कोरोना लसीकरण : मनपाने गाठला 50 हजाराचा टप्पा
लसीकरणाला ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद
४३ हजार ७०२ कोविशिल्ड, तर ६ हजार ९४२ जणांनी घेतली कोव्हॅक्सीन
चंद्रपूर, ता. ३० : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हाच एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण ५० हजार ६४४ जणांनी लसीची पहिली आणि दुसरी मात्रा घेतली. यात ४३ हजार ७०२ कोविशिल्ड, तर ६ हजार ९४२ जणांनी कोव्हॅक्सीन लस घेतली.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील ५ हजार ५६३ योद्धांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली होती. त्यात ५ हजार ७९३ आरोग्य सेवकांना पहिला डोस, तर ३ हजार ७६३ जणांना दुसरा डोस देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलिस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील ३ हजार ५५३ कोरोना योद्धांचे नामांकन करण्यात आले. यात ३ हजार ८२९ जणांना पहिला डोस व १९८० जणांना दुसरा डोस देण्यात आला. आरोग्य सेवक व फ्रंट लाईन वर्कर मिळून ९ हजार ११६ नोंदणीकृत लाभार्थ्यांना पहिला व दुसरा असे १५ हजार ३६५ डोस देण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक व ६० वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचे धोरण शासनातर्फे अवलंबण्यात आले. आतापर्यंत २१ हजार ९५६ ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस तर ३ हजार ६५० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. तसेच ९ हजार ८८ व्याधीग्रस्त नागरिकांना पहिला डोस, तर ५८५ जणांना दुसरा डोस देण्यात आला. चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत एप्रिलप्रारंभी लसीकरणाचा आकडा ३८ हजार ५९३ इतका होता. यात कोविशिल्ड ३५ हजार १२० तर, कोव्हॅक्सीन लस ३ हजार ४७३ जणांना देण्यात आली.
मागील १५ दिवसात लसीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. यात रामचंद्र हिंदी प्राथमिक स्कूल, शहरी नागरी आरोग्य केंद्र २, गजानन मंदिर (वडगांव ) , शकुंतला लॉन ( नागपूर रोड) , पोद्दार स्कुल (अष्टभुजा वॉर्ड ) , रवींद्रनाथ टागोर स्कूल (विठ्ठल मंदिर वार्ड), बजाज पाॅलिटेक्निक काॅलेज (बालाजी वार्ड), डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा, एनयूएलएम (हॉस्पिटल वॉर्ड), शहरी नागरी आरोग्य केंद्र ५ (नेताजी चौक बाबूपेठ), राजाभाऊ खोब्रागडे सभागृह (बाबूपेठ), मुरलीधर बागला शाळा (बाबूपेठ) , मातोश्री स्कूल (तुकूम), विद्याविहार स्कुल (तुकूम), कन्नमवार प्राथमिक शाळा (सरकारनगर), शहरी नागरी आरोग्य केंद्र १, इंदिरा नगर, डीइआयसी बिल्डिंग, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, आदी शासकीय लसीकरण केंद्रासह संजीवनी हॉस्पिटल, काईस्ट हॉस्पिटल, वासाडे हॉस्पिटल, मुसळे हॉस्पिटल, मानवटकर हॉस्पिटल या केंद्राचा समावेश आहे.
या केंद्राच्या माध्यमातून एकूण ५० हजार ६४४ जणांनी लसीची पहिली आणि दुसरी मात्रा घेतली. यात ४३ हजार ७०२ कोविशिल्ड, तर ६ हजार ९४२ जणांनी कोव्हॅक्सीन घेतली. दरम्यान, शुक्रवार, 30 एप्रिल रोजी लसीकरण झाले नाही. लसीचा साठा उपलब्ध होताच लसीकरण सुरू होईल, अशी माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.