Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल २०, २०२०

आनंद तेलतुंबडेंच्या विरोधात कटाचा वास



राजगृहावर काळा झेंडा

देशात एक वादळी व्यक्तिमत्व ही डाँ.आनंद तेलतुंबडे यांची ओळख. अनेक वर्ष नोकरी , संसार आणि लेखन हे त्यांचे विश्व. या काळात ३४ च्यावर शोध निबंध लिहिले. त्यांची पुस्तकें निघाली. ती सर्व इंग्रजी भाषेत. त्यांचे शेकडो लेख इंग्रजी दैनिकांमध्ये प्रकाशित झाली. नामवंत नियतकालिकांनी छापलं. यातून जागतिक विचारवंत अशी ओळख मिळाली. विदेशातून भाषणाची निमंत्रणं येऊ लागली. अनेक सेमिनार त्यांच्या वैचारिक अभ्यासपूर्ण मांडणीने गाजली. भारतापेक्षा विदेशात त्यांचा लौकिक वाढला. आंबेडकरी विचारांचे ते गाढे अभ्यासक असल्यामुळे त्यांच्या वकृत्वाला व मांडणीला धार आली. गरिबी व दैववादावर ते कडाडून हल्ला करीत. याचे अनेकांना पोटशूळ होते.

तेलतुंबडे विदर्भातील

तेलतुंबडे हे मुळचे वणी तालुक्यातील राजूरचे. आईवडीलांनी मोलमजूरी करून शिकविले. यवतमाळ जिल्ह्यात मँट्रीकपर्यंत शिकले. अभियांत्रिकी शिक्षणासाठी नागपुरात आले. व्हीआरसीईमध्ये (व्हीएनआयटी) प्रवेश घेतला. तिथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअर्स विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष झाले. त्यांच्या लक्षात आले. काँलेजमध्ये बाबासाहेब यांचे छायाचित्र नाही. तेव्हा स्वत: ब्रश उचलला. ४×६ फुट आकाराचे रंगित चित्र रेखाटले. खाली स्वत:चे नाव टाकलं. ती पेंन्टींग काँलेज ग्रंथालयास भेट दिली. ते पोट्रेट आजही डौलात आहे. १४ एप्रिल आणि ६ डिसेंबरला त्या ग्रंथालयात कार्यक्रम पार पडतात. तेव्हा नवख्या विद्यार्थ्यांना आनंद तेलतुंबडेची ओळख होते. हा कोणी चित्रकार नाही. तेव्हा तो इंथला विद्यार्थी होता. विद्यार्थी दशेत त्यांनी दाखविलेले धाडस आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारे आहे. ते जसे धाडसी होते. तसेच हुशार सुध्दा होते. बीई केल्यावर अहमदाबादेतील आयआयएम मधून व्यवस्थापनाची पदवी घेतली. ते पीएचडी झाले. कर्नाटकच्या एका विद्यापीठाने मानद डीलिट पदवी दिली. यावरून त्यांचे मोठेपण लक्षात येते.

राजगृहातून .....

ते नोकरीच्या स्पर्धेतही सतत अव्वल राहत. अव्वल पदी त्यांचीच निवड होत होती. ही बाब त्यांच्या स्पर्धकांना खटकत होती. अशा दुखावलेल्या शक्ती कटकारस्थानात रंगल्या. त्यांची तमा न बाळगता उदिष्ट्यांच्या दिशेने वाटचाल कायम ठेवली. योगायोगाने ते आंबेडकरांच्या परिवाराशी जोडल्या गेले. रमा आंबेडकर यांच्याशी विवाहबध्द झाले. प्रकाश आंबेडकर हे तिघे भाऊ. त्यांची एकुलती बहिण रमा होय. तेलतुंबडे त्यांना राजगृहात भेटले. सुखदु:खावर बोलले. १४ एप्रिल- २०२० रोजी राजगृहातून बाहेर पडले. ठाण्यात पोहचले. अन् सांगितले. न्यायालयाच्या निर्देशाचे पालन केले. कारवाई करा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अशी माेजत आहेत किंमत. ज्या  कायद्याने अटक करण्यात आली. त्यामध्ये कैफियत मांडण्यास संधी नाही. रमा आंबेडकर कुटुंबियांची ही संकटाची घडी आहे. तेलतुंबडे हे राजगृहाचे पाहुणे. तिथे वावरले. बाबासाहेबांच्या ग्रंथ सहवासात हजारों तास घालविले. वैचारिक पाया अधिक घट्ट झाला. दिवसरात्र एक करून तारूण्यात बाबासाहेब रेखाटले. ती व्यक्ती नक्षल अर्बन शक्यच नाही. बाबासाहेबांची एकदोन पुस्तकें वाचणारा खेड्यापाड्यातील तरूण गुरगुरतो. हे तर उच्चविद्याविभूषित. अनेक पुस्तकांचा काढा प्यालेले. ते गुरगुरणारच. त्यांची भाषणे गाजणारच.एवढी पुस्तकें लिहिली. त्यात कारवाई करावे असे काही भेटले नाही. त्यासाठी एका लेखाचा आधार घ्यावा लागतो.त्यात विकपिडीया म्हणतो कोणी तरी बदल केला. त्यात दुरूस्ती होते. तेलतुंबडे एका संस्थेवर संशय घेतात. त्याबाबत चौकशी होत नाही. चौकशी संस्थांच  दबावात काम करतात. तेलतुंबडे आरोपी होत असतील तर  विकपिडीयाला कसे वगळणार. लेखक,प्रकाशक दोघांना दोषी ठरविले जाते.दोघांची चौकशी होते. हे सामान्य माणसाला कळते. तपास यंत्रणांना कळू नये. हे कसे शक्य आहे. थांबा आणखी बरेच छुपे उजेडात येतील. अलिकडे अगोदर सावज ठरतो.  मग तपासी संस्था उतरतात असे आरोप होत आहेत. हा वाढता समज खोटा ठरावा.  लोकशाही महान म्हणून चालत नाहीत. तिला मदत करणाऱ्या यंत्रणाही महान व्हाव्यात. हे तेव्हाच शक्य आहे. विना पक्षपात, तटस्थ, निर्भयपणे प्रत्येक व्यक्ती व संस्था काम करील. तेव्हाच संशयाचे ढग बाजूला जातील. त्यासाठी हा खटाटोप.

