Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

eco-pro लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
eco-pro लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, जानेवारी ०१, २०२२

 रामाळा तलाव येथे इको प्रोतर्फे नव्या वर्षीच्या पहिल्या दिवशी संकल्प अभियान

रामाळा तलाव येथे इको प्रोतर्फे नव्या वर्षीच्या पहिल्या दिवशी संकल्प अभियान


 रामाळा तलाव येथे इको प्रोतर्फे नव्या वर्षीच्या पहिल्या दिवशी संकल्प अभियान  

चंद्रपूर | शहरातील पर्यावरणप्रेमी इको-प्रो पर्यावरण विभागाच्या वतीने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी रोजी रामाळा तलाव येथे संकल्प अभियान कार्यक्रम घेण्यात आला. शहराला प्रदुषणमुक्त करण्यासाठी प्रसंगी दवाबगट निर्माण करून, चंद्रपूर शुध्द हवा कार्यक्रम’ या अभियान राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. 


यावेळी इकोप्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी सांगितले कि, या वर्षात राज्यव्यापी शहरी तलाव संवर्धन व प्रदुषषमुक्ती अभियान राबवून  इको-प्रो वन्यजीव विभागकडुन चंद्रपूर शहरालगतच्या सिटीपीएस-वेकोली परिसरातील मानव-वन्यप्राणी संघर्ष व जिह्यातील बिबट समस्यामुक्त ग्रामसाठी कार्य करणे, 

रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीसोबत त्याचे सौदर्यीकरण व पर्यटन विकासाकरिता प्रयत्न करणे, चंद्रपूर किल्ला व वास्तु संवर्धनासोबतच ऐतिहासिक पर्यटन विकासाच्या दृष्टीने व्यापक कार्य करण्यात येईल.  


इको-प्रो महिला मंचच्या माध्यमाने महिला विषयक समस्यावर व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविण्याचा संकल्प असून, यात सैनेटरी नैपकिन, पाळी विषयक समस्याबाबत कार्य करण्याचा संकल्प, शिक्षण विभागाकडुन अभ्यासिका सुरू करण्याचा संकल्प, इको-प्रो आरोग्य विभाग कडून आरोग्य व्यवस्था विषयक कार्य करण्याचा संकल्प या नवीन वर्षात करण्यात आलेला आहे.


शनिवार, डिसेंबर २५, २०२१

रामाला तलावाच्या विकासासाठी भरघोष निधी देऊ; पालकमंत्री विजय वडेट्टीवार

रामाला तलावाच्या विकासासाठी भरघोष निधी देऊ; पालकमंत्री विजय वडेट्टीवार



सौंदर्यीकरण/खोलीकरण भूमिपूजन सोहळ्यात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन 


चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील रामाला तलावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोंडराजे आणि भोसले काळातील या आठवणी आणि वैभवशाली वस्तू जटन कारण्यासाठ भरघोष निधी देऊ असे आश्वासन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. शनिवार दिनांक २५ डिसेंबर रोजी रात्री ७.३० वाजता चंद्रपूर शहर येथील खनिज प्रतिष्ठान अंतर्गत रामाळा तलाव सौंदर्यीकरण/खोलीकरण भूमिपूजन सोहळा ते बोलत होते. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे  यांची  उपस्थिती होती. 


येथील रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. रामाळा तलाव शहरातील सांडपाण्यामुळे प्रदूषित झाल्याने सौंदर्यीकरण/खोलीकरण कर्णयसाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला. त्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. 


Guardian Minister Vijay Vadettiwar | MP Balu Dhanorkar | MLA Kishor Jorgewar | President of Eco Pro Bandu Dhotre

रविवार, ऑगस्ट १५, २०२१

 चंद्रपूर शहरात इको-प्रो चे आता ‘खिळेमुक्त वृक्ष’ अभियान

चंद्रपूर शहरात इको-प्रो चे आता ‘खिळेमुक्त वृक्ष’ अभियान

महानगरपालिका आयुक्त राजेश मोहीते च्या उपस्थितीत सुरूवात

सोबतच ‘आडेयुक्त वृक्ष’ अभियान राबविणार

‘माझी वंसुधरा अभियान’ अंतर्गत संयुक्त अभियान राबविणार

Eco pro CMC Chandrapur Tree

 Eco pro CMC Chandrapur Tree 

चंद्रपुर: कोरोना काळात आॅक्सिजन देणाऱ्या वृक्षांचे महत्व आपणास कळाले. नैसर्गिकरित्या शुध्द आॅक्सिजन देण्याचे अविरत कार्य आपल्या सभोवतालची वृक्ष करित असतात. सर्व प्रकारच्या जिवांसाठी वृक्ष, जैवविवीधता यांच्या अस्तित्वाचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. आपण मानव मात्र प्राणवायु देणाऱ्या या वृक्षांना खिळे ठोकत आहोत. अनाधिकृत जाहीरातीचे फलक-बॅनर्स लावण्यासाठी झाडांचा वापर केला जातो. झाडांवर खिळे ठोकुन जाहीराती केल्या जात आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासांठी प्रत्येक झाड ‘खिळेमुक्त’ करण्याची गरज आहे.


याकरिता आज इको-प्रो संस्थेच्या वतीने ‘खिळेमुक्त वृक्ष’ या अभियानाची सुरूवात 15 आॅग पासुन स्वांतत्र्यदिनाचे औचित्य साधत करण्यात आली. या अभियानाचे शुभारंभ पालीका आयुक्त राजेश मोहीते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे, इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके व पालीका उद्यान निरीक्षक अनूप ताटेवार प्रामुख्याने उपस्थित होते. या अभियानात आज पठाणपुरा गेट लगतचे तर पाणी टाकी लगतच्या वृक्षांचे खिळे, फलक काढण्यात आले. यावेळी इको-प्रो चे धर्मेद्र लुनावत, ओमजी वर्मा, अनिल अडगुरवार, राजेश व्यास, सुधिर देव, अब्दुल जावेद, अमोल उटटलवार, सचिन धोतरे, जयेश बैनलवार, अभय अमृतकर सहभागी होते.


शहरात आज अनेक ठिकाणी हेरीटेज वृक्ष दिसुन येतात, या वृक्षांचे संरक्षण करण्याची जवाबदारी ही पालीका किंवा पर्यावरण संस्थेची नसुन प्रत्येक व्यक्तीची आहे. वृक्ष तोड होत असल्यास प्रत्येक नागरीकांनी यात हस्तक्षेप करीत तक्रार करण्याची गरज आहे. शहरातील विकासकामे दरम्यान वृक्ष वाचविण्याची, घराचे बांधकाम करतांना सुध्दा वृक्ष वाचविण्याची सर्वाची जवाबदारी आहे. शहरात विवीध कारणांसाठी वृक्षांना खिळे ठोकले जात असल्याने झाडांना इजा पोहचवीली जाते. याकरिता आपल्या परिसरातील वृक्षांना खिळे ठोकु न देणे तसेचे खिळेमुक्त वृक्ष करण्यास प्रत्येकांनी पुढाकार घेत या अभियानात सहभागी होण्याची गरज आहे.


‘आडेयुक्त वृक्ष’ - 'देऊ वृक्षांना मोकळा श्वास' अभियानाची सुध्दा सुरूवात


शहरात मोठया प्रमाणात विकासकामे केली जात आहेत, यात सिंमेट क्राॅकीट रस्त्याचे बांधकामाचे प्रचलन वाढले आहे. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे या क्राॅकीटीकरणामुळे झाडांना काटोकाट कांक्रीट किंवा डांबर टाकल्याने वृक्षांचा श्वास कोंडला जातोय. यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडुन ठोस निर्देश देण्याची गरज असुन कुठलेही रोड बांधकाम करतांना वृक्षांना 'आडे' ठेवणे किंवा वृक्ष लावण्यास जागा ठेवुन आडे करण्याची गरज आहे. ज्या वृक्षांचा श्वास कोंडला जात आहे ती जागा मोकळी करून आडे करण्याची गरज लक्षात घेउन या अभियान अंतर्गत अशी झाडी ओळखुन त्या सभोवताल आडे करण्यात येणार आहे. याबाबत इको-प्रो संयुक्तरित्या काम करणार आहे.

