ओळख कर्तृत्वाची - भाग 15
कर्मवीर मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार
!! 15 !!
मा.सा.कन्नमवारांचे दर्शनी व्यक्तीमत्व डोळ्यात भरण्यासारखे होते. ते मध्यम उंचीचे होते.शरीरयष्टी डौलदार होती. नंतरच्या काळात त्यांनी काठीच्या आधार घेतला. त्यांचे नेत्र किंचित निद्रावश पण पाणीद्वार होते. त्यावर जाड्या प्रेमाचा चष्मा शोभुन दिसत होता. त्यांच्याकडे कधीही जा, ते सदा हसतमुख असत. त्यांना भेटायला चिट्ठी किंवा व्हिजिटिंग कार्डाची आवश्यकता नव्हती. सरळ त्यांच्याजवळ जा, काय काम असेल निवेदन करा, त्यांच्या हातचे काम चाललेच असे, कुणाचेही ते बरोबर एकूण घेत आणि योग्य ते सल्ला देत.
साधी राहणी, ईश्वरावर भक्ती आणि गरिबांबद्दलचा कळवळा हे गुण कन्नमवारांच्या अंगी होते. त्यांचे इतरांशी वागणेही घरगुती स्वरूपाचे होते. प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करून त्यांचे सूखदूख समजावून घेण्याचा ते प्रयत्न करीत.त्यामुळे त्यांच्याकडे माणसांची फार वर्दळ असे. माणुसकी व सदभाव हा लोकशाही कारभाराचा गाभा आहे.कन्नमवारांच्या राजकीय व सामाजिक जीवनातील यशाचे गमक म्हणजे त्यांच्या ठिकाणी असलेली माणुसकी व चांगुलपणा होय. संघटनात्मक कार्यकरण्याचा कन्नमवारांचा मूळचा पिंड होता. आलेल्या माणसांशी प्रेमळपणे बोलून त्याला ते आपलेसे करून टाकत.सहसा ते कुणाशीही तुसडे व तुटकपणे वागत नसत. " काय हो " अशी घरगुती स्वरात उच्चारलेली हाक टेलिफोनवर ऐकू आली की फोन कन्नमवारांचा अशी लोकांची खात्री होती.
कन्नमवारांना मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि गुजराती अशा पाच भाषा येत होत्या. जुन्या मध्यप्रदेशात आरोग्यमंत्री असतांना हिंदीचा ते वापर करीत. विशाल द्विभाषिकात असताना गुजरातमध्ये ते गुजरातीतून भाषणे देत, तर सिरोंचा विभागात निवडणूक प्रचार ते तेलुगूमध्ये करीत. सुरुवातीला कन्नमवारांना इंग्रजी फारसे जमत नसले तरी नंतर त्यांनी त्यात बरीच प्रगती केली. प्रशासनासाठी आवश्यक असलेले इंग्रजी परिश्रमपूर्वक आत्मसात करण्याचा प्रयत्न केला.कन्नमवारांची मनाची घडण अभ्यासू होती.भाषा हे ह्रुदय जिंकण्याचे तसेच एकमेकांच्या विचारांशी देवाणघेवाण करण्याचे प्रभावी साधन आहे, हे ते जाणून होते. म्हणून ते जेथे जेथे गेले त्या त्या ठिकाणी भाषा अवगत केली.
मुंबईच्या चौपाटी येथील जाहीर शोक सभेत भारताचे तत्कालिन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कन्नमवारांच्या व्यक्तीमहत्वाबद्दल जे उदगार काढलेत ते फार बोलके आहे. यशवंतराव चव्हाण म्हणतात, " मी कन्नमवारजींच्या एका गुणाने पहिलेपासून आकर्षित झालो. दुख पाहिल्यानंतर प्रथम धावून गेले पाहिजे अशी कन्नमवारजींची भावना होती. मी तर म्हणेन की, निदान महाराष्ट्राची अशा तऱ्हेची परंपरा वाढविली पाहिजे असा गुण असणारा मुख्यमंत्री होऊ शकतो अशी एक नवी कसोठी आपण निर्माण केली पाहिजे. याच एका गुणावर मुख्यमंत्र्याची परीक्षा होईल असाही नवीन धडा त्यांनी निर्माण केला, त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग अशा पद्धतीने केला आहे की, प्रत्येक माणसाला उत्तर मिळेल, काही तरी सहानभुतीचा आधार मिळेल. ही गोष्ट कन्नमवारजींनी आपल्या जीवनात मुख्यत्वाने केली "
ज्येष्ट साहित्यिक बाळ सामंत म्हणतात, " कन्नमवारांचा पोषाख साधासुधा असायचा. वेषावरून व्यक्तिमत्वची कल्पना करणारे काही महाभाग असतात. उत्तम वेष म्हणजे संपन्न व्यक्तीमत्व अशाही काहींची भ्रामक समजूत असते.परंतू कन्नमवारांसमोर गांधीजींचा आदर्श होता. छान छोकीने व चैनीने वागणे त्यांना आवडत नव्हते. त्यांचा स्वभाव शांत, गंभीर, ध्येयनिष्ठ व काष्टाळू होता.गरिबांचे ते कनवाळू होते. सर्वांशी ते सहानुभूतीने वागत असले तरी मनाने व व्रुत्तीने खंबीर व लोकाग्रणी होते. नेत्याला लागणारे सर्व गुण त्यांच्या अंगी होते. फलभराने जसा आमव्रुक्ष नम्र होतो, तशीच नम्रता व सौम्यता जबाबदारीच्या ओझ्यामुळे कन्नमवारांत आली "
थोडक्यात निरलस, प्रेमळ, शांत, सुस्वभावी, खंबीर आणि अचूक निर्णय घेणारा, सारासार विचार असणारा नेता असेच कन्नमवारांचे वर्णन करावे लागेल.
खिमेश मारोतराव बढिये
प्रचारक (नागपूर)
दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती नागपूर
8888422662, 9423640394