Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट २५, २०२३

शिक्षक भरती | या कारणामुळे टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये संताप | Teacher News

शिक्षणमंत्र्यांचे शिक्षक भरतीचे आश्वासन फोल
शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा आरोप

पवित्र पोर्टल सुरू झाले नसल्याने टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये संताप


चंद्रपूर (Chandrapur) : राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. १५ ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, २४ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात पवित्र पोर्टल सुरू करण्यात आलेले नसल्याने शिक्षक भरती प्रक्रियेला सुरवात झालेली नाही. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात दिलेले आश्वासन फोल ठरले असल्याची टीका शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे.

राज्यात शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पदे शासन भरत नसल्याने रिक्त जागांचा आकडा दरवर्षी वाढत असतो, काही जागा समायोजन प्रकियेने भरण्यात येत असल्या तरी रिक्त जागांचा अनुशेष भरून निघत नसल्याने याचा विपरित परिणाम या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे. उच्‍च श्रेणी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्‍या पदोन्नतीचे पद व विस्‍तार अधिकारी व सहायक शिक्षकांची पदे कधी भरणार? व जिल्‍हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्‍वावर नियुक्‍ती करण्याबाबत ७ जुलै २०२३ रोजी काढलेले परिपत्रक रद्द करावे, असा प्रश्न आमदार सुधाकर अडबाले यांनी विधानपरिषदेत तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

शिक्षक भरतीबाबत औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती. आता न्यायालयाने स्थगिती हटविली असून भरतीचे शेड्युल ठरवून दिले आहे. न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्हापरिषद बिंदुनामावली कायम करून १५ ते ३१ ऑगस्टदरम्यान शिक्षक भरतीची जाहिरात पोर्टलवर प्रकाशित केली जाणार आहे. १ ते १५ सप्टेंबरदरम्यान प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे. त्यानुसार गुणवत्ता यादी १० ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. ११ ते २१ ऑक्टोबरदरम्यान नेमणुका देण्यात येईल. त्यानंतर २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान जिल्हा पातळीवर समुपदेशन करण्यात येईल. राज्यातील शिक्षकांची रिक्‍त पदे पवित्र प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू होणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर उत्तरात सांगितले होते.
परंतु, शिक्षक भरतीची प्रक्रिया १५ ऑगस्‍ट लोटूनही सुरू झालेली नाही. राज्याच्या शिक्षण विभागाला पवित्र पोर्टल सुरू करण्यात अपयश आले आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे यातून दिसून येत आहे. राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी टिईटी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. शिक्षक भरती सुरू होईल, अशी त्यांना आशा होती. परंतु, पवित्र पोर्टल अपवित्र झाल्याचे दिसत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. राज्य शासनाने तातडीने पवित्र पोर्टल सुरू करून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे.





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.