Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर ०८, २०२०

शेती विरोधी कायद्यांनी हिरावून घेतले शेतकऱ्याचे स्वातंत्र्य




प्रा. डॉ. शैलजा बरुरे यांचे किसानपुत्रांच्या शिबिरात प्रतिपादन

नांदेड- प्रतिनिधी
भारतीय शेतकऱ्यांचे स्वतंत्र्यं शेती विरोधी कायद्याने हिरावून घेतले आहे अशा प्रकारचे प्रतिपादन प्राध्यापिका डॉ. शैलजा बरुरे यांनी केले .त्या मराठवाडा स्तरीय किसानपुत्र आंदोलनाच्या विभागीय शिबिरांचे उद्घाटन करताना बोलत होत्या. हे शिबीर 14 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. या शिबिराचा विषय शेतकरीविरोधी कायदे हा आहे.

प्रा. शैलजा बरुरे म्हणाल्या की, भारतीय अर्थव्यवस्था शोषणावर आधारित आहे. भारतीय शेतीला आजही महत्वाचे स्थान मिळत नाही. भारतीय शेतीला भांडवली शेती म्हणून गणले जात नाही. यामुळे शेती विकासामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळेच सामान्य शेतकऱ्यांचे जीवन उद्धवस्त होते. प्रा. बरुरे यांनी शेती कायद्याचे दुष्परिणाम काय होतात याचा आढावा घेतला. भारतामध्ये सिलिंगचा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा व आवश्यक वस्तू कायदा यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा वाईट परिस्थिती मध्ये शेतकरी दुष्काळ, अतिवृष्टी, महामारी अशा अनेक अडचणीवर मात करून शेती करतो परंतु यामुळे शेती फायदेशीर होत नाही. शेतीच्या समोरील सर्वात महत्त्वाचा अडथळा म्हणजे शेती विरोधी कायदे आहेत. शेतकरी विरोधी कायद्याचे उच्चाटन झाले तरच भारतीय शेती ही भांडवलप्रधान शेती म्हणून करता येईल. अशा प्रकारचे प्रतिपादन प्राध्यापिका डॉ बरूरे यांनी केले.

*सिलिंग कायदा रद्द करा- सुभाष कच्छवे*
या शिबिरामध्ये पहिल्या सत्रात कमाल शेतजमीन धारणा कायदा या विषयावर श्री सुभाष कच्छवे (परभणी) यांनी विचार मांडले. त्यांनी सुरुवातीला सिलिंग कायद्याचा संपूर्णपणे आढावा घेतला. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेवर सिलिंगच्या कायद्याचा काय परिणाम होतो याचेही विवेचन केले. सिलिंगच्या कायद्याच्या उच्चाटनामुळे शेतीत व शेतकऱ्याच्या जीवनामध्ये फरक पडेल. शेतकऱ्यांची लूट थांबेल. अशा प्रकारचे मत त्यांनी व्यक्त केले. या कमाल शेतजमीन धारणा कायद्याचे उच्चाटन करायचे असेल तर यासाठी संघटितपणे लढा उभा करावा लागेल. जोपर्यंत संघटितपणे लढा उभारला जाणार नाही तोपर्यंत शेतकरीविरोधी कायदे रद्द होणार नाहीत, असा संदेश दिला.

या शिबिराचे आयोजन श्री अंकुश खानसोळे, मयुर बागुल यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय नितीन राठोड यांनी दिला. तांत्रिक सहकार्य अस्लम सय्यद यांनी केले. या शिबिरासाठी मराठवाडा विभागातील विविध भागातील शिबिरार्थी उपस्थित होते. त्याचबरोबर अमर हबीब, अनंत देशपांडे व इतर सर्व सन्माननीय व्यक्ती शिबिरासाठी उपस्थित होते.
संकलन- डॉ. विकास सुकाळे (नांदेड)

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.