राज्यात पर्यावरण विभागांकडुन राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वंसुधरा अभियान’ अंतर्गत इको-प्रो ‘खिळेमुक्त वृक्ष’ व ‘आडेयुक्त वृक्ष' - 'देऊ वृक्षांना मोकळा श्वास’ या अभियान राबविण्यात येणार आहे. चंद्रपूरकर नागरीकांनी आपल्या सभोवताल, घर-परिसरात अशी खिळे फलक ठोकलेली वृक्ष आढळल्यास ती खिळेमुक्त करण्याचे तर कांक्रीटीकरणामुळे वृक्षांचा श्वास कोंडलेल्या वृक्षांना मोकळा श्वास देण्यास त्या सभोवताल आडे करून घ्यावे किंवा शक्य नसल्यास महानगरपालिका व इको-प्रो ला कळवावे असे आवाहन बंडु धोतरे यांनी नागरीकांना केले आहे.


 Eco pro CMC Chandrapur Tree 

शुक्रवार, जून २५, २०२१

ऐतिहासिक वास्तु-स्थळ संरक्षण-स्वच्छता विषयी जागृती करणार

ऐतिहासिक वास्तु-स्थळ संरक्षण-स्वच्छता विषयी जागृती करणार





चंद्रपुर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारक बाबत भारतीय पुरातत्व विभाग व इको-प्रो मधे करार


चंद्रपुर: भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांची केंद्रिय संरक्षित स्मारक/स्थळ मध्ये स्वच्छता आणि मुलभूत पर्यटन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत “स्मारकाची दत्तक परियोजना” हा महत्वपुर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या परियोजने अंतर्गत चंद्रपुर जिल्हातील 21 केंद्रिय संरक्षित स्मारक बाबत इको-प्रो सोबत नुकतेच करार करण्यात आलेला आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग ASI कडून एखाद्या स्वयंसेवी संस्थे सोबत अश्या पद्धतिचा करार करण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याचे कळते. या ऐतिहासिक वास्तु बाबत नागरिक मधे या वास्तुचे संरक्षण व स्वच्छता विषयी जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारक स्थळ आणि परिसरात “स्वच्छ भारत अभियान” राबविण्याच्या दृष्टीने 24 मे 2018 रोजी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि चंद्रपुर येथील इको-प्रो संस्था याच्यात पहिल्यांदा करार करण्यात आलेला होता. सदर करार समाप्तिनतंर नागपुर येथे भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयात पुढील दोन वर्ष करिता पुनर्करार करण्यात आला.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण चे नागपूर मधील प्रदेशिक कार्यालय ‘पुरातत्व भवन’ मध्ये या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी पुरातत्व विभाग च्या वतीने डॉ. केआरके रेड्डी, अधीक्षक पुरातत्वविद, नागपुर मंडळ यांनी तर इको-प्रो संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या. या कार्यक्रमात भारतीय पुरातत्व विभाग चे एनबीडी कंपेगौड़ा, सहायक अधीक्षण पुरातत्व अभियंता, डॉ. शिल्पा जामगडे, सहायक पुरातत्विद भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, प्रशांत शिंदे, वरिष्ठ संरक्षण सहायक व इको-प्रो चे नितिन रामटेके, धर्मेंद्र लुनावत, कुणाल देवगिरकर आदी उपस्थित होते.

विशेष म्हणजे इको-प्रो संस्था मागील 3 वर्ष पासून 1 मार्च 2017 पासून अविरत पणे 11 किमी लांब चंद्रपुर मधील किल्ला, भिंती आणि बुरुजांना स्वच्छ करण्याचे काम सलग 1000 अधिक दिवस पूर्ण केले होते. इको-प्रो च्या या स्वच्छता अभियानाचा उल्लेख यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या "मन की बात" या कार्यक्रमात संस्थेचा आणि चंद्रपुर शहराचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. अलिकडच्या काळात संस्थेच्या माध्यमाने हेरिटेज वॉक या उपक्रमातून किल्ला व ऐतिहासिक वास्तु पर्यटन सुरु करण्यात आले असून, यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बुधवार, एप्रिल २८, २०२१

बोला सकारात्मक, शेयर करा 'पोस्ट' सकारात्मक, नक्कीच होईल सकारात्मक"

बोला सकारात्मक, शेयर करा 'पोस्ट' सकारात्मक, नक्कीच होईल सकारात्मक"






"साथ आपली, आपल्याकरिता या कठिण प्रसंगात..."

कोरोना विरोधात लढण्यास
"सकारात्मक सोशल मीडिया"* मोहिम...

मित्रांनो, या कोरोनाच्या कठिण काळात हे सोशल मीडिया वरुन अभियान सुरु करण्यात आले आहे...

सध्या कोरोना काळात सर्वत्र नकारात्मकता सुरु असून, अनेक चुकीचे पोस्ट वायरल होत आहेत, यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. साधे रुग्ण मधे सुद्धा भीतिचे वातावरण आहे, रोज अनेक शहरात शेकडो-हजारो कोरोना रुग्ण उपचार घेऊन घरि परतत आहेत, मात्र यावर चर्चा न होता अनेक नकारात्मक बाबीमुळे व्यक्ति बाधित होण्यापूर्वीच घाबरत आहेत...

सध्या दूसरी लाट सुरु असून अवतीभवती रुग्ण आढळून येत आहेत. अनेक समस्या जरी दिसत असल्या तरी अनेक रुग्ण, वयोवृद्ध रुग्ण सुद्धा या कठिन परिस्थितीत कोरोनावर मात करीत आहेत. तेव्हा ही इच्छाशक्ति, मनोबल कमी होऊ न देता ते वाढविण्याची गरज आहे. ही सकारात्मकता सर्वत्र पसरविणे गरजेचे आहे.

अनेक व्यक्ति कोरोनामुक्त होत आहेत, लक्षणाकड़े लक्ष, त्वरित तपासणी, योग्य उपचार आणि सकारात्मकता ठेवली तर शक्य आहे. आपण आपल्या मित्र, शेजारी, नातेवाईक यांचेशी संपर्क साधुन, बोलून धीर दिल्यास या आजारातून बरे होण्यास सामर्थ्य मिळेल...

महत्वाचे म्हणजे सध्या 'नकारात्मकता' पसरविणारे सोशल माध्यमच जर 'सकारात्मक' पोस्ट करू लागल्या की संपूर्ण वातावरणच बदलून जाईल...
नव्या क्रांतिच माध्यम सोशल मीडिया याचा सुद्धा सकारात्मक वापर करूया....

हवी आहे...
"साथ आपलीं, आपल्याकरिता या कठिन प्रसंगात..."

बघा जमतयं का...?

आम्ही सुरुवात केलियं, आपणही करा...अनेक व्यक्ति या मोहिमेत सहभागी आहेत....


*बंडू धोतरे, इको-प्रो*
(राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी, भारत सरकार) 9370320746

गुरुवार, एप्रिल २२, २०२१

विहिरीत पङला वाघाचा बछङा

विहिरीत पङला वाघाचा बछङा





विहिरित पडलेल्या वाघ शावकाचे रेस्क्यू व काही तासातच वाघिनी सोबत पुनर्मिलन यशस्वी.

मनःपूर्वक अभिनंदन टीम चंद्रपुर वनविभाग, RRU ताडोबा, RRU चंद्रपुर वनविभाग आणि सर्व वनाधिकारी कर्मचारी....

सुशी दाबगावं येथील एफडीसीएम वनक्षेत्र लगत शेतातील विहिरीत वाघाचा पिल्लू पडलेला असल्याची माहिती वनविभागास मिळाली, मात्र विहिरित असलेल्या खडकावर सुरक्षित होता. माहिती मिळताच चंद्रपुर वनविभाग अधिकारी-कर्मचारी, RRU ताडोबा आणि चंद्रपुर घटनास्थळी पोहचले, यशस्वीरित्या रेस्क्यू करून TTC ला आणण्यात आले.




