अधिकमास निमित्ताने...
अधिक (पुरुषोत्तम) मास सुरु झालाय. भारतीय जीवनपद्धतीनुसार, या महिन्यात केलेल्या सत्पात्री दानाचे फळ शतपटीने अधिक मिळण्याची मान्यता आहे. अर्थात हे दान म्हणजे ‘डोनेशन’ नव्हे ! या संकल्पनेत कोणी दिले ? काय दिले ? कोणाला दिले ? या बाबी गुप्त राहातात. गरीब, गरजूंना मदत मिळावी हा या संस्कृतीचा उद्देश ! याचा आधार घेऊन मानवाने कालौघात ग्रंथदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, विद्यादान, गोदान, कन्यादान, अर्थदान आदि संकल्पनांना महत्त्व प्राप्त करून दिलं. सध्या ‘कोरोना’मुक्त झालेल्यांकडून होणाऱ्या ‘प्लाझ्मा’दानालाही विशेष महत्त्व आहे. तरीही सर्वोत्तम दान म्हणून सध्या निसर्गाकडे पाहायला हवंय. निसर्गकृपेनं, निरपेक्ष भावनेनं मिळालेल्या निसर्गदानाने मनुष्यजीवन भरून पावलं आहे. निसर्ग समतोल राखणं आपली जबाबदारी होती. इतर दानांप्रमाणे निसर्गाचं वर’दान’रुपी सानिद्ध्यही मनुष्याला समाधान प्राप्त करून देतं. म्हणूनच निसर्ग सान्निद्ध्याचा वसा आणि वारसा संवर्धित करत पुढील पिढीला जसाच्यातसा सपूर्द करण्यासाठी मनुष्याने अधिक मासानिमित्ताने पाऊले उचलायला हवीत.
निसर्ग म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचतत्त्वांनी बनलेली सृष्टी. निसर्गाच्या ह्याच पंचतत्त्वातून मनुष्याला जन्म‘दान’ मिळतं. मेल्यावरही मानवी देह पंचतत्त्वात विलीन होतो. निसर्ग एकाचवेळी आपला गुरु, मित्र आणि डॉक्टर असतो. निसर्गाशी असलेले मानवी नाते अतूट असूनही त्याच्या जतन, पोषणासह वृद्धी करण्याचे ‘कर्तव्यदान’ मनुष्य विसरला. खोल दऱ्या, निर्मळ झरे, कमळांनी भरलेले तलाव, अथांग सरोवरे, रम्य सागरकिनारे, घनदाट जंगले, बर्फाच्छादित शिखरे, उत्तुंग पर्वत, वाऱ्याच्या झोक्याने डोलणारी हिरवीगार सृष्टी, नारळी सुपारीच्या बागा, डोंगराआडून उगविणारा सूर्यदेव, निळ्याशार आकाशात सप्तरंगांची उधळण करणारी त्याची किरणं, ऋतुचक्र, फुलांचा सुगंध, पक्ष्यांची किलबिल आदि त्याच्याच दानाच्या छटा आपल्याला जगण्याची नित्य प्रेरणा देत असतात. ह्या निसर्गरुपी कृष्णानं आपल्यासारख्यांना न मागता भरभरून दिलं. त्या बदल्यात मनुष्याने निसर्गाला काय दिलं ? त्याने उपद्रवी प्रदूषण वाढवून निसर्ग सौंदर्याचा ह्रास केला. इमारर्तींचे टॉवर उभारून चांदोबाला लपवलं. जंगलतोड करून पर्जन्यमान अनियमित केलं. अतिवृष्टी उशाशी आणून ठेवल्या. स्वार्थलोलुपतेची पट्टी डोळ्यावर बांधल्याने ‘निसर्ग जगला तर आपण जगू’ हे तत्त्व तो विसरला. जगण्यातली गंमत हरवून बसला. ‘सुखासीन जीवन’युक्त प्रगती हा त्याचा पारंपारिक स्वभाव हव्यासात बदलला. मात्र डोळ्यानेही न दिसणार्या ‘कोरोना’ने त्याचा प्रगतीचा अहंकार धुळीस मिळवला. कोरोना वयाने वर्षभराचाही नाही. तरीही जगाकडे त्याच्याविरुद्ध लढण्याची निश्चित व्यवस्था नाही. अंदाजांच्या आधारे उपचार सुरु आहेत. ‘रोग प्रतिकारशक्ती’ शब्दाला मागणी वाढली आहे. निसर्गाचा ह्रास धोकादायक स्थितीत आलेला असला तरी त्याची प्रतिकारशक्ती मानवापेक्षा कित्येकपट असल्याचे लॉकडाऊनमध्ये दिसून आले. मानव बंदिस्त होताच निसर्गाने वातावरणाला स्वच्छ बनविले. याकाळातली भारतातील वातावरणाची २०१६ आणि २०२० मधील दोन छायाचित्रे ‘नासा’ने प्रसिद्ध केली. वैज्ञानिकांनी छायाचित्रांद्वारे भारतात धूळ-मातीसह इतर प्रदूषणाचा स्तर कमी झाल्याचे निदर्शनास आणले. पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील एका गावातून याकाळात लोकांना हिमालयाचे पूर्वी न होणारे दर्शन झाले. अधिक मासापासून अंगच्या वाईट सवयी त्याग करून विशेष संकल्प सोडण्याची परंपरा असल्याने, ‘निसर्ग आहे तसाच ठेवा’ या उक्तीनुसार आपण विचार करायला हवा.
