Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

MSEB लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
MSEB लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, सप्टेंबर ०३, २०२३

भविष्यातील आव्हाने ओळखून तक्रारी आणि समस्यांचे निराकरण करा : श्री दिलीप दोडके

भविष्यातील आव्हाने ओळखून तक्रारी आणि समस्यांचे निराकरण करा : श्री दिलीप दोडके


नागपूर: 
मानव संसाधन विभागातील अधिकार्‍यांनी भविष्यातील आव्हाने ओळखून, कर्मचार्‍यांच्या तक्रारी आणि संबंधित समस्यांचे नियोजित वेळेनुसार निराकरण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके यांनी केले.

नागपूर परिमंडला अंतर्गत असलेल्या मानव संसाधन विभागातील सर्व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. आपले दैनंदिन काम नियोजित पद्धतीने करतांना कर्मचार्यांची उच्चपद श्रेणी, त्यांचे दावे आदी कामात कुठलाही विलंब न करता सर्व प्रलंबित दाव्यांचा निपटारा येत्या ३० सप्टेंबर पूर्वी करण्याच्या सूचना देखील श्री दोडके यांनी उपस्थितांना केल्या.

या बैठकीला नागपूर परिमंडलाचे सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री प्रदीप सातपुते, वरिष्ठ व्यवस्थापक श्री विवेक बामनोटे, व्यवस्थापक श्री कुणाल गजभिये, यांच्यासह नागपूर शहर मंडलच्या व्यवस्थापक श्रीमती सारिका तायडे, नागपूर ग्रामीण मंडलाच्या व्यवस्थापक अनुष्री पांडे आणि वर्धा मंडलचे व्यवस्थापक श्री प्रफुल गिरी यांच्यासह मानव संसाधन विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते.
 महावितरण कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेने पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत

महावितरण कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेने पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत

नागपूर:
नागपूर आणि लगतच्या भागात रविवारी दुपारी झालेल्या वादळी वारा व मुसलाधार पावसामुळे अनेक भागात वृक्षाच्या फांद्या आणि वृक्ष वीज वितरण यंत्रणेवर पडले. यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. महावितरण कर्मचार्यांनी अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने वीज वितरण यंत्रणेवर पडलेले वृक्ष आणि फांद्या बाजूला सारून बहुतांश भागातील वीजपुरवठा तत्परतेने सुरळीत करण्यात महावितरणला यश मिळाले.

शहरातील प्रतापनगर, टेलिकॉमनगर, बेसा, पांडे लेआऊट, अंबाझरी लेआऊट, विद्यापीठ परिसर मार्ग, शंकरनगर, धंतोली, रमना मारोती आदी भागात वीज वितरण रोहित्र आणि वाहिणांवर वृक्ष उन्मळून पडले तर काही भागात वृक्षाच्या फांद्या तुटून पडल्या, बेसा येथे तर जाहिराीचा फ्लेक्स बोर्ड उडून वाहिन्यांमध्ये अडकला यामुळे या भागातील वीजपुरवठा काही वेळेसाठी खंडित झाला होता. महावितरण कर्मचार्यांनी अग्निशमन विभागाच्या सहकार्याने वीज यंत्रणेवर पडलेले वृक्ष दूर करीत तत्परतेने दुरुस्ती कार्य करीत बहुतांश भागातील वीज पुरवठा सुरळीत करीत वीज ग्राहकांना दिलासा दिला.



फ्लेक्स बोर्डणुळे अडचणी
जाहिरातींचे फ्लेक्स बोर्ड वाऱ्यामुळे उडून वीज वाहिन्यांमध्ये अडकल्याने अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला, याशिवाय अश्या फ्लेक्समुळे वीजपुरवठा सुरळीत करताना अनेक अडचणी येतात. ग्राहकांनी फ्लेक्स लावताना योग्य ती खबरदारी घेतल्यास भविष्यात असे प्रसंग होणार नाहीत, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
 

शनिवार, सप्टेंबर ०२, २०२३

ड्रोनच्या सहाय्याने पकडली २ कोटींची वीजचोरी

ड्रोनच्या सहाय्याने पकडली २ कोटींची वीजचोरी

केडगाव विभागाची धाडसी कामगिरी ; शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई:
वीजबिलाच्या थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून वीजचोरी करणाऱ्या चोराचा महावितरण केडगाव विभागाने ड्रोनच्या सहाय्याने छडा लावला आहे. मुकेश अगरवाल असे या वीजचोराचे नाव असून त्यास महावितरणने २ कोटी ४ लाखांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथे श्री. मुकेश ओमप्रकाश अगरवाल (रा. अग्रसेन सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे) यांच्या मालकीच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. पैकी मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि व मे. प्रकाश करुगेटेडे पुणे प्रा.लि ह्या दोन उच्चदाबाचे तर मे. भगवान ट्यूब प्रा.लि. हे लघुदाब ग्राहक आहेत. तिन्ही कंपन्या एकाच आवारात व शेजारी-शेजारी आहेत. यामध्ये प्रामुख्याने थर्माकोल व पुठ्ठा बनविण्याचे काम होते. मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि या ग्राहक जोडणीचा वीजपुरवठा कायमस्वरुपी बंद केला होता तर इतर दोन वीजजोडण्यांचा वीजपुरवठा देखील थकबाकीच्या कारणास्तव तात्पुरता बंदच आहे.