मात्र संध्याकाळी सदर परिसरात वाघिनीचे अस्तित्व दिसून येताच TTC मधून वाघ शावकास आणून पुनर्मिलन करण्याचे प्रयत्न करण्यात आले, यात वनवीभगास यश आल्याने आई पासून विभक्त झालेल्या शावकास काही तासातच आई मिळाली.
यापूर्वी सुद्धा एका याच सुशी दाबगांव परिसरात आई पासून विभक्त झाल्यानंतर रेस्क्यू करण्यात आले होते, मात्र बरेच प्रयत्न करूनही पुनर्मिलन होऊ शकले नव्हते त्या बछड़यास कायम पिंजरा आला...

शुक्रवार, एप्रिल ०९, २०२१

चंद्रपूर जिल्ह्यात दोन बिबट्याचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात दोन बिबट्याचा मृत्यू

आज दिनांक 09/04/2021 रोजी चंद्रपूर परिक्षेत्रातील उपक्षेत्र दुर्गापूर नियतक्षेत्र पायली - भटाळी मधील कक्ष क्रमांक 880 मध्ये क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना गस्ती दरम्यान सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास वन्यप्राणी बिबट ( मादी ) मृत अवस्थेत आढळून आला. शवविच्छेदन अहवाल अप्राप्त असून सदर बिबट्याचा मृत्यू दोन वन्यप्राण्याच्या झुंजीमुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. दुसरी घटना चंद्रपुर वनविभागा अंतर्गत सावली परिक्षेत्रातील नियतक्षेत्र चकपिरंजी मौजा - बोथली येथील शेतशिवारात घङली.


आज दिनांक 09/04/2021 रोजी चंद्रपूर परिक्षेत्रातील उपक्षेत्र दुर्गापूर नियतक्षेत्र पायली - भटाळी मधील कक्ष क्रमांक 880 मध्ये क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना गस्ती दरम्यान सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास वन्यप्राणी बिबट ( मादी ) मृत अवस्थेत आढळून आला. शवविच्छेदन अहवाल अप्राप्त असून सदर बिबट्याचा मृत्यू दोन वन्यप्राण्याच्या झुंजीमुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच श्री.आर.ए.कारेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी , चंद्रपूर ( प्रादेशिक) व श्री. बंडू धोतरे , अध्यक्ष ECO - Pro, चंद्रपूर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृत बिबट वयस्क व शाबूत स्थितीत आढळून आला.

त्यानंतर कु.एस.व्ही.जगताप , विभागीय वनअधिकारी , चंद्रपूर यांनी घटनास्थळी येऊन मृत बिबट्याची पाहणी केली . सदर मृत बिबट्याचे शवविच्छेदन डॉ.बावणे , पशुवैद्यकीय अधिकारी , पशुसंवर्धन जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय , चंद्रपूर व त्यांचे सहकारी तसेच कु.एस.व्ही.जगताप , विभागीय वनअधिकारी, चंद्रपूर श्री. आर.ए.कारेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी , चंद्रपूर ( प्रादेशिक ) , यांचे समक्ष ( Standard Operating Procedure मानक कार्यपद्धती सूचना नुसार करण्यात येऊन TTC , चंद्रपूर येथे दहन करण्यात आले .


चंद्रपुर वनविभागा अंतर्गत सावली परिक्षेत्रातील नियतक्षेत्र चकपिरंजी , मौजा - बोथली येथील शेतशिवारात श्री.व्ही.जी.चौधरी , वनरक्षक चकपिरंजी है गस्त करित असतांना बोथली शिवेमधुन जाणाऱ्या नाल्याच्या जवळ गट क्रमांक 211 मध्ये बिबट ( नर ) मृत्यु पावलेला दिसला . याची माहिती वरिष्ठांना मिळताच श्री. एस. एल. लखमावाइ , सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी सावली, क्षेत्र सहाय्यक सावली व श्री . जांभुळे पशुधन विकास अधिकारी , पंचायत समिती मुल , डॉ . रविकांत खोब्रागडे , पशुवैद्यकीय अधिकारी , ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प , चंद्रपूर , श्री . डॉ . कुंदन पोडचलदार , पशुवैद्यकीय अधिकारी , TTC चंद्रपुर , श्री मुकेश भांदककर , अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजिव ) यांचे प्रतिनीधी व श्री . उमेशसिह तेजसिह झिरे , WPSI सदस्य मुल यांनी सदर बिबटचे पाहणी केली . पंचासमक्ष सदर मृत बिबटची तपासणी केली असता बिबट नर असुन त्याचे वय अंदाजे 8 वर्ष असल्याचे दिसून आले . सदर बिबटाचे नखे , मिशा , दात हया सर्व शाबुत होते . सदर बिबटचे शवविच्छेदन दरम्यान शरीर कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण सांगता येणार नाही असे पशुधन विकास अधिकारी यांचे चमुने सांगीतले . सदर नृत बिबटचे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले .

गुरुवार, एप्रिल ०८, २०२१

 रामाळा तलाव फुट ओव्हर ब्रिज बांधकाम प्रस्तावाची रक्कम कमी करा - पालकमंत्री

रामाळा तलाव फुट ओव्हर ब्रिज बांधकाम प्रस्तावाची रक्कम कमी करा - पालकमंत्री




चंद्रपूर दि. 8 एप्रिल : चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव प्रदुषणमुक्त व सौंदर्यीकरण करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागांने फुट ओव्हर ब्रिज बांधकाम प्रस्तावाची रक्कम कमी करुन नवीन प्रस्ताव सादर करावा. तसेच तलावातील गाळ काढणे व एस.टी.पी. (Seivage Treatment Plant) बसविण्याचे काम, मच्छीनाला येथील पाणी झरपट नदी येथे वळविण्याकरीता नाला बांधकाम व पश्चिम बाजुला रिटेलिंग वॉलचे बांधकाम इ. कामांचे सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी घेऊन पाटबंधारे विभाग व महानगरपालिका यांनी तात्काळ कामे सुरु करावे, असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली रामाळा तलाव प्रदूषण मुक्त करणे व सौंदर्यीकरण करणे याबाबत नुकतेच आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, जिल्हा स्टेशन मास्टर रेल्वे विभाग श्री. मुर्ती, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्याम काळे, वरिष्ठ संरक्षण सहायक पुरातत्व विभाग प्रशांत शिंदे, इको-प्रो संस्थेचे बंडु धोतरे, विक्रांत जोशी इ. उपस्थित होते.


तलावातील गाळ शेतीसाठी उपयुक्त असून ज्या शेतकऱ्यांना हा गाळ हवा असेल त्यांना तो देण्यात यावा असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. त्यापुर्वी सर्व अधिकारीसमवेत पालकमंत्री वडेट्टीवार यांनी रामाळा तलावाची पाहणी केली.

रविवार, मार्च २८, २०२१

रामाळा तलाव स्वच्छता अभियान - श्रमदान मध्ये विविध संस्था संघटनाचा पुढाकार

रामाळा तलाव स्वच्छता अभियान - श्रमदान मध्ये विविध संस्था संघटनाचा पुढाकार






नांदगाव शिव छत्रपती प्रचारक मंडळ, जंगल जरनी महिला ग्रुप, इको-प्रो महिला मंच


स्वच्छता अभियानास महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांची भेट

चंद्रपूर: आज इको-प्रो तर्फे सुरू असलेल्या रामाळा तलाव स्वच्छता अभियान चा १४ वा दिवस आजच्या श्रमदानात इको-प्रो संस्थेच्या सदस्यासोबत विविध संस्था-संघटनाच्या युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इको-प्रो तर्फे रामाळा तलाव संवर्धन करिता करण्यात आलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन नंतर 15 मार्च पासून नियमित रोज सकाळी रामाळा तलाव स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आज नांदगाव येथील शिव छत्रपती प्रचारक मंडळ चे युवक, जंगल जरनी या महिला ग्रुप च्या महिला व इको-प्रो महिला मंच च्या महिला सहभागी झाल्या होत्या.