मेडिकल सायन्स प्रगत असताना कोरोना विषाणू झपाट्याने लोकांचा जीव घेऊन गेला. हा निसर्गाचा Balancing Act (समतोल) ठरावा. ज्या महाराष्ट्राला आपण देशातलं विकसित राज्य म्हणतो तिथं सर्वाधिक धरणं असूनही सिंचनाखालची जमीन कमी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भूजलातली घट, पाण्याच्या समस्या, वाळवंटीकरणासह कोरोनाचे रूग्ण आणि मृत्यूची आकडेवारीही इथेच सर्वाधिक दिसतेय. तरीही आमचा विकास सुरु आहे. घराघरातील मनुष्याला, आयुष्य स्वत:साठी नसून इतरांच्या सेवेसाठी असल्याचा धडा कोरोनाने शिकवला. मानव `जीवो जीवस्य जीवनम’ म्हणत दोन वेळचं अन्न आपल्यापर्यंत कसं येईल ? ह्याच्या काळजीत दिसला. निसर्ग आपल्याला जगवतो आहे हे यंत्रयुगात झाकोळलेले सत्य ‘कोरोना’ने उघड केले. कोटय़वधी वर्षांपासून मानवी जीवनाच्या आधार असलेल्या नद्यांची जंगल (अॅमेझॉन) आम्ही पैशांसाठी जाळली. मिठी, गंगा, यमुनांपासून सगळ्या नद्यांत रसायने आणि घाण ओतली. आम्ही माणसं पृथ्वीवर राहायला नालायक आहोत. कोरोना हा आम्हां उन्मादलेल्यांना निसर्गाने दिलेला शेवटचा इशारा असेल का ? शाळेत शिकत असताना दरवर्षी इंद्रधनुष्याची कमान दिसायची. नकळत ‘तानापिहिनिपाजा’ उजळणी व्हायची. आज तेही प्रमाण कमी झालं. निसर्गाने सौंदर्याचा साक्षात्कार घडवित निर्माण केलेल्या रंगछटा पाहाताना मानवी डोळे थकून जायचे, पण छटा संपायच्या नाहीत. मानवी शरीरालगत ऊर्जेचं वलय (ऑरा) असतं. प्राचीन योगशास्त्राच्या अभ्यासातून आपण याचं महत्व समजू शकतो. आपल्या विचारांचा वलयावर परिणाम होतो. हे वलय स्वच्छ आणि सक्षम असेल तर त्याचा आपल्या जीवनावर चांगला प्रभाव पडतो. हे तेजोवलय आपली ‘पर्सनल सिग्नेचर’ असून त्याच्या उन्नतीतही निसर्गाची भूमिका महत्त्वाची असते. निसर्गाने जे जे जन्माला घातलं त्या प्रत्येकाला नियम घातले. आम्ही हव्यासापोटी नियमांचं उल्लंघन केलं नि कोरोना भेटीला आला. कुठंतरी वाचलेलं, पूर्वी म्हणे समुद्रकिनारी वाळूऐवजी मीठ पसरलेलं होतं. समुद्राचं पाणी अमृतासारखं गोड होतं. सजीवांची तहान भागवण्यासाठी या पाण्याचा उपयोग व्हायचा. मानवी उत्कांतीत अन्नाला चव यावी म्हणून मिठाचा सुरु झालेला मोजका वापर नंतर हव्यासात बदलला. या क्रियेला निसर्गाने प्रतिक्रिया दिली. मीठ समुद्रात वाहून गेले, फक्त वाळू उरली. समुद्राचे पाणी खारे झाले. आज खारं पाणी प्रक्रिया करून मानव पिण्यायोग्य बनवतोय. कदाचित वृक्षतोडीचंही असंच होईल म्हणून ‘निसर्गदान’ संकल्पनेचं महत्त्व समजवून सांगायला ‘कोरोना’ आलाय.
निसर्गाल गृहीत धरून त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याची कल्पना आपण कशी करू शकतो ? निसर्गाने दिलेलं दान जपत जगण्या-वागण्यातून ते संवर्धित करण्याकामी आपण स्वतःला समर्पित करायला हवंय. विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या शाखा कितीही छाटण्याचा प्रयत्न केला तरीही त्या नव्याने उगवतात, आपलं ‘दान’ मानवाच्या पदरात टाकतात. निसर्गाच्या सानिद्धयात मानवाला मिळणारं समाधान हेही निसर्गाच्या निर्हेतुक ओंजळीतून निसटलेलं दानच ! विनोबांची ‘भूदान’ चळवळ सर्वश्रुत आहे. अधिक मासातील दानामागे वैज्ञानिक सूत्र, सामाजिक आशय आणि नैतिकता गुंफलेली आहे. दानामुळे संबंधित वस्तूवरील आपला हक्क समाप्त होऊन दुसऱ्याचा स्थापित होतो. घेणाऱ्यावर कोणत्याही प्रकाराचे उपकार न राहाता केलेलं दान सात्त्विक समजतात. याकारणे श्रद्धा, तुष्टि, भक्ती, ज्ञान, अलोभ, क्षमा आणि सत्य या सात गुणांची रुजवात आपल्या व्यक्तिमत्त्वात होत राहाते. भारतीय जीवनपध्दतीत यांचे महत्त्व विशेष असल्याने आपण निसर्गाला आहे तसा ठेवण्याची ‘अभय’शपथ घ्यायलाच हवी !
धीरज वाटेकर
dheerajwatekar@gmail.com,
मो. ९८६०३६०९४८
धीरज वाटेकर
dheeraj watekar, mob. +91 9860360948
https://dheerajwatekar.blogspot.com