महावितरणने वीजपुरवठा बंद केलेला असतानाही वीजपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या उच्चदाब रोहित्रातून थेट वीजपुरवठा सुरु केल्याची माहिती केडगावचे कार्यकारी अभियंता संदीप दरवडे यांना खबऱ्यामार्फत मिळाली. सदरची वीजचोरी मोठी असल्याने व संबंधित ग्राहकाने गेटवर बंदोबस्त लावून आत जाण्यास मज्जाव केल्याने दरवडे यांनी ही बाब मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या कानावर घातली. तेव्हा मुख्य अभियंता पावडे यांनी वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यास सांगितले. २५ ऑगस्टला संदीप दरवडे आठ जणांच्या पथकासह गेले. कुरिअर पार्सल देण्याच्या निमित्ताने एका दुचाकीवरुन त्यांनी एका मित्राच्यासह आत प्रवेश मिळवला. पुराव्यासाठी ड्रोनद्वारे चित्रिकरण सुरु केले व तोच बाहेर दबा धरुन बसलेल्या टीमने ओळखपत्र दाखवून आत प्रवेश केला आणि वीजचोरीचा पर्दाफाश केला.

मे. प्रकाश करुगेटेड पुणे प्रा.लि (ग्रा.क्र. १८४८१९०४९४४०) या ग्राहकाला ४७३२९० युनीट वीजचोरी पोटी १ कोटी ११ लाख १९ हजार ८५७, मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि. (ग्रा.क्र. १८४८१९०२१८९२) या ग्राहकाला २०५६०६ युनीट चोरीचे ५१ लाख ३४ हजार ९७० तर मे.श्री. भगवान ट्यूब प्रा.लि (ग्रा.क्र. १८४८१९०३३४४०) या ग्राहकाला २३४९६१ युनीट चोरीसाठी ४२ लाख २५ हजार १६४ रुपये असे तीन ग्राहकांचे मिळून २ कोटी ४ लाख ७९ हजार ९८८ रुपये दंडाचे बील कंपनीचे मालक मुकेश ओमप्रकाश अगरवाल यांना देण्यात आले आहे. तसेच कार्यकारी अभियंता दरवडे यांच्या फिर्यादीवरुन भारतीय विद्युत अधिनियम २००३ कलम १३५ व १३८ नुसार शिक्रापूर पोलीस ठाण्यात वीजचोरीचा व वीज यंत्रणेस छेडछाड केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य अभियंता सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता म्हसू मिसाळ यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता संदीप दरवडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किशोर शिंदे, उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, सहा. अभियंता गौरी काळंगे व बाळासाहेब टेंगले, कनिष्ठ अभियंता श्रीकांत ताटीकोंडा, जनमित्र विश्वनाथ किंदरे व ज्ञानेश्वर आहिरकर यांनी ही कामगिरी यशस्वी केली. महावितरणने पकडलेल्या या वीजचोरीमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीच्या दारात वीज;अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीच्या दारात वीज;अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

चंद्रपूर:
सार्वजनिक गणेश उत्सवमंडळांनी सवलतीच्या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असेआवाहन महावितरणकडून करण्यातआले आहे. तात्पुरत्या वीजजोडणीच्या बिलींगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीजमीटरसाठी घेतलेल्या रक्कमेतील उर्वरित रक्कम गणेश मंडळांना त्वरीत परत करण्याचे निर्देश क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आलेले आहेत.

धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीज जोडणीचा वीजदर कमी ठेवण्यातआलेला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीजकंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावीव अर्थिंगचीही खबरदारी घेण्यात यावी.वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होतो.याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्सलूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पणटेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्यता असते.

गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंदअसताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात.विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्याआणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावेतयार करावेत.त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्येत तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यानी २४ तास सुरु असणारे टोल फ्री क्रमांक१९१२०, १९१२,१८००२१२३४३५ किंवा१८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच चंद्रपूर मंडळातील ग्राहकांनी ७८७५७६११९५ व गडचिरोली मंडळातील ग्राहकांना ७८७५००९३३८ क्रमांकावर मदत मिळेल. याशिवाय संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता यांचे मोबाईलक्रमांक नोंदवून ठेवावेत, असेही आवाहन महावितरणने केले आहे.

मंगळवार, ऑगस्ट ०८, २०२३

ऑनलाइन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा वाढता कल

ऑनलाइन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा वाढता कल

नागपूर :
वीजबिलात मिळणारी सवलत आणि रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल ऑनलाइन भरण्यास प्राधान्य मिळत आहे. जुलै महिन्यात महावितरणच्या नागपूर परिमंडलातील 5 लाख 95 हजार 173 ग्राहकांनी 216 कोटी 7 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे.

महावितरणने वेबसाईटवर ऑनलाइन बिल पेमेंट सुविधेसह मोबाइल ॲप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहण्यासाठी व भरण्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाइल वॉलेट व कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध आहे. महावितरणच्या आवाहनास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांचे बिल भरणा केंद्रासमोरील रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत आहे.जुलै महिन्यात नागपूर शहर मंडलात 4 लाख 6 हजार 605 ग्राहकांनी 163 कोटी 60 लाख, नागपूर ग्रामीण मंडलात 1 लाख 6 हजार 419 ग्राहकांनी 30 कोटी 70 लाख तर वर्धा मंडलात 82 हजार 149 ग्राहकांनी 21 कोटी 77 लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाइन भरले आहे.

बिलात 0.25 टक्के सूट - ग्राहकांना वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट सुलभतेने करता यावे व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रेडिट कार्ड वगळता नेट बॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास महावितरणने ग्राहकांना ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन पेमेंट केल्यास वीजबिलात 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सवलत मिळते.

तत्काळ मिळते पोच - वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट केल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच वेबसाईटवर ‘पेमेंट हिस्ट्री’ तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाइन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.‘गो-ग्रीन’द्वारे वर्षाला 120 रुपये वाचवा - महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल ऑनलाइन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा 10 रुपये सूट मिळते.