आज श्रमदान अभियानात तलावातील प्लास्टिक संकलन करण्यात आले, तसेच विसर्जन दरम्यान विसर्जित केलेले मडकी, दिवलण्या, जलपात्र, कापड जमा करून तलाव स्वच्छ करण्यात आले. तसेच एक देऊळ ते बगड खिडकी 1999 मध्ये रामाळा उद्यान निर्मिती वेळेस तयार करण्यात आलेला पर्यटन रस्ता सुद्धा स्वच्छता करण्यात येत आहे. या रस्ताचा वापर नसल्याने अतिक्रमण झाले होते, झाडी-झुडपे वाढली होती त्याची स्वच्छता यापूर्वी किल्ला स्वच्छता दरम्यान केली होती दरम्यान या रस्ताचा काहीच वापर न झल्याने झुडपे वाढली ती परत स्वच्छता करण्यात येत आहे.


आज महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी रामाळा तलावास भेट देत श्रमदान तसेच तलावातील आवश्यक करावयाची कामाबाबत पाहणी केली. श्रमदान मध्ये सहभागी सदस्य व नागरिकांचे कौतुक केले व आपला वारसा असलेल्या तलाव व किल्ला संवर्धन करिता नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केले. तलावाच्या कामास गती देण्यास पालिका कडून करावयाच्या आवश्यक कामाची माहिती यावेळी बंडू धोतरे यांनी आयुक्त यांना दिली.



आजच्या श्रमदानात शिव छत्रपती प्रचारक मंडळ नांदगाव पोडे मार्गदर्शक बंडू काकडे, दीपक तुरानकर, अध्यक्ष महेंद्र डोये उपाध्यक्ष नितेश येग्गेवार, प्रदीप भोयर सह अनेक नांदगाव मधील युवक, जंगल जरनी च्या चित्रा इंगोले, वंदना मून, वैशाली फुलकर, विद्या चित्रीव तर इको-प्रो महिला मंच च्या योजना धोतरे, भारती शिंदे, मोनाली बुरडकर, नीता रामटेके, मनीषा जयस्वाल तसेच सामाजिक कार्यकर्ते किशोर जामदार, अमर गेही, चांदा पब्लिक स्कूल चे अमर सर व इको-प्रो सदस्य व नांदगाव मधील युवक सहभागी झाले होते.

मंगळवार, मार्च २३, २०२१

रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीसाठी उद्योजकांनी सामाजिक दायित्व स्विकारावे - जिल्हाधिकारी

रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीसाठी उद्योजकांनी सामाजिक दायित्व स्विकारावे - जिल्हाधिकारी



सि.एस.आर. बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे उद्योजकांना आवाहन

चंद्रपूर दि. 23 मार्च : शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करुन सौंदर्यीकरण करण्यासाठी  उद्योजकांनी सामाजिक बांधिलकी अंतर्गत (सि.एस.आर.) सकारात्मक प्रतिसादर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काल सि.एस.आर. प्रमुखांच्या आढावा सभेत जिल्हाधिकारी कार्यालयात वीस कलमी सभागृहात केले.

रामाळा तलावातील गाळ काढणे, एस.टी.पी. बसविणे, रिटेनिंग वॉलचे काम व पुल बांधण्याचे कामे मंजुरीबाबत शासनास प्रस्ताव पाठविलेला आहे. सामाजिक बांधिलकी अंतर्गत उद्योजक कंपनी यांनी निधीची व्यवस्था करावी किंवा मशीनरी उपलब्ध करुन द्यावी, याबाबत येत्या सात दिवसात सर्व उद्योजक प्रमुखांनी आप-आपले सहकार्य उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्या कार्यालयास कळवावे. उद्योजकाचे योगदान कशाप्रकारे प्राप्त होईल याबाबत पुनश्च: आढावा बैठक घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी सांगितले.

आढावा सभेस अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे श्याम काळे, उपकार्यकारी अभियंता पाटबंधारे (यांत्रिकी) श्री. बिसने, इकोप्रोचे  पर्यावरण  विभाग प्रमुख नितीन रामटेके, व जिल्ह्यातील उद्योजग प्रमुख उपस्थित होते.

शुक्रवार, मार्च ०५, २०२१

फ्रायडे फॉर फ्युचरच्या विद्यार्थिनींनी केले रामाळा तलाव बचावासाठी प्रदर्शन

फ्रायडे फॉर फ्युचरच्या विद्यार्थिनींनी केले रामाळा तलाव बचावासाठी प्रदर्शन

माजी खासदार नरेश पुगलिया यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र


चंद्रपूर - शहरातील गोंडकालीन रामाळा तलावातील वाढते जलप्रदूषण नियंत्रणात आणण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी चंद्रपूर शहरातील फ्रायडे फॉर फ्युचरच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी रामाळा तलावाच्या काठावर फलक घेऊन प्रदर्शन केले. इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला त्यांनी पाठिंबा दिला.

चंद्रपूर शहरातील प्रदूषित वातावरणाने जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रणात आणण्याच्या मागणीसाठी मागील वर्षी दर शुक्रवारी शालेय विद्यार्थींनीनी फ्रायडे फॉर फ्युचर उपक्रमाअंतर्गत आंदोलन केले होते. आता जल प्रदूषण कमी करण्यासाठी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी या मुलींनी मानवी साखळी केली. आज आंदोलनाचा १२ वा दिवस असून, प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही. दरम्यान, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून इको प्रो ने केलेल्या मागण्या तातडीने मंजूर करण्याची विनंती केली आहे. चंद्रपूरशिवाय महाराष्ट्रातील सर्व जलस्रोत प्रदूषण मुक्त करण्याची मागणीही केली आहे. आज पंजाबी सेवा समितीच्या वतीने अध्यक्ष विक्रम शर्मा, सचिव नितीन कपूर, कोषाध्यक्ष जतींद्र कुमार यांनी पाठींबा दिला.


हिंस्र वन्यप्राण्याचा वावर थांबविण्यासाठी पठाणपुरागेटबाहेर वेकोलिने स्वच्छता करावी : बंङू धोतरे

हिंस्र वन्यप्राण्याचा वावर थांबविण्यासाठी पठाणपुरागेटबाहेर वेकोलिने स्वच्छता करावी : बंङू धोतरे




जमनजट्टी, माना-लालपेठ परिसर परिसर वन्यप्राणीमुक्त करा

मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांची मागणी


चंद्रपूर/ प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून माना-लालपेठ परिसरात अस्वलीचा वावर सुरू आहे. पठाणपुरा गेटबाहेर या वेकोलिच्या ओवरबर्डन परिसरातील झाङेझुङपे तातङीने काढण्याची मागणी अशी मागणी विभागीय वनाधिकारी सारिका जगताप यांच्याकडे इकोप्रोचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंङू धोतरे यांनी केली आहे.

पठाणपुरा गेटबाहेर जमनजट्टी परिसरात सकाळी मॉर्निंग वॉककरिता नागरिक येत असतात. याच वेकोलीच्या ओव्हर बर्डनवर 2013 मध्ये तीन बिबट पकडण्यात आलेले आहे. मागील वर्षभरात माना परिसरात वाघाचा वावर सुद्धा दिसून आलेला आहे.परिसरात वाढलेले काटेरी बाभळीचे झुडूप कारणीभूत ठरत आहेत. बाबळीचे कत्रिम जंगल तयार झाले आहे. वेकोलिकडून दरवर्षी सदर परिसर स्वच्छ करण्याची गरज असताना, रोड च्या दुतर्फा कायम स्वच्छता ठेवणे गरजेचे असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे. येथे वन्यप्राणी वावर असल्याने याकडे सतत देण्याची लक्ष आहे. वनविभागाच्या वतीने त्वरित कार्यवाही करीत वेकोली कडून स्वछता आणि झुडुपे काढण्याची कामे करवून घ्यावी, अशी मागणी इको प्रोचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंङू धोतरे यांनी विभागीय वनाधिकारी सारिका जगताप यांच्याशी चर्चा करताना केली.

