करून त्यांना स्थानिक पातळीवर विविध कामांचे नियोजन करून देण्यात आले होते. ‘तौक्ते’ चक्रीवादळ धडकल्यानंतर राज्यातील अनेक भागात त्याचा परिणाम जाणवला. त्या भागातील वीजपुरवठा तत्काळ सुरळीत देखील झाला. मात्र प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड, पुणे व कोल्हापूर या सात जिल्ह्यातील वीजयंत्रणेला अस्मानी तडाखा बसल्याने तब्बल 35 लाख 87 हजारांवर ग्राहकांची वीज खंडित झाली होती.
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतील आव्हानात्मक परिस्थितीत या सातही जिल्ह्यात महावितरणचे 872 अभियंते, 5446 कर्मचारी, 3628 बाह्यस्त्रोत कर्मचारी तसेच 307 एजंसीचे 3840 कर्मचारी अशा एकूण 13 हजार 786 कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे अविश्रांत काम सुरु केले. यामध्ये शहरी भागातील वीजपुरवठा अक्षरश: 20 मिनिटांपासून अवघ्या दीड ते दोन तासांमध्ये पूर्ववत करण्यात आला. 306 कोविड रुग्णालये, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्र, 14 ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांचा वीजपुरवठा याच गतीने ताबडतोब सुरु करण्यात आला. प्रामुख्याने कोकणासह पुणे व कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरदऱ्या, घनदाट जंगलातील धुके, संततधार पाऊस, चिखल व निसरड्या वाटा अशा प्रतिकूल परिस्थितीत जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा उभारण्याचे काम सुरु करण्यात आले. त्यातच नवीन वीजखांब वाहून नेणे, ढगांच्या धुक्यात व भरपावसात काम करणे, दिवसा कमी प्रकाश असल्याने तसेच डोंगरदऱ्या व जंगलात अपघाताचे धोके टाळून वीजयंत्रणा उभारण्याचे काम वेगाने करण्यात आले.
चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर महावितरणने या सात जिल्ह्यांतील 35,87,261 पैकी 35,85,788 (99.66 टक्के) ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला आहे. यातील 90 टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा चक्रीवादळानंतर तीन ते चार दिवसांमध्येच सुरळीत झाला होता. केवळ पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाल्यामुळे तसेच खडतर परिस्थितीमुळे विविध अडचणी आल्या. या तीन जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील उर्वरित 1473 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरु आहेत. तसेच आतापर्यंत सर्वच 4660 सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, 306 कोविड रुग्णालय, 14 ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प, 1685 मोबाईल टॉवर्सचा वीजपुरवठा जलदगतीने सुरु करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यामध्ये महावितरणच्या युद्धपातळीवर सुरु असलेल्या दुरुस्ती कामांची प्रशंसा केली. ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी पालघर जिल्ह्यात दौरा वीजयंत्रणेच्या नुकसानीची, दुरुस्ती कामांची पाहणी केली तसेच व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व ठिकाणचा सातत्याने आढावा घेतला. तसेच वीजपुरवठा वेगाने पूर्ववत करण्याच्या कामगिरीबद्दल कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाशी थेट संपर्क साधत दुरुस्ती कामांना नियोजनपूर्वक वेग दिला. त्यामुळे महावितरणने अत्यंत कमी वेळेत वीजपुरवठा पूर्ववत करण्याची कामगिरी केली आहे. प्रामुख्याने कोकणातील दुरुस्ती कामांसाठी राज्याच्या सर्वच भागातील अभियंते व कर्मचाऱ्यांचे पथके पाठविण्यात आली होती. महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी क्षेत्रीय कार्यालयांशी समन्वय साधत दुरुस्ती कामी असलेल्या अभियंते व कर्मचाऱ्यांच्या मुलभूत व कोविड काळातील सोयीसुविधांसह यंत्रसामग्रीचा साठा, मनुष्यबळ, सामग्री व वाहने, दुरुस्ती कामांच्या एजंसी आदींमध्ये समन्वयाची भूमिका बजावली.