चीन व जपानमधील गणपती
दि २७ आॅगष्ट २०२०
चिनी व जपानी बौद्ध धर्मात ‘कांगितेन’ ही आपल्या गणेशाशी साधम्र्य असलेली मूर्ती आढळून येते. जपानी भाषेत ‘शाश्वत सुखाची देवता’ असा ‘कांगितेन’ या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. पवित्र देवता वा थोर देवता या अर्थाचे ‘कांकितेन’ तसेच ‘शॉतेन’ हे शब्दही त्याकरता वापरले जातात. बौद्ध तंत्र-मंत्रयान या गूढ उपासना परंपरेतील ‘वज्रयान’ संप्रदायामध्ये अनेक अर्थानी तसेच नावांनी ओळखला जाणारा हा गणपती!
इ. स.च्या आठव्या-नवव्या शतकात जपानी बौद्ध मंदिरांमध्ये एक दुय्यम देवता म्हणून कांगितेनचा समावेश झाला.
स्त्री-पुरुषरूपात परस्परांना मिठी मारलेल्या उभ्या स्थितीतील गणेश असे या मूर्तीचे स्वरूप आढळते.कांगितेनच्या प्राचीन प्रतिमांमध्ये त्याला दोन वा सहा हात आढळतात. सोनेरी कांस्यप्रतिमा आणि चित्रांमध्ये युगुल कांगितेन लैंगिक क्रियेत मग्न असल्याचे हैन कारकीर्दीच्या शेवटच्या काळात दर्शविले गेले. यब-युम या जोडगोळीसारख्या लैंगिक क्रियेत मग्न प्रतिमा तिबेटमधील तांत्रिक बौद्ध धर्मात प्रचलित होत्या. त्यांच्या प्रभावातून कांगितेन मूर्ती बनविल्या गेल्या असाव्यात.
दोन गणेश एकाच वेळी उपस्थित असल्याचा उल्लेख कोणत्याही भारतीय पुराणांमध्ये आढळत नाही. जपानी भाषेत ‘शाश्वत सुखाची देवता’ असा ‘कांगितेन’ या शब्दाचा अर्थ आहे. पवित्र देवता वा थोर देवता या अर्थाचे ‘कांकितेन’ तसेच ‘शॉतेन’ हे शब्दही त्यासाठी वापरले जातात. याच अर्थाचे दैशो-तेन, दाइशो कांगितेन, तेन् सोन, कांगी जिझाइ-तेन, शॉदेन-सामा, विनायका-तेन, बिनायका-तेन, गनपतेल आणि झोबी-तेन हे शब्दही ‘कांगितेन’ या देवतेविषयी वापरात आहेत. जपानी बौद्ध धर्मातील शिंगॉन आणि तेंदाई या संप्रदायांमध्ये प्रामुख्याने त्याची उपासना केली जाते.
‘बिनायकाटेन’ हे कांगितेनचे एक नाव भारतीय पुराणांतील विनायकाला दिलेले विशेषण आहे. ‘गणबची’ नावानेही त्याला चिनी-जपानी परंपरेत संबोधले गेले आहे. ‘गण्वा’ किंवा ‘गणपती’ हे नावही काही ठिकाणी वापरले जाते. बिनायक हा विघ्ननिर्माता म्हणून मानला जातो. पण तो प्रसन्न झाल्यावर मात्र आपल्या भक्तांना भरभराट, यश, आरोग्य आणि उज्ज्वल भवितव्य बहाल करतो, अशी चिनी-जपानी बौद्धांची धारणा आहे.
हिंदू धर्मात पार्वतीचा पुत्र म्हणून गणेश सर्वश्रुत आहे, तसाच जपानी बौद्ध ग्रंथांमध्ये राजा विनायक (बिनायक) उमापुत्र किंवा उमाहीपुत्र म्हणून येतो. त्याचा पिता महेश्वर हा शिवाशी साधम्र्य सांगणाऱ्या बौद्ध दैवतासारखा आहे. उमेने तिच्या एका बाजूपासून १५०० मुले निर्माण केली आणि तिच्या डाव्या बाजूपासून दुष्ट विनायकाचे सैन्य निर्माण झाले. त्यावर विनायकाचे मस्तक होते. त्याचप्रमाणे तिच्या उजव्या बाजूवर परोपकारी, सद्गुणी प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून अवलोकितेश्वराचे मस्तक होते. तो देवांचा सेनानायक या नात्याने बौद्ध ग्रंथांमध्ये चितारलेला आढळतो.