दरम्यान आज सुनील लेनगुरे नामक व्यक्ती अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाला. इकोप्रोच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाणून प्रकृतीची विचारपूस केली. सदर जखमी व्यक्तीचा वैद्यकीय सल्ल्यानुसार चेहरा विद्रूप झाला असल्यास त्वरित प्लास्टिक सर्जरी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे.



अशा घटनांवर आळा घालण्यासाठी विविध बैठकीत सूचना देऊन कार्यवाही होत नसल्याची टीका मानद वन्यजीव रक्षक धोतरे यांनी केली आहे. अगदी पहाटे पठाणपुराबाहेर कुणीच फिरायला सध्या परिस्थितीत जाऊ नये, स्वतःची सुरक्षा लक्षात घेऊन परिसर स्वच्छ होईस्तोवर परिसरात मॉर्निंग वॉक करू, नये असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांनी केले आहे.

बुधवार, मार्च ०३, २०२१

नागपुरात मूक आंदोलन: पुरातन तलावाचे संवर्धन करा; युवा चेतना मंचचे इको प्रोच्या आंदोलनाला समर्थन

नागपुरात मूक आंदोलन: पुरातन तलावाचे संवर्धन करा; युवा चेतना मंचचे इको प्रोच्या आंदोलनाला समर्थन


नागपूर- राज्यशासनाने राज्यातील सर्व जिल्ह्य़ातील पुरातन तलावाचे संवर्धन करावे असे सांगून युवा चेतना मंचने चंद्रपूर येथील रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या इको प्रोच्या  आंदोलनाला त्यांनी समर्थन दिले.

चंद्रपुरातील रामाळा तलावाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच चंद्रपूर महापालिका, मध्य रेल्वे आणि इतर विभागाला याबाबत जी मागणी के ली आहे त्यामुळे भविष्यात तलावाचे संवर्धन व संरक्षण होईल, असे सांगण्यात आले. 

नागपूर शहरातील ऐतिहासिक तलावांकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष आणि त्यामुळे तलावांची होणारी दुरवस्था याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मानवी साखळी तयार करण्यात आली. गांधीसागर आणि सक्करदरा तलावाचे संवर्धन व्हावे, या मागणीसाठी युवा चेतना मंचने मूक आंदोलन केले.

महापौर दयाशंकर तिवारी यांना १५ दिवसांपूर्वीच गांधीसागर आणि सक्करदरा तलावाच्या स्वच्छता आणि सौंदर्यीकरणासाठी निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी मार्च महिन्यात या तलावाच्या स्वच्छतेचे आणि त्यानंतर सौंदर्यीकरणाचे काम सुरू होईल, असे आश्वासन महापौरांनी  दिले. मात्र, मार्च महिना उलटूनही याबाबत कोणतेही पाऊल महापालिके ने उचलले नाही.

त्यामुळे मंगळवारी गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरण आणि संवर्धनासाठी मूक आंदोलन करण्यात आले. ‘सेव्ह गांधीसागर’ असा फलक हातात घेऊन मानवी साखळी तयार करण्यात आली. प्रशासनाने या तलावाकडून येणाऱ्या मलवाहिन्या बंद कराव्या. तलावातील संपूर्ण कचरा आणि गाळ स्वच्छ करावा. याठिकाणी रंगीत फवारे सुरू करण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. बुधवारी सक्करदरा तलावासमोर याच पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या स्वच्छतेबाबत प्रशासनाने पाऊल उचलले नाही तर लोकसहभागातून या दोन्ही तलावांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात येईल, असे दत्ता शिर्के यांनी सांगितले. यावेळी युवा चेतना मंचचे अध्यक्ष दिलीप दिवटे, उपाध्यक्ष महेश महाडिक, विवेक पोहाणे, आशिष खडके , दत्ता शिर्के आदी उपस्थित होते.

सोमवार, मार्च ०१, २०२१

 अन्नत्याग सत्याग्रहाच्या समर्थनार्थ 25 जणांनी केले आत्मक्लेश सामूहिक मुंडन

अन्नत्याग सत्याग्रहाच्या समर्थनार्थ 25 जणांनी केले आत्मक्लेश सामूहिक मुंडन



चंद्रपूर/ प्रतिनिधी

रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला सोमवारी आठ दिवस उलटून गेल्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने पाठिंबा देण्यासाठी आंदोलनाच्या समर्थनार्थ 25 जणांनी मुंङण केले.
सोमवारी दिवसभरात शहरातील विविध संस्था, संघटना आणि राजकीय पदाधिका-यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला. रामाळा तलावातील जलप्रदूषण आणि इको प्रोने केलेल्या मागण्यासंदर्भात बंङू धोतरे यांच्याशी चर्चा केली. मागील आठ दिवसांपासून सुरु असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी 25 जणांनी मुंङण केले. आत्मक्लेश सामूहिक मुंडन आंदोलनात स्वतः बंडू धोतरेसह इको प्रोचे नितीन बुरडकर, धर्मेंद्र लुनावत, संजय सब्बनवार, हरिदास कोराम, सुमित कोहळे, अमोल उट्टलवार, कपिल चौधरी, हरीश मेश्राम, जयेश बैनलवार, सुनील मीलाल, दत्ता सरोदे, सचिन धोतरे, गौरव झोडे, सुनील पाटील, आशिष मस्के यांचा समावेश होता. या सत्याग्रहाला समर्थन व पाठिंबा देत महाराष्ट्र नाभिक संघटन चंद्रपूर यांनी सामूहिक मुंडन केले. यात रवी येसेकर, मशेष आंबेकर, रमेश चौधरी, प्रणिल वाटेकर, रोहित कडुकर, बंडू चौधरी, राजेश मालवीय, वासुदेव कडवे, जामुवंत निंबाळकर यांचा समावेश होता. 
आजही शहरातील संघटना, राजकीय पदाधिका-र्यांनी उपोषण मंङपाला भेट देत पाठिंबा दिला. यात भारतीय जनता महिला मोर्चा, युवा चेतना मंच, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सीटी चंद्रपूर, ज्ञानदा शिक्षण संस्था, पर्यावरण मंच, नुटा चंद्रपूर युनिट, बुध्दिस्ट वुमेन्स फाऊंडेशन, गुरू रविदास फाऊंडेशन, श्री वेदमाता गायत्री ट्रस्ट, श्री माता कन्यका बगिचा ग्रूप, संस्कार भारती, विकलांग सेवा संस्था, माहिती अधिकार, पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण सेना आदींसह तिरवंजा ग्रामपंचायत उपसरपंच प्रशांत कोपूला यांनी पाठिंबा दिला.  




लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी केली रामाळाच्या रक्षणार्थ 'मानवी साखळी'

इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आठव्या दिवशी लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी एकत्रित येत रामाला तलाव वाचविण्यासाठी 'मानवी साखळी' तयार केली.
रामाला तलाव संवर्धन करिता सुरू असलेल्या बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास आपले समर्थन जाहीर करीत घोषणा दिल्या. आज उपोषणाचा आठवा दिवस आहे. यावेळेस विद्यार्थिनींनी रामाळा  तलावाचे प्रदूषण आणि भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली.
रामाळा तलावाच्या स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध करणार; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

रामाळा तलावाच्या स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध करणार; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे




चंद्रपूर, दि. 1 मार्च : रामाळा तलावाच्या शुद्धिकरणाचे काम प्रदुषनमुक्त करणे व सुशोभीकरण करणे या दोन भागात विभागून त्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक येत्या आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला दिले असून प्रस्ताव प्राप्त झाल्यावर लगेचच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सोबतच या तलावाच्या शुद्धिकरणासाठी पर्यावरण संघटनेचे बंडू धोत्रे यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे.

