चंद्रपूर, दिनांक 21 मे: 11 एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानाच्या दिर्घ कालावधीनंतर मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अतिशय कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन चंद्रपूर जवळच्या वखार महामंडळाच्या गोदामामध्ये सिलबंद ठेवल्या असून 23 मे रोजी सकाळी 7 वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीला उपस्थितीत गोदाम उघडण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने निरीक्षकांची नेमणूक केली आहे. चंद्रपूरमध्ये दिपांकर सिन्हा व जे.पी.पाठक हे वरिष्ठ सनदी अधिकारी निरीक्षक म्हणून दाखल झाले आहे. ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट ठेवण्यात आलेल्या बंद गोदामाची त्याच पुढे गोदामामध्ये निर्माण करण्यात आलेली मतमोजणी यंत्रणेची निरीक्षकांनी आज पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यावेळी त्यांचे सोबत होते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
मतमोजणी ही प्रक्रिया अतिशय कडक बंदोबस्तात वखार महामंडळातच सुरु होणार असून या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सशस्त्र दलाच्या तुकडीकडे या स्थळाची सुरक्षा व्यवस्था असून या ठिकाणी परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश निषीध्द आहे. प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेमध्ये मतमोजणी सहायक, मतमोजणी पर्यवेक्षक, सुक्ष्म निरीक्षक अशा 328 कर्मचा-यांचा सहभाग आहे. तर परिसरात पाचशे पोलीसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.
यामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी नेमून दिलेल्या मतमोजणी हॉलमध्ये 14 टेबल राहणार आहे. याकरीता 328 कर्मचारी व प्रत्येक टेबलसाठी राजपत्रित दर्जाचे मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक राहणार आहे. तसेच मतमोजणी सूक्ष्म निरीक्षणासाठी मतमोजणी प्रक्रियेचीअचूकता तपासण्याकरीता व मतमोजणीची नोंद घेऊन ते निवडणूक निरीक्षकाकडे सुपूर्द करण्यासाठी एक मतमोजणी सहाय्यक नियुक्त केला जाणार आहे. तसेच प्रत्येक हॉल करिता अतिरिक्त सूक्ष्म निरक्षक देण्यात येणार आहे. तसेच निकाल अचूक असल्याबाबत पर्यवेक्षकाने भरलेला नमुना 17 सी भाग 2 च्या आकडेवारीशी तपासून अचूक असल्याची खात्री करतील. प्रत्येक फेरीचे निकालपत्र निवडणूक निर्णय अधिकारी सोबत तपासून समिक्षा करून घेतील जेणेकरून पुढे कोणत्याही पुनर्मोजणीसाठी वाव राहणार नाही. या सर्व बाबींची वेळोवेळी पारदर्शकता ठेवण्यात येणार आहे.
सकाळी 8 वाजता ईव्हीएम मशीन प्राप्त झाल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेट पेपर पासून मोजणीला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीनव्दारे मोजणी करण्यात येणार आहे. सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठया मोजल्या जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच व्हीव्हीपॅट मशीन मधील चिठ्ठयांची मोजणी प्रत्येक मतदार संघातील प्रातिनिधीक निवड पध्दतीने केली जाणार आहे. (रॅन्डम पध्दतीने) त्यानंतर निकाल घोषित केल्या जाणार आहे.
नागरिकांसाठी 23 तारखेला मतमोजणी परिसरात शंभर मिटर अंतरावर जिल्हा प्रशासनाने थांबण्याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी लाऊडस्पिकरवर माहिती मिळणार आहे. शंभर मिटरच्या आतमध्ये कोणत्याही वाहनाला व नागरिकांना प्रवेश नाही. मतमोजणी कर्मचारी, जिल्हा प्रशासनाचे विशेष प्रवेशीका असणारे कर्मचारी, अनुषंगीक कामगार, निवडणूक आयोगाचे विशेष प्रवेश पत्र असणारे पत्रकार यांनाच फक्त प्रवेश आहे. या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रण निवडणूक आयोगामार्फत करण्यात येणार आहे. यावेळेस प्रथमच व्हीव्हीपॅट मशीन व त्यातील चिठ्ठयांची मोजणी देखील होणार असल्यामुळे दरवेळीपेक्षा निकालाला अधिक वेळ लागू शकतो, अशी शक्यता जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी व्यक्त केली आहे.