गोंडकालीन रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीसाठी इको प्रोचा ‘बैठा सत्याग्रह’
चंद्रपूर/ प्रतिनिधी:
गोंडकालीन ऐतिहासीक वारसा असलेला तलाव आज अतिक्रमणात गिळंकृत होत आहे. रामाळा तलाव खोलीकरण आणि प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. मात्र, वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करून तलावाचे खोलीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरी प्रदान करण्याच्या मागणीसाठी रामाळा तलावाच्या काठावर आज सोमवार, 15 फेब्रुवारी रोजी ‘बैठा सत्याग्रह’ करण्यात आला. येत्या सात दिवसात तोडगा न निघाल्यास सोमवार, 22 फेब्रुवारी रोजी अन्नत्याग सत्याग्रह करण्याचा इशारा इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी दिला आहे.
शहरातील एकमेव तलाव, गोंडकालीन ऐतिहासीक वारसा असलेला तलाव आज अतिक्रमणाखाली जात आहे. वर्ष 2008 मध्ये रामाळा तलावात आलेली इकाॅर्नीया वनस्पती निर्मुलनाची मागणी व स्वच्छता अभियान राबविण्यापासुन इको-प्रो सातत्याने पाठपुरावा करीत आहे. रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करण्याच्या अनुषंगाने आवश्यक खोलीकरण व सौदर्यीकरण करीता तलाव प्रदुषीत होण्याची कारणे याचा अभ्यास करून वेळोवळी प्रशासनापुढे ठेवण्यात आला आहे. मागील 3 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. अनेक बैठका आणि प्रत्यक्ष स्थळ भेटी झाल्यात. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वेकोलिला देण्यात आलेल्या निर्देशानुसार वेकोलिमधून भुगर्भातील फेकले जाणारे पाणी शुध्दीकरण करून तलावात आणण्याच्या दृष्टीने करावयाच्या कामास वेकोलीकडून मंजुरी देण्यात आलेली होती. मात्र, अद्यापही सदर तलावात येणारे मच्छीनाला सांडपाणी वळती करणे, नाल्यावर शुध्दीकरण संयत्र उभारणे, तलाव खोलीकरण संदर्भात कुठलीच पावले उचलली गेली नाहीत. तलावाच्या संवर्धनाकरिता प्रशासनातर्फे पावले उचलली जात नाही आहे. रामाळा तलावाच्या संवर्धनाची बाब गंभीरतेने घेतली जात नसल्याने आंदोलनाची भूमीका घेण्यात आली आहे.
रामाळा तलाव खोलीकरण सोबतच मध्य रेल्वे विभाग, भारतीय पुरातत्व विभाग, महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, वेकोली कडे सुद्धा मागण्या ठेवण्यात आलेल्या आहेत. आज बैठा सत्याग्रह मध्ये पर्यावरण व सामाजिक क्षेत्रातील मंडळी सहभागी झाली होती. यात निवृत्त वनाधिकारी अभय बडकेलवार, पर्यावरणवादी प्रा. सुरेश चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, श्रीपाद जोशी, उलगुलान संघटनेचे राजू झोडे, तुषार देशमुख, पर्यावरणवाहिनीचे शरीफ सर, विनायक साळवे,अमर गेही, आशिष अलचलवार, एम आर माडेकर, प्रा किरण मनुरे, प्रा. सुभाष गिरडे, मजहर अली, मुकेश भांदककर, महेश अडगुरवार, भारती शिंदे, विशाखा टोंगे, योजना धोतरे इको-प्रो चे नितीन बुरडकर, नितीन रामटेके, बिमल शहा, अब्दुल जावेद, संजय सब्बनवार सह अनेक सदस्य सहभागी झाले होते.