कांगितेन गजमुखी स्त्री-पुरुष परस्परांना आलिंगन देताना दिसतात. स्त्रीरूपी गणपतीने मुकुट धारण केलेला असून ठिगळे लावलेला भिक्खूचा पेहराव आणि लाल-रुंद बाह्यांचा डगला परिधान केलेला असतो. पुरुष मूर्तीमध्ये कधी कधी खांद्यावर काळे वस्त्रे पांघरलेले दिसते. त्याला लांब सोंड आणि अणकुचीदार सुळे असतात. लालसर तपकिरी रंगाचा पुरुष गणपती, तर पांढऱ्या रंगाची स्त्री-गणपतीची मूर्ती असते. ती त्याच्या पायावर पाय आणि त्याच्या खांद्यावर डोके टेकवलेल्या अवस्थेत असते.,गजमुख बिनायकाची प्रतीके म्हणून मुळा आणि परशू असून पद्मासनात तो घडविला जातो. दुष्ट शक्ती आणि सैतानांपासून सर्वाचे रक्षण करणारा असा हा विनायक चिनी-जपानी बौद्धांमध्ये पूजनीय आहे. वैरोचन या पाच थोर बुद्धांपैकी एक असलेल्या या दैवताला मंडलांमध्ये केंद्रस्थानी ठेवले जाते. बिनायकाचे बाह्यरूप म्हणजे त्याचा अवतार होय अशी त्यांची श्रद्धा आहे.
काही प्रतीकांद्वारेही कांगितेनचे अस्तित्व दर्शविण्याची चिनी-जपानी परंपरा आहे. शुजी किंवा बिजा या शब्दांनी किंवा छत्र, पोशाख, धनुष्य आणि बाण या प्रतीकांनी मंडलामध्ये कांगितेनचे स्थान मानले जाते.
चीनमधील प्राचीन ग्रंथांमध्ये तांत्रिक बौद्ध धर्माची माहिती जेव्हा पुढे आली, तेव्हा वैरोचन बुद्ध आणि त्याचा संप्रदाय वाढविण्यात शुभकरसिंह, वज्रबोधी व अमोघवज्र या ज्या तीन महागुरूंचे योगदान होते, त्यांच्याभोवती अभ्यासकांचे लक्ष केंद्रित झाले. चिनी भिक्खू अतिगुप्त याने इ. स. ६५४ मध्ये ‘धरणीसमुच्चय’ या ग्रंथाचे चिनी भाषेत भाषांतर केले. त्यात युगुल कांगितेनच्या पूजाविधीचे वर्णन आहे. त्या विधीचे अनुकरण अमोघवज्र (७०५-७७४) या गुरूने ‘दायशोटेन कांगी सोशीन बिनायका हो’ या आपल्या ग्रंथात केले. सोशीन कांगितेनचे वर्णन अमोघवज्राने एक दैवत म्हणून केले. त्रिकाया या बुद्धरूपाप्रमाणे दुष्ट शक्ती आणि दु:खद घटनांपासून आपल्या भक्तांना सुरक्षित करणारे दैवत या स्वरूपात त्याने कांगितेनला प्रस्थपित केले.
बोधिरूसीने विनायकाचे वर्णन दोन ग्रंथांमध्ये केले आहे. त्यापैकी एकामध्ये विनायक एका मंत्राचे उच्चार दैवते व राक्षसांच्या समूहाला शिकवीत असल्याचे वर्णन आहे. युगुल कांगितेनविषयीच्या उपासनेकरिता अमोघवज्राने रचलेल्या ‘दायशोटेन कांगी सोशीन बिनायका हो’ या ग्रंथातही हा मंत्र आहे. या मंत्राचे उच्चारण वारंवार केल्याने दैवतांनाही जीवनदान देण्याचे आश्वासन विनायकाच्या राक्षस अनुयायांनी दिल्याची माहिती यात आढळते. एका प्राचीन संहितेत बोधिरूसीने विनायकाची कथा तपशीलवार कथन केली आहे. त्याचप्रमाणे चार हातांचे दैवत म्हणून युगुल कांगितेनच्या आराधनेसाठी पूरक अशा अनेक विधींचे वर्णन केले आहे.
जपानमध्ये कांगितेनच्या उपासना प्रचलित आहेत. परंतु होझान-जी हे त्याचे मंदिर सर्वात प्रसिद्ध असून, इकोमा पर्वताच्या शिखरावर ते आहे. या मंदिराची उभारणी सहाव्या शतकात केली गेली असे मानले जात असले तरी ते प्रकाशात मात्र सतराव्या शतकात आले.
अशा तर्हेने गणपती बौध्द देश समजल्या जाणारया चीन व जपान मध्ये पुजनिय आहे.
अनिल पाटील पेठवडगाव