नागपूर/प्रतिनिधी:
महानिर्मितीने वीज प्रकल्प व्यवस्थापन वेळीच केल्याने स्थापित क्षमतेत वाढ झाली व विजेची तुट भरून काढण्यात यश आले. आज महानिर्मिती देशात दुसऱ्या क्रमांकाची महत्तम स्थापित वीज उत्पादन क्षमता असणारी कंपनी आहे. वाढते शहरीकरण-औद्योगिकरण आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांमुळे आगामी काळात विजेची मागणी किमान १० टक्क्यांनी वाढणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी २५ वर्षे जुन्या औष्णिक प्रकल्पांच्या जागी आधुनिक बदली संच, पर्यावरणपूरक फ्ल्यू गॅस डी-सल्फारायझेशन (एफ.जी.डी.) संयंत्र तथा सौर कृषी प्रकल्प उभारणे आणि पर्यावरण-पाणी-कोळसा व्यवस्थापन अधिक मजबूत करणे हि आगामी आव्हाने आहेत व ते पेलण्यास महानिर्मितीचे अनुभवी मनुष्यबळ सक्षम असल्याचे महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंग यांनी प्रतिपादन केले. ते महानिर्मितीच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “आपुलकी-२०१९” या अभिनव कार्यक्रमात प्रकाशगड मुंबई येथे बोलत होते.
मंचावर अध्यक्षस्थानी महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंग तर विशेष अतिथी म्हणून संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(प्रकल्प) वी.थंगपांडियन, संचालक(वित्त) संतोष आंबेरकर, कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे प्रामुख्याने उपस्थित होते.
महानिर्मितीच्या प्रगतीचे श्रेय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंग यांचे आहे तसेच महानिर्मितीचे अधिकारी-कर्मचारी-कंत्राटदार-पुरवठादार-संघटना प्रतिनिधी, कुटुंबीय यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मोलाचे योगदान आहे. मागील काळात संचालक पाच सूत्री कार्यक्रम, माझी महानिर्मिती-माझे योगदान, पोल, थ्री आर संकल्पना राबविल्याने महानिर्मितीने वीज उत्पादनाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. कार्यक्षमता, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि जलसंवर्धनासाठी महानिर्मितीला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महानिर्मिती आता परिपक्व झाली असली तरी प्रत्येकाने स्वत: मध्ये बदल ,चांगल्या कार्यपद्धती स्वीकारून, आर्थिक प्रगतीसह महानिर्मितीचा दर्जा सातत्याने वाढेल यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार असल्याचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी प्रतिपादन केले.
देशातील राज्य विद्युत मंडळे औष्णिक विजेची स्थापित क्षमता वाढ करीत आहेत. महानिर्मितीची देखील औष्णिक व सौर ऊर्जेद्वारे क्षमता वाढ नियोजित आहे. सध्या विजेची साठवणूक करण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे, त्यादृष्टीने आपल्याला नियोजन करावे लागणार आहे. महानिर्मितीमध्ये महिलांच्या हाती तांत्रिक काम व विजेची दोरी असल्याचा अभिमान संचालक(प्रकल्प) वी. थंगपांडियन यांनी व्यक्त केला.
महानिर्मितीच्या मागील १४ वर्षांत महसुली उत्पन्न, स्थिर संपत्ती आणि भाग भांडवलात लक्षणीय वाढ झाली आहे. मागील काळात योग्य आर्थिक नियोजन, आर्थिक शिस्त, भांडार व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवल्याने आर्थिक घडी समतोल ठेवण्यास भरीव यश प्राप्त झाले. आगामी काळात भांडवली खर्च,नूतनीकरण व आधुनिकीकरण विषयक कामे तसेच खर्चाला प्राधान्यक्रम देण्याचा संकल्प असल्याचे संचालक(वित्त) संतोष आंबेरकर यांनी सुतोवाच केले.
जिद्द,परिश्रम, सहकार्य,प्रयत्नांची पराकाष्टा हे वेगवेगळे शब्द असले तरी घराप्रमाणे आपलेपण जपणे महत्वाचे आहे. जीव लावला कि आपुलकी निर्माण होते आणि आपुलकी असेल तर जीवन सुंदर होईल असे प्रास्ताविकातून विनोद बोंदरे यांनी सांगितले.
प्रारंभी दोन कर्मचारी प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यामध्ये चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे तंत्रज्ञ-१ विष्णू पगारे यांनी सांगितले कि, सध्यस्थितीत महानिर्मिती कंपनीत अधिकारी-कर्मचारी यामधील अंतर कमी होऊन संवाद वाढला आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ हि महानिर्मितीची जमेची बाजू असल्याने नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी प्रत्येकाला उपलब्ध आहे. कामगार म्हणून महानिर्मितीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
नाशिक विद्युत केंद्राच्या सहाय्यक अभियंता लिना पाटील म्हणाल्या कि, महानिर्मितीमध्ये महिला शिफ्टमध्ये काम करतात. वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत महिलांवर विश्वास टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महिलांसाठी सुरक्षित वातावरण आहे. महिलांना आपले कौशल्य दाखविण्याची भरपूर संधी आहे. महानिर्मितीच्या सर्वांगीण विकासात महिला अधिक योगदान देण्यास तयार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सोनाली चुंगडे यांनी तर आभार प्रदर्शन महाव्यवस्थापक(मानव संसाधन) आनंद कोंत यांनी केले.
याप्रसंगी कार्यकारी संचालक संजय मारुडकर, सतीश चवरे, नितीन चांदुरकर, मुख्य अभियंते विजय माहुलकर, प्रभाकर निखारे, श्यामसुंदर सोनी, राजेश मोराळे, नवनाथ शिंदे, कंपनी सचिव राहुल दुबे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे, मुख्य महाव्यवस्थापक(वित्त व लेखा) दत्तात्रय पाटील तसेच महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख, अभियंते, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.