ऑनलाईन वीजबिल भरण्याचे फायदे - ऑनलाईन वीजबिल भरण्याचे अनेक फायदे आहेत. इथे वेळेसोबत इंधनाची देखील बचत होते. संकेतस्थळ, मोबाईल ॲप, युपीआय यापर्यायाद्वारे एका क्लिकवर ग्राहकाला वीज बील भरता येते. वीजबिल तयार झाल्यापासून पहिल्या सात दिवसांत वीजबिल भरले तर जवळपास 1 टक्का सूट मिळते. याशिवाय ऑनलाईन भरल्यामुळे अतिरिक्त पाव टक्का असे मिळून सव्वा टक्क्यांची बचत करता येते.

शनिवार, ऑगस्ट ०५, २०२३

गो-ग्रीन सेवेचा पर्याय स्वीकारत नागपूर जिल्ह्यातील वीजग्राहकांनी केली 18 लाखांपेक्षा अधिकची बचत

गो-ग्रीन सेवेचा पर्याय स्वीकारत नागपूर जिल्ह्यातील वीजग्राहकांनी केली 18 लाखांपेक्षा अधिकची बचत

नागपूर: 
नागपूर जिल्ह्यांतील 15 हजार 17 पर्यावरण स्नेही ग्राहकांनी छापील वीजबिलांना नकार देत महावितरणच्या गो-ग्रीन सेवेचा लाभ घेतला आहे. या ग्राहकांनी वीज बिलासाठी ई- मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महिन्याला प्रत्येक वीज बिलामागे 10 रूपयाची तर, वर्षाला 120 रूपयाची सूट देण्यात येते. गो-ग्रीन सेवेचा पर्याय स्वीकारणा-या नागपूर जिल्ह्यातील वीजग्राहकांनी वर्षभरात तब्बल 18 लाखांपेक्षा अधिकची बचत केली आहे.

पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी महावितरणकडून पर्यावरणपूरक गो ग्रीन योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वीज बिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय देण्यात येतो. महावितरणच्या गो-ग्रीन या पर्यावरणपूरक सेवेसाठी प्रोत्साहन म्हणून ग्राहकांना प्रती मासिक बिलात दहा रुपये सवलत देण्यात येते म्हणजेच ग्राहकाची वीजबिलात वार्षिक एकशे वीस रुपयांची बचत होते. वीज बिल तयार झाल्यानंतर लगेचच ई-मेल तसेच एसएमएसद्वारे दरमहा वीज बिल प्राप्त होणार असल्याने वीज ग्राहकांनी बील मिळताच मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते.याशिवाय हे बिल भीम ॲप, गुगल पे, पेटीएम यासारख्या युपीआय किंवा बँकेच्या ॲपवरून किंवा महावितरणच्या वेबसाईटवरून असे ऑनलाईन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत देखील मिळते.

बिलाच्या रंगीत प्रिंटची ही सोय
वीज ग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेल द्वारे प्राप्त झालेले दर महिन्याचे वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू महिन्याचे वीज बिल मूळ स्वरुपात उपलब्ध असते. आवश्यकतेप्रमाणे वीज ग्राहकांना ते डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट घेण्याची सोय आहे.

'गो ग्रीन' होण्यासाठी काय करावे?

महावितरण गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जी. जी. एन या 15 अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरण मोबाइल अॅपद्वारे किंवा संकेत स्थळाच्या https://billing. mahadiscom.in/gogreen.php लिंक वर जाऊन करावी लागणार आहे. याबाबतची अधिक माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
 महावितरणची फास्ट सर्व्हिस;महिना भरात आठ हजाराहून अधीक ग्राहकांना मिळाला झटपट वीजजोडनीचा लाभ

महावितरणची फास्ट सर्व्हिस;महिना भरात आठ हजाराहून अधीक ग्राहकांना मिळाला झटपट वीजजोडनीचा लाभ

मुंबई : नवीन वीज कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात चोवीस तासात तर ग्रामीण भागात 48 तासात कनेक्शन देण्याच्या महावितरणच्या मोहिमेत राज्यात जुलै महिन्यात एकूण 8063 वीज ग्राहकांना झटपट कनेक्शन मिळाले . यामध्ये अर्ज केल्याच्या दिवशीच कनेक्शन मिळालेल्या ग्राहकांची संख्या 510 असून 3775 ग्राहकांना शुल्क भरल्यानंतर 24 तासात कनेक्शन मिळाले . ग्रामीण भागात 616 ग्राहकांना अर्ज केल्यानंतर तातडीने शुल्क भरल्यामुळे 48 तासात कनेक्शन मिळाले तर 3162 ग्राहकांना शुल्क भरल्यानंतर 48 तासात वीज जोडणी मिळाली.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नव्या वीज कनेक्शनसाठीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचा आदेश दिला आहे. याचा भाग म्हणून महावितरणने जून महिन्यात दहा दिवसात एक लाख नवीन घरगुती वीज कनेक्शन दिली. आता नव्या कनेक्शनसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात 24 तासात तर ग्रामीण भागात 48 तासात वीज कनेक्शन देण्याचे काम कंपनीने सुरू केले आहे. महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम चालू आहे.

ग्राहकांनी नव्या वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती देतात. त्यानुसार शहरी भागातील ज्या ग्राहकांनी शुल्क भरले त्यांना चोवीस तासात कनेक्शन देण्यावर भर देण्यात आला. राज्यभरात अशा एकूण 3775 ग्राहकांना जुलै महिन्यात लाभ झाला. महावितरणकडे अर्ज केल्यानंतर सूचना मिळाल्यावर तातडीने शुल्क भरणाऱ्या 510 ग्राहकांना अर्ज केल्याच्या दिवशीच नवीन कनेक्शन मिळाले.

ग्रामीण भागासाठी अंतर व इतर अडचणी लक्षात घेऊन 48 तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. ग्रामीण भागात ज्या ग्राहकांनी तातडीने शुल्क भरले अशा 616 ग्राहकांना अर्ज केल्यानंतर 48 तासात कनेक्शन मिळाले. तर अर्ज केल्यानंतर आपल्या सोयीने शुल्क भरल्यानंतर 48 तासात कनेक्शन मिळणाऱ्या ग्राहकांची संख्या 3162 आहे.

