अलीकडेच केरळ मध्ये एका हत्तीणीची निघृण हत्या करण्यात आली. प्राण्यांसोबत अशा घटना मानवाकडून याअगोदर पण घडलेल्या आहेत. पण या घटनेने सर्वांनाच सुन्न करून टाकलंय. ते पण इतकं क्रूरपणे की सारी हद्दच मानवाने ओलांडली. अननसमध्ये फटाके टाकून हत्तीनीला खायला देऊन तिला मारणे...ही केवळ विकृतीच असू शकते.पण या विकृतीला ठेचून काढणं दिवसेंदिवस कठीण होत आहे. या घटनेच्या अनुषंगाने मानव-प्राणी संघर्षाचा घेतलेला मागोवा.
मल्लपुरम जिल्ह्यातील एका गावात फटाके भरून अननस गर्भवती हत्तीनीला खाण्यासाठी दिले. ते अननस पोटात फुटल आणि तिचा मृत्यू झाला.यात तिचा जीवन-मृत्यूचा सुरु असलेला संघर्षही संपला. यातून अनेक प्रश्नांनी डोकं वर काढलंय. हा मानव-प्राणी संघर्ष पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. आपल्या विदर्भातील जंगलात अशाप्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. फक्त विकृतीच स्वरूप बदलत जाते. घटनेचा धागा तोच असतो. नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्याची जंगलाची सीमा संलग्न आहे. उमरेड पासून 30-40 किलोमीटर अंतरावर सुमारे 15 वर्षापूर्वी एका पट्टेदार वाघाचा पाण्यात विष देवून खात्मा करण्यात आला होता. अशाच प्रकारे ताडोबा, पेंच आणि अन्य जंगलातील प्राण्यांसोबत पाण्यात विष घालून ठार मारण्यात आले आहे. इतकेच काय तर शिकारी वेगवेगळ्या शक्कल लढवीतात. त्यात प्राण्यांना मारण्यासाठी कधी जिवंत विदयुत तारांचा शॉक दिला जातोय. तर कधी पाण्याच्या ठिकाणी सापळा रचून प्राण्यांच्या पायात वायर अडकवून मारले जाते. केरळमधील घटना शिकाऱ्यानी केलेली नाही. तरीपण मानवानेच माणुसकीला काळिमा फासली आहे. बिबट्या आणि मानव संघर्ष सर्वांना माहिती आहे. ठाणे, बोरिवली, प.महाराष्ट्र, विदर्भातील जंगलात शिकारीच्या घटना घडतात. आधीपेक्षा वनविभाग तंत्र स्नेही झालेला आहे. सोबतच 1972 च्या वन्यजीव कायद्यात सुधारणा झालेल्या आहेत. परिणामी, शिकारी कमी झाल्या आहेत. तरीही रानडुक्कर, ससे, हरनाची शिकार केली जाते. प्रश्न हा आहे की, इतकी क्रूरता येथे कुठून? अज्ञानातून? निश्चितच अज्ञानच म्हणता येईल. कारण आज अज्ञान आहे म्हणून दुःख आहे. असेही नाही की ज्ञानाची दारे उघडी नाहीत. पण कामाची गोष्ट सोडून भलत्याच गोष्टीमागे धावण्याची ओढ माणुसकीला उद्धवस्त करीत आहे. विविध प्राण्यांविषयी समाजात गैरसमज आहेत. काहींना असे वाटते की वन्य प्राण्यांना मारून आपण भरमसाठ पैसा कमवू शकतो तर काही जणांचा अंधश्रद्धा हा विषय असतो. प्राण्यांविषयी पैसा आणि अंधश्रद्धा हा विषय संपुष्टात येईल, तेव्हा खऱ्या अर्थाने मानव-प्राणी संघर्ष कमी होईल. हा संघर्ष कमी करण्यासाठी जनजागृती कमी होत आहे. जनजागृतीत भर घालून प्राण्यांचे महत्व लोकांपर्यंत विशद करावे लागेल. यात वनविभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. तरीही कुठेतरी आपला आवाका कमी पडतोय. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुलभपणे व्हावा. इतकीच अपेक्षा.
- मंगेश दाढे