आज दूरदृष्य प्रणालीद्वारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रदुषण नियामक मंडळाचे वरिष्ट अधिकारी अशोक शिंगारे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, बंडू धोत्रे यांचेशी चर्चा केली. यावेळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर,चंद्रपूर महानगरपालीका आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, उपजिल्हाधिकारी पल्लवी घाडगे प्रामुख्याने उपस्थित होते.


यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी रामाळा तलावाच्या शुद्धीकरणासाठी स्थानीक प्रशासनाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न व प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. तलावात तीन छोटे व एका मोठ्या नाल्याचे सांडपाणी जमा होत असल्याने व मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सर्वप्रथम नाल्याचे पाणी दुसरीकडे वळविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री ठाकरे यांनी ‘माझी वसुंधरा’ व पर्यटनासंदर्भात अधीवेशनानंतर लवकरच चंद्रपूर येथे बैठक घेणार असल्याचे सांगीतले यावेळी चंद्रपूर जिल्ह्यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने अधिक काय करता येईल त्याबाबत आढावा घेण्यात येईल. पर्यावरनाशी निगडीत संस्था व नागरिकांनी देखील समन्वयातून कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले.बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

रविवार, फेब्रुवारी २८, २०२१

अन्नत्याग सत्याग्रहाचे पडसाद पुणे शहरात

अन्नत्याग सत्याग्रहाचे पडसाद पुणे शहरात

अन्नत्याग सत्याग्रहाचे पडसाद पुणे शहरात

वसुंधरा अभियान बाणेर (पुणे)च्या वतीने घोषणाबाजी

गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंची उपोषण मंडपाला भेट





चंद्रपूर/ प्रतिनिधी

रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी आज (रविवारी) सातव्या दिवशी पुणे येथे निदर्शने करण्यात आली. चंद्रपुरातील रामाळाप्रमाणेच इतर शहरांतील तलाव, नदी अंतिम घटका मोजत आहेत. रामाळा बचाव आंदोलनाचे उदाहरण डोळ्यासमोर आंदोलनाला पाठिंबा देतानाच आपल्या शहरातील तलाव संवर्धनासाठी नागपूर, जळगाव, अमरावती येथेही निदर्शने करण्यात येणार आहेत.


आजच्या साखळी उपोषणात नितीन रामटेके, प्रमोद मलिक, कपिल चौधरी, संजय सब्बलवार, मनीषा जयस्वाल, प्रगती मार्कंडावार, पूजा गहुकर यांनी सहभाग घेतला. गोंडवाना विद्यापीठ तथा कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांनी अन्नत्याग सत्याग्रहाला भेट दिली. माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांनीही भेट घेतली.

रामाला तलावातील जलप्रदूषण आणि इको प्रोने केलेल्या मागण्यासंदर्भात बंङू धोतरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी पर्यावरण प्रेमी प्रा. डॉ. योगेश दूधपचारे यांची उपस्थिती होती. चंद्रपूरातील रामाळा तलाव संवर्धनासाठी मागील सात दिवसांपासून सुरु असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी वसुंधरा अभियान बाणेर (पुणे)च्या वतीने रविवारी सकाळी घोषणाबाजी करण्यात आली. रामाळासह महाराष्ट्रातील सर्व नदी आणि तलावांचे इकोसिस्टम पद्धतीने संवर्धन व्हावे, यासाठी वसुंधरा अभियान आग्रही असून, पाठपुरावा करणार असल्याचे संस्थेचे पांडुरंग भुजबळ यांनी सांगितले.


दिवसभरात शहरातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिका-यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला. जिल्हा स्टेडियम मित्र परिवार, श्रीमंत योगी जगदंब निस्वार्थ सेवा फाउंडेशन मित्र परिवार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीमहाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना नागपूर, शाखा चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर, महाराष्ट्र वन , असोसिएशन नागपूर, वनवृत्त चंद्रपूर, नगर संरक्षण दल बल्लारपूर, आझाद गार्डन मैत्री गृप, लिंगायत बहू उद्देशिय समाजिक संस्था, कंत्राटी कर्मचारी सेना, वाल्मिकी मच्छूुवरी सामाजिक संस्था, शाहिद भगत सिंग चौक मित्र मंडळ आदी संघटनांनी पाठींबा दिला. याशिवाय डॉ. सुरेश कोल्हे (घुगूस), डॉ. प्रमोद बनकर (निवृत्त सनदी अधिकारी, मुंबई), अविनाश पोंईनकर, ऍड. दीपक चटप, सागर दुधानी, सुवाभी सागर चांडक, ईशा विराणी, सोनल नागवानी, सीए दामोदर सारडा, अमोल मेश्राम, नगरसेवक बंडू हजारे, खुशाल हांडे, संस्कार भारती, चंद्रपूरचे अजय धावणे, महेश काहिलकर (विठाई बहूउद्देशीय संस्था), रफिक कुरेशी (जमाते इस्लामी हिंद), मोहसीन भाई काचवाले अँड बोहरा समाज चंद्रपूर आणि नेमकाल संस्था, किन्नर एकता मंच, एलजीबीटी संस्थांच्या पदाधिका-यांनी पाठिंबा दिला.

मंगळवार, फेब्रुवारी १६, २०२१

ताडोबा भ्रमंती, किल्ला-स्मारके-मंदीरांचे दर्शन, खान पर्यटनाची संधी @chandrapur-turizam

ताडोबा भ्रमंती, किल्ला-स्मारके-मंदीरांचे दर्शन, खान पर्यटनाची संधी @chandrapur-turizam

 चंद्रपूर शहरात सुरू व्हावे ‘मायनिंग टुरीजम’


वेकोलीचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक आभास चंद्र सिंग यांचेसोबत बैठकीत चर्चा



चंद्रपूरः शहरात ताडोबा (व्याघ्र-निसर्ग पर्यटन), चंद्रपूर किल्ला-समाधी (ऐतिहासिक पर्यटन), प्राचीन मंदीरे (धार्मिक पर्यटन) यासह वेकोली के व्दारे ‘खान पर्यटन’ सुरू झाल्यास, चंद्रपूर शहरात एक संपुर्ण ‘पर्यटन झोन’ निर्माण होऊ शकते. याकरीता वेकोली क्षेत्रीय महाव्यवस्थापक आभास चंद्र सिंग यांचेशी इको-प्रो अध्यक्ष बंडु धोतरे यांनी चर्चा केली.

चंद्रपुर जिल्हयामध्ये विपुल वनसंपत्तीसह खनिजसंपत्ती आहे त्यामुळे येथे वेकोलीच्या कोळसा खानी आहेत. यात खुली आणि भुमीगत अशा दोन पध्दतीच्या कोळसा खानीतुन कोळसा उत्खनन केले जाते. या उत्खननासाठी अवजड यंत्रसामृग्रीसह अदयावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातुनही कोळसा उत्खननाचे काम सुरू आहे. पुर्वीच्या काळी कोणतेही तंत्रज्ञान अवगत नसतांना आणी सुरक्षेची पुरेसी साधने नसताना धोकादायक अश्या ठिकाणी मजुर जिकरीचे काम करीत होते काही प्रमाणात आजही ते सुरू आहे. मजुरांच्या या कौशल्याबद्दल व भुगर्भातील अंतरंगाबाबत जाणुन घेण्यास सामान्य माणुस उत्सुक असतो मात्र सुरक्षेच्या कारणासह व नियमांमुळे सर्वसामान्य व्यक्तीकरीता प्रतिबंधीत क्षेत्र असतात त्यामुळे येथे चालणारे उपकरण, सुरक्षा, कार्यपध्दती, आपातकालीन व्यवस्था निवारण याबाबत सामान्य माणासामध्ये आजही कुतुहुल आहे. आपल्या शेजारी कोळसा खाणी राहुनही त्याबदद्ल सामान्य नागरीक, विदयार्थी व अभ्यासकांना पुरेसी माहीती नाही. भविष्यात खान पर्यटन सुरू झाल्यास अभ्यासांच्या दुष्टीने तसेच चंद्रपूरातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने ते सोयीचे होऊ शकते.