' रमा' खचू नको 

राजगृहात वावरणारी व्यक्ती जर कटात अडत असेल. तर संशय वाढणारच. जनतेच्या विश्वासाला तडा जाता कामा नये. तपासी संस्था राज्याची की केंद्रातील तपास करणार. यावर दोन सरकारमध्ये मतभेद असतील. तर जनतेने कोणाकडे बघावे. या देशात 'गोली मारो' म्हणणारे मोकळे फिरतात. मंत्रीपदी कायम राहतात. न्यायालयाच्या आदेशानंतरही चौकशी होत नाही. दुसरीकडे केवळ संशयाच्या आधारे माणसं जेलमध्ये कोबत असाल.तर तपासी संस्थां वादात अडणार. करा खुला तपास. दोषी असेल तर फासावर लटकवा. डांबून यातना दिल्याने विचार बदलता येणार नाही.आंबेडकरवादी हिंसेंचे समर्धन करणे शक्यच नाही.तो विचाराने परिपक्व असतो. काय करावे. काय करू नये. त्याला ठाऊक असते. त्याने १४ एप्रिल रोजी जगाला राष्ट्रभक्ती व  शिस्तीचे धडे दिले. राजगृहातून तेलतुंबडे निघाले. त्यांच्या समर्थनार्थ हजारोंचे लोढे घराबाहेर पडले असते.असे घडले नाही. केवळ निषेधाचा केवळ एक झेंडा राजगृहावर फडकला.  इतिहासात पहिल्यादा असे घडले. याची जाण आणि भान राज्यकर्त्यांनी ठेवावे. 'रमा' तु एकटी नाही. तुझ्या सोबतीला संविधान प्रेमी देश आहे. खचू नको. विषमता आणि कारस्थानांच्या बिमोडासाठी उभी हो. न्याय मिळेल. खंबीर हो.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

 लोकशाही व्यापक व्हावी. ती लोकहितकारी व्हावी. सामान्याचा आवाज बुंलद व्हावा. या अभिव्यक्ति स्वातंत्र्यांतर्गंत  डाँ.आनंद तेलतुंबडे यांनी लिखाण केलं. पुस्तकांच्या  स्वरूपात लोकार्पण झालं. ती पुस्तके  देश व विदेशात गाजली. त्यांनी आपले विचार लपून छपून मांडले नाहीत. उजळमाथ्याने दिवसाढवळ्या प्रकाशित केले. हे गेल्या २५-३० वर्ष सुरू होते. तेव्हा सरकारला कुठे गैर दिसलं नाही. त्या लिखाणाची दखल घ्यावी असंही कोणत्याच सरकारला वाटलं नाही. मात्र कटकारस्थाने सुरू होती. 

कटाचा वास 

तेलतुंबडे यांचा लहान भाऊ मिलिंद हा जहाल नक्षलवादी आहे.  हे कोलित विरोधकांच्या हाती लागले. तेथून अर्बन नक्षलचे जाळे फेकणे सुरू झाले. तेलतुंबडे हे पाच भाऊ. दोन बहिणी. सर्व शिकलेले. सरकारी नोकरीत.  सर्वांचे कुटुंब मध्यमवर्गीय जीवन जगत आहेत.  बहिणीसुध्दा शिकलेल्या. एक मिलिंद वगळता सर्वांचे राहणीमान व जगणे सर्वसामान्य. तपास यंत्रणेने  त्याकडे डोळेझाक केली. मिलिंद,मिलिंद एवढाच जप केला. अन् साखळीजोड सुरू केली. अधिक शिकणे. विचारवंत म्हूणून ओळख समाज व्यवस्थेतील लांडग्यांना नको होती . आनंद तेलतुंबडे यांची शिकार करण्याचे ठरले. शिकाऱ्यांनी  नेमकी  ही शिकार साधली.