शेतकऱ्यांनाही मिळणार झटपट कनेक्शन
कृषी ग्राहकांना वीज कनेक्शन देणे हे तुलनेने अवघड असते. शेतामध्ये दूरवर असलेल्या विहिरीवरील कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यासाठी विजेचा खांब, वायर, ट्रान्सफॉर्मर अशा पायाभूत सुविधा अनेकदा उभाराव्या लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना जोडणी मिळण्यास विलंब लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी महावितरणने गेल्या वर्षभरात मोहीम राबविली. त्यातून निर्माण झालेल्या पायाभूत सुविधांमुळे शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी कनेक्शन देण्याचाही वेग वाढला आहे. जुलै महिन्यात राज्यात 1227 शेतकऱ्यांना झटपट वीज कनेक्शन मिळाली. त्यापैकी 74 शेतकऱ्यांना अर्ज केल्याच्या दिवशीच तर 493 शेतकऱ्यांना शुल्क भरल्यानंतर 24 तासात वीज कनेक्शन मिळाले. अर्ज केल्यानंतर 48 तासात कनेक्शन मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या 117 आहे तर 543 शेतकऱ्यांना शुल्क भरल्यानंतर 48 तासात कनेक्शन मिळाले.

शुक्रवार, ऑगस्ट ०४, २०२३

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सकाळी मारहाण तर रात्री दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सकाळी मारहाण तर रात्री दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल



नागपूर, दिनांक ४ ऑगस्ट २०२३- बिनाकी विभागातील वनदेवीनगर परिसरात फ्यूजकॉलची तक्रार दुरुस्त करायला गेलेल्या महावितरणच्या कर्मचारी आणि शिडी वाहनावर गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दगड आणि विटा फेकून फेकल्या. सुदैवाने यात महावितरण कर्मचारी थोडक्यात बचावले.

यापूर्वी सकाळी याच भागात वीजचोरी पकडण्यास गेलेल्या महावितरणच्या २ कर्मचाऱ्यांना मारहाण देखील झाली होती. यादोन्ही घटणाप्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वीजचोरी पकडण्याच्या मोहिमेत गुंतलेल्या बिनाकी वितरण केंद्राच्या दोन कर्मचाऱ्यांना वनदेवी नगर झोपडपट्टीत दोन हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली.


बिनाकी वितरण केंद्राचे कर्मचारी वनदेवीनगर झोपडपट्टीतील वीजचोरी पकडण्यात आणि वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांकडून बिल वसूल करण्यास गेले असता याच परिसरात राहणारा इलियास ए. रशीद विजेच्या तारेला आकडा लावून घराला चोरीची वीज घेत असल्याचे आढळले. इलियासकडे
महावितरणचे १८,७३० रुपये वीज बिल थकबाकी आहे. बिल न भरल्याने वीज पुरवठा कायमचा खंडित करून मीटरही जप्त करण्यात आले आहे.


तेथे महावितरणचा तंत्रज्ञ राहुल मोहाडीकर (३०) याने विजेच्या तारेवरील आकडा काढला आणि खाली उभा असलेला दुसरा कर्मचारी लखन चौरसिया याने वायर कापण्यास सुरुवात केली. कारवाईचे वेळी इलियासची पत्नी घरात हजर होती. महावितरणच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या दोघांनी कर्मचाऱ्याकडील तार हिसकावून पुन्हा हुक लावण्याचा प्रयत्न केला, त्याला महावितरण कर्मचाऱ्यांनी विरोध केला. महावितरणच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या दोघांनी राहुल मोहाडीकर यांना बेदम मारहाण केली. यावेळी मदतीसाठी धावलेल्या लखन चौरसियालाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.


यावेळी इतर कर्मचारी मारहाणीचा व्हिडिओ करत असताना कर्मचाऱ्यांना देखील धमकी देण्यात आली. मारहाण केल्यानंतर दोन्ही हल्लेखोर तेथून निघून गेले. याप्रकरणी महावितरणचे कर्मचारी राहुल मोहाडीकर यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवार, ऑगस्ट ०२, २०२३

सौर ऊर्जानिर्मिती पॅनेलच्या कार्यक्षमतेसाठी ‘स्पार्क’ उपकरण विकसित

सौर ऊर्जानिर्मिती पॅनेलच्या कार्यक्षमतेसाठी ‘स्पार्क’ उपकरण विकसित

महावितरणचे मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ यांचे संशोधन
नागपूर:
 सौर ऊर्जेच्या पॅनेलमधून वीज निर्मितीची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी ‘स्पार्क’ उपकरणाची (Solar Panel Analysing and Reporting Kit - SPARK) निर्मिती करण्यात आली आहे. महावितरणचे मुख्य अभियंता (चाचणी) डॉ. मनीष वाठ यांनी या उपकरणाचे संशोधन केले आहे. नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेमध्ये (VNIT) विकसित या उपकरणाची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली.

केंद्र व राज्य शासनाच्या प्रोत्साहनामुळे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना वेग आला आहे. नागरिकांकडून देखील प्रतिसाद वाढत आहे. सौर ऊर्जेच्या निर्मितीमध्ये सौर फोटोव्होल्टेइक (पीव्ही) पॅनेल केंद्रबिंदू आहे. सौर पॅनेलद्वारेच सूर्याच्या उष्णतेचा, ऊर्जेचा उपयोग करून त्याचे वि‍जेमध्ये रुपांतर केले जाते. प्रत्येक सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये निर्धारित वीजनिर्मितीच्या क्षमतेनुसार सौर पॅनेल बसविले जातात. मात्र वीजनिर्मितीच्या क्षमतेत सातत्य राखण्यासाठी साधारणतः २५ वर्षांचे आयुर्मान असलेल्या सौर पॅनेलची देखभाल व दुरूस्ती अतिशय महत्वाची आहे. सौर पॅनेलकडून निर्धारित क्षमतेएवढी वीजनिर्मिती होत नसल्यास त्यासाठी कारणीभूत सौर पॅनेलमधील बिघाड, दोष किंवा विविध प्रकारचे अडथळे याबाबतची तपासणी व देखरेख ठेवण्यासाठी मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ यांनी ‘स्पार्क’ तंत्रज्ञान विकसित केले आहे. याद्वारे सौर फोटोव्होल्टेइक (पीव्ही) पॅनेलमधील बिघाड त्वरित शोधले जाऊन निर्धारित क्षमतेएवढी सौर ऊर्जा निर्मितीमधील सातत्य कायम ठेवणे आता शक्य झाले आहे.