जगात आस्ट्रेलीया, दक्षिण आफ्रिका या देशात खान पर्यटन सुरू आहे. आपल्या देशात झारखंड मध्ये सेट्रंल कोलफिल्ड तर्फे तर विदर्भात सावनेर ला वेकोली तर्फे 'खान पर्यटन' सुरू करण्यात आले आहे. चंद्रपूर शहरात असे खान पर्यटन सुरू करण्यात आल्यास व्याघ्र-निसर्ग व ऐतिहासिक पर्यटनासोबत एक संपुर्ण 'पर्यटन झोन' विकसीत करण्यास खान पर्यटनामुळे वाव मिळेल. त्यामुळे स्थानिक पर्यटन विकसीत करण्यास जिल्हा प्रशासन, पुरातत्व विभाग, वेकोली व स्थानिक नगर प्रशासनास सहज शक्य होणार आहे.


ताडोबा निसर्ग पर्यटन-ऐतिहासिक वास्तु पर्यटन-प्राचिन मंदीर धार्मीक पर्यटन तथा खान पर्यटन असे पर्यटन झोन निर्माण करण्याची चंद्रपूर शहरास मोठी संधी असुन यात वेकोली व्दारा महत्वाची भुमीका राबवीली जाऊ शकते. याबाबत क्षेत्रीय व्यवस्थापक आभास चंद्र सिंग यांचेशी चर्चा करण्यात आली. वेकोली खान पर्यटनाबाबत सकारात्मक असुन याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. सोबतच जिल्हयातील व्याघ्र, निसर्ग, ऐतिहासीक स्मारक पर्यटनाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान इको-प्रो च्या किल्ला स्वच्छता व सुरू असलेल्या किल्ला पर्यटन विषयी माहिती जाणून घेतली, आभास चंद्र सिंग स्वतः किल्ला पर्यटन हेरीटेज वाॅकला येण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी इको-प्रोचे नितीन रामटेके व वेकोलीचे प्रशांत कुडे उपस्थित होते.

सोमवार, फेब्रुवारी १५, २०२१

 गोंडकालीन रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीसाठी इको प्रोचा 22 फेब्रुवारी रोजी अन्नत्याग सत्याग्रह #eco-pro #chandrapur #ramala #lake

गोंडकालीन रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीसाठी इको प्रोचा 22 फेब्रुवारी रोजी अन्नत्याग सत्याग्रह #eco-pro #chandrapur #ramala #lake

 गोंडकालीन रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीसाठी इको प्रोचा ‘बैठा सत्याग्रह’



चंद्रपूर/ प्रतिनिधी:

गोंडकालीन ऐतिहासीक वारसा असलेला तलाव आज अतिक्रमणात गिळंकृत होत आहे. रामाळा तलाव खोलीकरण आणि प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. मात्र, वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करून तलावाचे खोलीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरी प्रदान करण्याच्या मागणीसाठी रामाळा तलावाच्या काठावर आज सोमवार, 15 फेब्रुवारी रोजी ‘बैठा सत्याग्रह’ करण्यात आला. येत्या सात दिवसात तोडगा न निघाल्यास सोमवार, 22 फेब्रुवारी रोजी अन्नत्याग सत्याग्रह करण्याचा इशारा इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी दिला आहे. 


शहरातील एकमेव तलाव, गोंडकालीन ऐतिहासीक वारसा असलेला तलाव आज अतिक्रमणाखाली जात आहे. वर्ष 2008 मध्ये रामाळा तलावात आलेली इकाॅर्नीया वनस्पती निर्मुलनाची मागणी व स्वच्छता अभियान राबविण्यापासुन इको-प्रो सातत्याने पाठपुरावा करीत आहे. रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करण्याच्या अनुषंगाने आवश्यक खोलीकरण व सौदर्यीकरण करीता तलाव प्रदुषीत होण्याची कारणे याचा अभ्यास करून वेळोवळी प्रशासनापुढे ठेवण्यात आला आहे. मागील 3 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. अनेक बैठका आणि प्रत्यक्ष स्थळ भेटी झाल्यात. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वेकोलिला देण्यात आलेल्या निर्देशानुसार वेकोलिमधून भुगर्भातील फेकले जाणारे पाणी शुध्दीकरण करून तलावात आणण्याच्या दृष्टीने करावयाच्या कामास वेकोलीकडून मंजुरी देण्यात आलेली होती. मात्र, अद्यापही सदर तलावात येणारे मच्छीनाला सांडपाणी वळती करणे, नाल्यावर शुध्दीकरण संयत्र उभारणे, तलाव खोलीकरण संदर्भात कुठलीच पावले उचलली गेली नाहीत. तलावाच्या संवर्धनाकरिता  प्रशासनातर्फे पावले उचलली जात नाही आहे. रामाळा तलावाच्या संवर्धनाची बाब गंभीरतेने घेतली जात नसल्याने आंदोलनाची भूमीका घेण्यात आली आहे.


रामाळा तलाव खोलीकरण सोबतच मध्य रेल्वे विभाग, भारतीय पुरातत्व विभाग, महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, वेकोली कडे सुद्धा मागण्या ठेवण्यात आलेल्या आहेत. आज बैठा सत्याग्रह मध्ये पर्यावरण व सामाजिक क्षेत्रातील मंडळी सहभागी झाली होती. यात निवृत्त वनाधिकारी अभय बडकेलवार, पर्यावरणवादी प्रा. सुरेश चोपणे, प्रा.  योगेश दुधपचारे, श्रीपाद जोशी, उलगुलान संघटनेचे राजू झोडे, तुषार देशमुख, पर्यावरणवाहिनीचे शरीफ सर, विनायक साळवे,अमर गेही, आशिष अलचलवार, एम आर माडेकर, प्रा किरण मनुरे, प्रा. सुभाष गिरडे, मजहर अली, मुकेश भांदककर, महेश अडगुरवार, भारती शिंदे, विशाखा टोंगे, योजना धोतरे इको-प्रो चे नितीन बुरडकर, नितीन रामटेके, बिमल शहा, अब्दुल जावेद, संजय सब्बनवार सह अनेक सदस्य सहभागी झाले होते.

गुरुवार, फेब्रुवारी ११, २०२१

चंद्रपूर जिल्हयात रेस्क्यु सेंटरचा प्रस्ताव; वन्यजीव मंडळाची मंजुरी @banduplan #ecopro

चंद्रपूर जिल्हयात रेस्क्यु सेंटरचा प्रस्ताव; वन्यजीव मंडळाची मंजुरी @banduplan #ecopro


 

वन्यजीव मंडळाचे संदस्य बंडु धोतरे यांनी केली होती मागणी

चंद्रपूरः जिल्हयात रेस्क्यु सेंटरचा प्रस्ताव तयार करण्याबाबत राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला असुन, त्यात घेण्यात आलेल्या ठरावानुसार सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात यावे असे नमुद केले असल्याने, सदर प्रस्ताव ताडोबा व्यवस्थापनाने त्वरीत तयार करण्याची मागणी नुकतेच एका निवेदनातुन बंडु धोतरे यांनी केली आहे.

जिल्हयातील वाढतील वाघ व इतर वन्यप्राण्याची संख्या व मानव वन्यप्राणी संघर्ष लक्षात घेता येथील तात्पुरता वन्यप्राणी निवारा केंद्र (TTC) चा दर्जा वाढवुन ‘रेस्क्यू सेंटर’ तयार करणेबाबतचे निवेदन राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य तथा मानद वन्यजिव रक्षक बंडु धोतरे, अध्यक्ष इको-प्रो संस्था, चंद्रपूर यांनी मा. मुख्यमंत्री, मा. वनमंत्री, मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना देण्यात आले होते. चंद्रपूर जिल्हयातील वाघ व इतर वन्यप्राणी यांची वाढलेली संख्या व जिल्हयातील वाढता मानव-वन्यप्राणी संघर्ष लक्षात घेता जिल्हयातील टिटिसी चा दर्जा वाढवुन रेस्क्यु सेंटर तयार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले होते.