कावेबाजी.....

 सावज  टिपण्यासाठी कावेबाजी झाली. भीमा कोरेगावच्या हिंसाचाराची प्रतीक्षा केली. यावरून हिंसाचाराला कट-कारस्थानाचा वास येतो. आंबेडकरी समाजात कोणी स्वतंत्र विचार मांडत असेल. त्या विचाराने अनेक वर्षापासून रूजविलेल्या आधारहिन, खोट्या विचाराला खोडून काढत असेल. शोध निबंधाच्या सहाय्याने सत्य मांडत असेल. त्यामुळे खोट्या इतिहासाचे किंवा विचाराचे मजले ढासळत असतील. त्याने हजारों कोटींचे अर्थांजन धोक्यात येत असेल. तर वाटेल ते करण्यास तयार असलेल्यांची पोसलेली माणसं पुढे केली जातात. ज्यांच्या हातात सत्ता व अन्य आयुधे आहेत. ते गप्प थोडीच बसणार होते. त्यांनी आनंद तेलतुंबडे सह १२   जणांना सापळ्यात टाकले. त्यातील कांहीजण त्या- त्या क्षेत्रातील मान्यवर आहेत. 

 प्रश्न अनुत्तरित

अद्यापही  काही घटनांचा उलघडा होत नाही. एल्गार परिषद पुण्यात होते. त्या परिषदेला प्रारंभी विरोध केला जातो. परवानगी रद्द व्हावी.यासाठी सर्व युक्त्या कुलपत्या वापरल्या जातात. त्याला यश मिळत नाही. परिषद यशस्वी होते. तोपर्यंत आयोजकांवर गुन्हे दाखल होत नाहीत. भीमा कोरेगावात हिंसाचार होतो. त्यानंतर तपासाचे चक्र उलटे फिरतात. जावईशोध लावला जातो. एल्गार परिषदेमुळे दंगल घडली. काय तर्क आहे ? कोणाचे डोके असेल. याचा थांगपत्ता लागत नाही. काही अंतरावरील बूर्ज गावात एक समाधी तोडण्याचा प्रयत्न होतो. ती घटना हिंसाचाराचे कारण नाही. पुण्यातील वैचारिक परिषद कारणीभूत ठरते. असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पुढेेे त्यांची उत्तरे शोधू.
आणखी असाच एक प्रश्न आहे. सरकारी पातळीवर घडलेल्या तपासनाट्याचा. गृहमंत्री अनिल देशमुख  कोरेगाव प्रकरणाची चौकशी आरंभ करतात. त्याला २४ तास होत नाही. तर केंद्राची तपास एजंन्सी जागते. एनआयए तपास करणार म्हणून जाहीर करते. त्याचे पथक लगेच पुण्यात पोहचते. कागदपत्र ताब्यात घेण्यास न्यायालयाचे दार ठोठावते. एवढी गती कशी येते. गौरी लंकेश, कुलबर्गी. पानसरे, दाभोळकर हत्या प्रकरणाच्या तपासात गती नाही. जिथे प्रत्यक्षात विचारवंताची हत्या झाली. लाखमोलाची माणसं मारली गेली. तिथे तारिख पे तारिख  सुरू आहे. आनंद तेलतुंबडे यांच्या विरोधातील कटाची सुरवात २०१७ पासून झाली होती. मात्र प्रतीक्षा होती संधीची. ती संधी  भीमाकोरेगावमधील  हिंसाचाराने  दिली. त्या परिषदेत तेलतुंबडेंनी भाग घेतला नव्हता.  जोडीला घातपात आणला. त्या अंतर्गंत कारवाई  केली. आता न्याय हवा .त्यासाठी काही विचारवंत तेलतुंबडे व सहकाऱ्यांसाठी कायद्याची लढाई लढतील.  स्वाक्षरी मोहीम  सुरू करतील. आह ५ लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन देऊन खुली सुनावनीची मागणी करतील. ५ नाही १० लाख स्वाक्षऱ्या होतील. तपासाचा ससेमिरा, डांबणे हा नाहकचा मनस्ताप  आहे.  आतापर्यंत तुमची दखल नव्हती.आता तुम्ही लिहा, वाचावयास लागले.न पटणारे विचार खोडावयास लागले. सत्य काय ते सांगावयास लागले. त्याने असत्यावर उभारलेले मजले हलू लागले.ते साबूत राखण्यास छळ आहे.ओळखा अन् जागे व्हा.

- भूपेंन्द्र गणवीर 
ज्येष्ठ पत्रकार 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.