‘स्पार्क’ उपकरणामध्ये प्रामुख्याने सौर पॅनेलच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी देखरेख प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यासाठी पॅनेलच्या आवश्यक सर्व घटकांचा वारंवार आढावा घेतला जातो. तसेच फोटोव्होल्टेइक (पीव्ही) पॅनेलसाठी किमान व्होल्टेज सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. या सेन्सरद्वारे पॅनेलच्या निर्धारित केलेल्या क्षमतेएवढ्या वीजनिर्मितीमध्ये काही अडथळे आल्यास ते शोधले जातात व त्याची माहिती दिली जाते. पीव्ही पॅनेल्सच्या आऊटपूट व्होल्टेजचे सातत्याने निरीक्षण, विश्लेषण व रिअलटाईम मॉनिटरींग केले जाते. तसेच निर्धारित व प्रत्यक्ष सुरु असलेली सौर ऊर्जा निर्मिती यांची तुलना केली जाते. सौर पॅनेलमधील ओपन सर्किट व शॉर्ट सर्किटची माहिती दिली जाते. त्यासाठी या उपकरणात खास डिस्प्ले युनिट बसविण्यात आले आहे.

किफायतशिर खर्चात तयार करण्यात आलेले ‘स्पार्क’ उपकरण देखभालमुक्त आहे. वापरासाठी वीजदेखील अत्यंत कमी लागते. तसेच सौर पॅनलमधील दोष हे उपकरण अचूकपणे शोधत असल्याचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत झालेल्या चाचणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सौर पॅनेलच्या निर्धारित क्षमतेएवढ्या सौर ऊर्जा निर्मितीचे सातत्य कायम ठेवणे या उपकरणाद्वारे शक्य झाले आहे. मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ संशोधित या उपकरणाच्या पेटंटसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या संशोधनासाठी डॉ. वाठ यांना डॉ. मकरंद बल्लाळ (नागपूर) यांनी मार्गदर्शन केले.

गुरुवार, जुलै २७, २०२३

 पाच हजारावरील वीजबिलांचा रोखीने भरणा करण्यास निर्बंध

पाच हजारावरील वीजबिलांचा रोखीने भरणा करण्यास निर्बंध

नागपूर :
 महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दि. 31 मार्च 2023 रोजी दिलेल्या आदेशान्वये लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना वीज बिल रोखीने भरण्याची कमाल मर्यादा पाच हजार तर लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना ही मर्यादा दहा हजार रुपये करण्यात आली आहे. त्यावरील रकमेच्या वीज बिलांचा रोखीने भरणा करण्यास निर्बंध लागू करण्यात आले आहे. हे निर्बंध दि. 1 ऑगस्ट 2023 पासून लागू करण्यात येणार असून त्यानंतर कुठल्याही वीज ग्राहकाने या मर्यादेपलीकडील वीजबिलांचा भरणा केवळ ‘ऑनलाईन’ पद्धतीनेच करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

विनामर्यादा वीज देयकाचा भरणा करण्यासाठी ग्राहक ‘ऑनलाईन’ पध्दतीने महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केंव्हाही व कुठूनही करु शकतो. सदर पध्दत अत्यंत सुरक्षित असून, ‘ऑनलाईन’ वीजबिल भरल्यास दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये 0.25 टक्के (जास्तीत जास्त 500 रुपये) तर वीजबिलाचे प्रॉम्प्ट पेमेंट केल्यास 1 टक्का असे एकूण 1.25 टक्के सुट वीजग्राहकांना देण्यात येते. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरीत सर्व पर्यायांव्दारे ऑनलाईन पद्धतीने होणारा वीजबिलाचा भरणा निःशुल्क आहे. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवर वीजबिल भरण्याची सुरक्षित व सोयीची ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. ऑनलाइनव्दारे वीजबिलांचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून या पद्धतीस भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा 2077 च्या तरतुदी असल्याने

पाच हजारापेक्षा अधिक रकमेचे वीजबिल रोखीने स्विकारण्यात येऊ नये अशा आशयाच्या सुचना सर्व वीज भरणा केंद्र, जिल्हा सहकारी बॅंकांना, सहकारी संस्था व पतपेढ़ी यांना महावितरणकडून देण्यात येत असून ग्राहकांनी देखील आपले वीजबिल ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

रविवार, जुलै २३, २०२३

 महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांना २०२३ चा टिळक सन्मान पुरस्कार जाहीर

महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांना २०२३ चा टिळक सन्मान पुरस्कार जाहीर



नागपूर:
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून विदर्भ सेवा समितीतर्फे मराठी पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य केल्यानंतर शासकीय अधिकारी म्हणून प्रभावी भुमिका पार पाडीत असलेले महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी श्री योगेश विटनकर यांना टिळक सन्मान - २०२३ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री आनंद निर्वाण, कार्याध्यक्ष डॉ. संतोष मोदी, सचिव अशोक गोयल यांचेसह इतर पदाधिकारी आणि नागपूर शहरातील जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत इतर मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी श्री विटनकर यांना पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया, नागपूर चॅप्टरतर्फे उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी, स्वातंत्रवीर सावरकर स्मारक समितीतर्फे सामाजिक अभिसरण पुरस्कार मिळाले असून पब्लिक रिलेशन काऊन्सिल ऑफ इंडिया, मुंबई चॅप्टर तर्फे माध्यम सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  सौर ऊर्जा निर्मितीला ग्राहकांचा पसंती;नागपुरात16 हजारावर ग्राहक करीत आहेत सौर ऊर्जा निर्मिती