यांसदर्भात 7 डिसेंबर 2020 रोजी पार पडलेल्या राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत चंद्रपूर येथिल मानव-वन्यप्राणी संघर्ष यावर चर्चेदरम्यान बंडु धोतरे यांनी वन्यजीव मंडळापुढे चंद्रपूर जिल्हातील टिटीसी चा दर्जा वाढवुन रेस्क्यु सेंटर तयार करण्याची गरज स्पष्ट केली. चंद्रपूर जिल्हयातील वाढलेली वाघ-बिबटची संख्या, मानव-वन्यप्राणी संघर्ष मध्ये जेरबंद करण्यात येणारे वाघ-बिबट, जखमी वन्यप्राणी यांची संख्या यात वाढ होत आहे. त्याकरीता नागपुर गोरेवाडा रेस्क्यु सेंटर वर निर्भर राहावे लागत आहे, आणि गोरवाडा प्राणीसंग्रहालयची प्राणी ठेवण्याची क्षमता सुध्दा संपलेली आहे. अश्या परिस्थितीत चंद्रपूर जिल्हा अतिसंवेदनशील असल्याने वेळेची गरज लक्षात घेता चंद्रपूर टिटीसी चा दर्जा वाढवून, अधिक क्षमतेचे ‘रेस्क्यु सेंटर’ तयार करण्यात आल्यास भविष्यातील अनेक अडचणी दूर करता येईल ही बाब लक्षात घेउन राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. चंद्रपूर जिल्हाची गरज ओळखुन मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चंद्रपूर येथे रेस्क्यु सेंटर चा प्रस्ताव तयार करण्यास मंजुरी प्रदान केली आहे.

या बैठकीचे इतीवृत्त प्राप्त झाले असुन त्यात नमुद केल्यानुसार ‘‘मानव-वन्यजीव संघर्ष जास्त असलेल्या क्षेत्रातील उदा. चंद्रपूर येथील ट्रांजीट ट्रिटमेंट सेंटरचे ‘वन्यजीव बचाव केंद्रात’ (रेस्क्यु सेंटर) रूपांतरण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मान्यतेकरिता केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधीकरण यांचेकडे पाठविण्यात यावे’’ असा निर्णय घेण्यात आलेला आहे. यानुसार सदर राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या निर्णयानुसार चंद्रपूर येथील प्रस्तावीत रेस्क्यु संेटरचा प्रस्ताव तयार करून, प्रस्ताव पुढील मान्यतेकरिता केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधीकरण कडे पाठविण्यात यावे या मागणीचे निवेदन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ जितेंद्र रामगावकर यांचेकडे बंडु धोतरे यांनी केली आहे.

मंगळवार, जून २३, २०२०

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे अस्तित्व धोक्यात येण्यापासून वाचविण्यासाठी इको-प्रो तर्फे मूक निदर्शन

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे अस्तित्व धोक्यात येण्यापासून वाचविण्यासाठी इको-प्रो तर्फे मूक निदर्शन

 बंदर कॉल ब्लॉक लिलाव यादीतून वगळण्याच्या
 मागणीकरिता इको-प्रो तर्फे मूक निदर्शन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर झोनपासून अवघ्या सात किमी अंतरावरील बंदर कोळसा ब्लॉकला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. याच विरोधात बंदर कॉल ब्लॉक लिलाव यादीतून वगळण्याच्या मागणीकरिता इको-प्रो तर्फे मूक निदर्शन केली. 

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तर दिशेस बफर क्षेत्रात लागून असलेल्या बंदर कोल ब्लॉक कोल इंडिया तर्फे लिलाव करण्यात येणाऱ्या 41 कोल ब्लॉक अंतर्गत या कॉल ब्लॉकचा समावेश आहे.

ताडोबा-बोर-मेळघाट वन्यप्राणी कॉरिडोर-भ्रमण मार्ग संकटात येणार आहे. यापूर्वीसुद्धा 2010 मध्ये तत्कालीन पर्यावरण मंत्री श्री जयराम रमेश यांची दिल्ली येथे भेट घेत इको प्रो शिष्टमंडळाने संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात निवेदन देत सदर कोळसा खाणींमुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा महत्त्वाचा कोरडोर नष्ट होणार असल्याने जिल्ह्यातील व्याघ्र संवर्धनाकडे लक्ष वेधण्यात आले होते. 
याची लगेच दखल घेत एन टी सी ए मार्फत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना पत्र देण्यात आले सोबतच एनटीसीए ची एक कमिटी सुद्धा बंदर कुठून कोल ब्लॉक क्षेत्रात पाठवण्यात आलेली होती. यानंतर ब्रह्मपुरी वनविभाग, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तर्फे सदर कोळसा खान ताडोबा सोबतच व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सदर खान प्रकल्प धोकादायक असल्याचे नमूद केले होते. यापूर्वी सुद्धा 1999 मध्ये सदर कोल ब्लॉक ची परवानगी नाकारण्यात आलेला होता.

या खाणीमुळे ताडोबा-घोडाझरी मार्गाने उमरेड-कऱ्हाडला, नवेगाव-नागझिरा, पेंचमध्ये भ्रमण करणाऱ्या वाघांची वाट प्रभावित होणार असल्याची माहिती वन्यजीव प्रेमींनी दिली आहे ताडोब्याचे जंगल 'रॉयल बेंगॉल टायगर' या वाघांच्या प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे. राज्यातील सर्वाधिक ११५ वाघ या प्रकल्पात असल्याचा अंदाज महाराष्ट्र वन विभाग व भारतीय वन्यजीव संस्थेने संयुक्तपणे अलीकडेच जाहीर केलेल्या अहवालातून व्यक्त केला आहे. 
ताडोब्याच्या दक्षिणेकडे खुल्या कोळसा खाणी तर पूर्व व पश्चिमेकडे गावे आहेत. त्यामुळे वाघांना या भागातून जाता येत नाही. घोडाझरीपर्यंतचा मुख्य मार्ग बंद झाल्यास हे सर्व वाघ गावाच्या दिशेने गेल्यास मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढीस लागणार आहे. 'गंभीर धोके बघता या बांदर कोल ब्लॉकला रद्द करण्याची मागणी रेटून धरण्यात आली होती. तेव्हा तो रद्दही करण्यात आला होता. पण, नव्याने त्याला परवानगी देणे घातक आहे,' असे मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांनी सांगितले.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात वाढलेली वाघाची संख्या, आवश्यक व्याघ्र अधिवास ची कमतरता, दिवासागणिक वाढत असलेला जिल्ह्यातील वाघ-मानव संघर्ष, व्याघ्र कॉरिडोर म्हणजेच वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्ग अधिक सुरक्षित करीत संवर्धन करण्याची गरज असताना अशातच सदर कॉल ब्लॉक चा लिलाव म्हणजे ताडोबा प्रकल्प व व्याघ्र संवर्धनासाठी धोक्याची घंटा आहे, यामुळे इको-प्रो संस्थेने निदर्शने करीत सदर 'बंदर कोल ब्लॉक' कोल इंडियाच्या लिलाव यादीतून वगळण्याची मागणी करण्यात आलेली आहे. कोरोना च्या पार्श्वभूमिवर सदर निदर्शने करताना सोशल डिस्टन्स पाळून, मास्क चा वापर करित निदर्शने करण्यात आली. 
यावेळी बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात नितिन रामटेके, अब्दुल जावेद, धर्मेंद्र लुनावत, सुधीर देव, वैभव मडावी, सुमित कोहले, बिमल शहा, राजेश व्यास, अनिल अडगुरवार, राजू हाडगे, संजय सब्बनवार, अमोल उत्तलवार्, मनीष गावंडे, कुणाल देवगिरकर सहभागी झाले.