सौर ऊर्जा निर्मितीला ग्राहकांचा पसंती;नागपुरात16 हजारावर ग्राहक करीत आहेत सौर ऊर्जा निर्मिती

नागपूर: 
घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला विकायची या रूफटॉप सोलर योजनेला महावितरणच्या ग्राहकांची वाढती पसंती मिळत असून त्यांची नागपूर जिल्हातील संख्या तब्बल 16 हजार 192 झाली आहे. व त्यांच्याकडून एकूण 172 मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती क्षमता गाठली गेली आहे.

सौर ऊर्जा निर्मितीसाठी रूफटॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठे प्रकल्प क्षमतेनुसार 20 ते 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीज वापरामुळे ग्राहकाच्या वीजबिलात मोठी कपात होते. याशिवाय या प्रकल्पामध्ये गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणला दिली जाते व त्याची नोंद नेट मिटरिंग द्वारे ठेवली जाते. सौर ऊर्जा निर्मितीपेक्षा जर अधिक विजेची गरज पडली तर ती महावितरणकडून घेतली जाते.

ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी महावितरण मदत करते. महावितरणच्या www.mahadiscom.in/ismart या संकेतस्थळावर याची संपूर्ण माहिती देण्यात असून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा आहे. सोबतच छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी 20 ते 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. महावितरणकडे नोंदणीकृत एजन्सीमार्फत प्रकल्प बसविले जातात. महावितरण प्रकल्पाच्या मंजुरीपासून तपासणी व अंतिम मंजुरीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मदत करते, सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांना आर्थिक लाभ होतो. यामुळे ही योजना लोकप्रिय होत असून अधिकाधिक वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवावेत, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

शुक्रवार, जुलै २१, २०२३

महावितरणच्या संजय भोसकर यांना दिव्यांग उत्कृष्ट राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

महावितरणच्या संजय भोसकर यांना दिव्यांग उत्कृष्ट राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर


श्री संजय भोसकर यांचा सत्कार करतांना प्रादेशिक संचालक श्री सुहास रंगारी, सोबत मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता श्री हरीश गजबे, कार्यकारी अभियंता श्री हेमराज ढोके
नागपूर:
क्रिकेट, सिटीग व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, कबड्डी यासारख्या विविध क्रीडा प्रकारांत शेकडो राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू घडविणा-या आणि सोबतच तीन वेळा पॅरालिम्पिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या श्री संजय भोसकर यांना महाराष्ट्र शासनाचा वर्ष 2019-20 चा दिव्यांग उत्कृष्ट राज्य क्रीडा पुरस्कार नुकताच जाहीर झाला.

श्री संजय रामराव भोसकर यांनी आजवर 400 राज्यस्तरीय, 210 राष्ट्रीयस्तर तर 11 आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू घडवलेले आहे. तीन वेळा पॅरालिम्पिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केले असून त्यांना 2006 साली नागपूर जिल्हा क्रीडा पुरस्कार, 2013 साली महाराष्ट्र शासनाचा एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार, 2019-20 करिताचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार आणि क्रिडा क्षेत्रातील नेत्रदिपक कामगिरीसाठी त्यांना 2008 साली शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले आहे. श्री संजय भोसकर हे क्रीडा क्षेत्राशी मागिल 30 वर्षापासून जुळलेले असून ते स्वतः 10 वर्षे खेळले आहेत, आजवर त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील विविध खेळात 10 सुवर्ण, 22 रोप्य व 28 कांस्य पदके मिळविलेली आहे. तब्बल 20 वर्षापासून विविध क्रिडा प्रकारातील खेळाडू घडविण्याचे काम ते निरंतरपणे करीत आहेत.

महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत कॉग्रेसनगर विभागात उच्चस्तर लिपीक (मानव संसाधन) म्हणून कार्यरत असलेल्या श्री भोसकर यांच्या या निवडीबद्दल प्रादेशिक संचालक श्री सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री हरिश गजबे, मंगेश वैद्य, कार्यकारी अभियंता श्री हेमराज ढोके, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री सचिन लहाने यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बुधवार, जून २१, २०२३

यशवंत मोहिते PRSI नागपूर चॅप्टरचे नवे अध्यक्ष

यशवंत मोहिते PRSI नागपूर चॅप्टरचे नवे अध्यक्ष

नागपूर :

पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI) नागपूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी यशवंत मोहिते यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे.

बुधवार २१ जून २०२३ रोजी PRSI च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या नावाचा प्रस्ताव संस्थेने मांडला. निवर्तमान अध्यक्ष एस.पी.सिंग उपस्थित होते.सर्व सदस्यांनी टाळ्या वाजवून पाठिंबा दिला. इतर पदाधिकाऱ्यांमध्ये अखिलेश हळवे (महामेट्रो) यांची उपाध्यक्षपदी, मनीष सोनी (नागपूर महानगरपालिका व नागपूर स्मार्ट सिटी) सचिवपदी, प्रसन्न श्रीवास्तव (महावितरण) यांची सहसचिवपदी आणि शरद मराठे (मध्य प्रदेश पर्यटन मंडळ) यांची खजिनदार म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

प्रवीण टाके (जिल्हा माहिती अधिकारी), डॉ. मनोज कुमार (वेकोली), प्रवीण स्थूल (महावितरण), अमित बाजपेयी (एएए मीडिया) आणि निखिल सावरकर (पी आर टाइम्स) यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली.

हेमराज बागुल (माहिती संचालक), अनिल गडेकर माजी जिल्हा माहिती अधिकारी, एमएम देशमुख माजी जनसंपर्क अधिकारी आणि एसपी सिंग, डॉ.मोईज हक, डॉ.नितीन कराळे, प्रदीप कुमार मैत्र, शिरीष बोरकर हे संस्थेचे पालक/सल्लागार म्हणून काम पाहतील.

विशेष म्हणजे नागपुरात जनसंपर्क कर्मचार्‍यांची ही संघटना गेल्या अडीच दशकांपासून कार्यरत आहे.नियमित विविध उपक्रमांसोबतच कोरोनाच्या काळात PRSI च्या कल्याणकारी उपक्रमांतर्गत पोलिस कर्मचारी व इतर गरजूंना मदतीचा हात पुढे केला गेला आणि कोविड काळातील कार्याबद्दल खूप कौतुक करण्यात आले. PRSI नागपूर चॅप्टरला गेल्या काही वर्षांमध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रीय स्तरावर अनेक वेळा पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आले आहे.

मंगळवार, जून २०, २०२३

अभय हरणे महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प) म्हणून रुजू

अभय हरणे महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प) म्हणून रुजू



मुंबई :
वीज उत्पादन क्षेत्रात कुशल अभियंता म्हणून नावलौकिक असणारे अभय हरणे यांची नुकतेच महानिर्मितीच्या संचालक(प्रकल्प) पदी निवड झाली असून त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे.

अभय हरणे यांनी विद्युत अभियांत्रिकी पदविका, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी पदवी तर एम.बी.ए.(फायनान्स) चे शिक्षण पूर्ण केले आहे.

सन १९९३ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात "कनिष्ठ अभियंता" या पदी रुजू झाल्यानंतर मागील सुमारे तीन दशके त्यांनी परळी,चंद्रपूर(उप मुख्य अभियंता) भुसावळ-कोराडी-मुंबई येथे मुख्य अभियंता त्यानंतर नागपूर विभाग आणि मुख्यालय मुंबई येथे कार्यकारी संचालक तर नुकतेच त्यांच्याकडे संचालक(प्रकल्प) पदाचा अतिरिक्त प्रभार होता. वीज उत्पादन क्षेत्रातील विविध महत्वपूर्ण पदांवर काम करतांना आपल्या गुणवत्तापूर्ण कामांचा ठसा त्यांनी उमटवला आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने संचलन, नवीन संच स्थिरीकरण, देखभाल-दुरुस्ती, चाचणी उपकरण नियंत्रण, कार्यक्षमता वाढ, खनिकर्म, इंधन व्यवस्थापन, कोळसा हाताळणी विभाग, वीज नियामक आयोग विषयक निकष, बाबी आणि जागरूकता इत्यादींचा समावेश आहे. त्यांच्या कार्यकाळात कोराडी वीज केंद्राने १०० टक्के भारांक आणि वीज उत्पादनात सातत्यपूर्ण उच्चांक गाठला. गरेपालमा-२ कोळसा खाण पर्यावरण लोकसूनावणी यशस्वी करण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. तांत्रिक निपुणता, व्यवस्थापन- प्रशासनिक कौशल्य, दांडगा जनसंपर्क आणि सांघिक कार्यसंस्कृती त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत.

नवनवीन कल्पना, सर्वोत्तम कार्य पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पेपर प्रेझेंटेशन आणि मार्गदर्शनातून महानिर्मितीची प्रतिमा सुधारण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.

औष्णिक संचाच्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाच्या सर्वोत्तम पद्धतीसाठी जर्मनी येथे त्यांनी महानिर्मितीचे प्रतिनिधित्व केले. सन २०१३ मध्ये तत्कालीन महामहिम राज्यपाल महाराष्ट्र यांच्या हस्ते उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अभय हरणे यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचे अध्यक्षपद भूषविले आहे. स्थानिक माध्यमाने "खानदेश रत्न" म्हणून त्यांचा बहुमान केला आहे.

महानिर्मिती कोल पाईप कन्व्हेयर प्रणाली प्रकल्प, सौर-पवन-उदंचन प्रकल्प, भुसावळ आणि प्रस्तावित कोराडी बदली संच प्रकल्प, उरण क्षमता वाढ, एफ.जी.डी.सारख्या महत्वपूर्ण कामांची जबाबदारी त्यांचेकडे राहणार आहे.

स्पर्धेच्या युगात आणि वीज उत्पादनाच्या खडतर परिस्थितीत नवनवीन स्रोत, विकासाचे-उत्पन्नाचे मार्ग शोधणे, हॅप्पी स्ट्रीट सारखे लोक सहभागात्मक उपक्रम राबविणे, मनुष्यबळामध्ये समाधानाचा- आनंदाचा स्तर उंचावत त्यांच्याकडून सहजरित्या काम करून घेण्याची अचूक हातोटी त्यांच्या अंगी आहे. गायन, वाचन, संगीत आणि पर्यटनाचा विलक्षण छंद असून नेतृत्वगुण, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडाक्षेत्राची उत्तम जाण असलेले दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजे अभय हरणे.

शुक्रवार, जून ०९, २०२३

 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्या:आभा शुक्ला

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्या:आभा शुक्ला


विभागात 1034 मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष
नागपूर:
 मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना २.० मुळे कृषी पंपांना दिवसा नियमित व भरवशाचा वीज पुरवठा मिळणार असल्यामुळे सौरऊर्जा प्रकल्पासाठी शासकीय व खाजगी जमीन प्राधान्याने उपलब्ध होईल या दृष्टिने जिल्हास्तरावर कालबध्द कार्यक्रमाची अंमलबाजवणी करण्याच्या सूचना उर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी आज दिल्यात.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजनेचा आढावा प्रधान सचिव श्रीमती शुक्ला यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी तसेच नागपूर विभागाचे सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महावितरणचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपूर विभागातील या सहा जिल्ह्यात एकूण २७७ कृषिप्रवण वीज उपकेंद्रे आहेत. या सहा जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्पाचे लक्ष्य सुमारे १०३४ मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष असून त्यासाठी एकूण ५ हजार १७१ एकर जमीनीची आवश्यकता आहे. विभागात आतापर्यंत 299 विज उपकेंद्र परिसरात 3 हजार 541 एकर जागा उपलब्ध झाली असून उपकेंद्राच्या परिसरात खाजगी तसेच शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिल्या.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कृषी वाहीन्यांचे प्रत्येक जिल्ह्यातील 30 टक्के कृषी वाहीन्या या सौरऊर्जेवर आणण्याचे धोरण असल्यामुळे जिल्हाधिकारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे आवश्यक असणारी जमीन तातडिने उपलब्ध होईल या दृष्टिने विज उपकेंद्राच्या परिसरात जागेची उपलब्धता करताना समूह पध्दतीने (क्लष्टर) जागा उपलब्ध होत असेल तर प्राधान्य देण्यात यावे. नागपूर व गडचिरोली जिल्ह्यात या योजनेच्या प्रारंभिक अंमलबजावणीसाठी प्राधान्य आहे. त्यासोबतच भंडारा, गोंदीया, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यातही शासकीय जागा उपलब्ध नसल्यास इतर जागेचा शोध घ्यावा. असे निर्देश प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला यांनी दिल्यात.        
                                 
विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी गडचिरोली, भंडारा, गोंदीया, तसेच नागपूर जिल्ह्यात वनजमीन असल्यामूळे खाजगी शेतकऱ्यांकडून उपकेंद्राच्या परिसरात जास्तीत जास्त जागा उपलब्ध होईल या दृष्टिने नियोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात गायरान जमीनीच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना केली. विभागात 68 उपकेंद्र परिसरात 209 एकर जागेची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करावे असेही त्यांनी सांगितले.

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी उपकेंद्रापासून १० किलोमीटर पर्यंतची सरकारी जमीन तर ५ किलोमीटर पर्यंतच्या तसेच रस्त्यालगतच्या खासगी मालकीच्या जमिनीची महावितरणला आवश्यकता आहे. उपलब्ध जमिनीचे कल्स्टर तयार करण्याचे प्रस्तावित असून तसे केल्यामुळे विकासकाला सोयीचे होईल व योजनेला गती मिळेल, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून योजनेसाठी साठी जास्तीत-जास्त जमीन मिळवावी असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

बैठकीत नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर, वर्धेचे राहुल कर्डीले, गोंदियाचे चिन्मय गोतमारे ,भंडाऱ्याचे योगेश कुंभेजकर व चंद्रपूरचे विनय गौडा तसेच नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोम्या शर्मा, महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंते दिलीप दोडके, सुनील देशपांडे, पुष्पा चव्हाण बैठकीत उपस्थित होते. 

रविवार, जून ०४, २०२३

पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरण तर्फे आवाहन

पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरण तर्फे आवाहन

चंद्रपूर: 
कडक उन्हाळा सोसलेले सर्व पावसाळ्याची आतुरतेने वाट बघत आहेत. घामाच्या धारा सोसल्यानंतर आता पाऊस सरिंची वाट सर्वांनाच लागली आहे. तर अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरीही लावली आहे.अशावेळी आता येणाऱ्या अवकाळी पावसासोबत येणाऱ्या वादळ वाऱ्यामुळे, संभाव्य अपघात टाळण्यासाठी महावितरण खबरदारी घेण्याचे आवाहन सर्वाना करीत आहे. 

अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनील देशपांडे यांनी केले आहे .

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी 24 तास सुरु असणार्‍या कॉलसेंटर्सचे 1800-212-3435 किंवा 1800-233-3435, 19120, 1912 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे. वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना केवळ एकदाच ग्राहक क्रमांक सांगावा लागणार आहे. वीजग्राहकाने कॉल सेंटरमध्ये रजिस्टर्ड केलेल्या तीनपैकी कोणत्याही वैयक्तिक दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांकावरून तक्रार केल्यास फक्त तक्रारीचा तपशील सांगावा लागणार आहे. तसेच महावितरण च्या मंडळ स्तरावरील नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधता येईल. चंद्रपूर मंडलातील ग्राहकांनी 7875761195 व गडचिरोली मंडलातील ग्राहकांनी 7875009338 यावर संपर्क साधावा.

अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करण्यात येतो. अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशी घ्यावी लागेल खबरदारी  
पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. तसेच ईएलसीबी वापरावे. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.

 विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणार्‍या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. याशिवाय विजेच्या खाबांना जनावरे बांधू नयेत, त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे

मंगळवार, एप्रिल २५, २०२३

 महानिर्मिती कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता परीक्षा २६ ते २८ एप्रिल रोजी

महानिर्मिती कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता परीक्षा २६ ते २८ एप्रिल रोजी

६६१ जागांकरिता ८०४३५ उमेदवार
राज्यभरात ११८ केंद्रांवर परीक्षा
परीक्षेसंबंधी माहिती महानिर्मिती संकेतस्थळावर
नागपूर:
महानिर्मिती जाहिरात क्र.१०/२०२२ व अधिसूचना ३६७१ दिनांक २१ एप्रिल २०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता या पदांच्या सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने सदर पदांची ऑनलाईन परीक्षा २६ ते २८ , एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्र, ठिकाण, तारीख, वेळ इत्यादी तपशीलवार माहिती, महानिर्मितीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, याची संबंधित सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

एकूण ६६१ जागांकरिता ८०४३५ उमेदवारांनी अर्ज केला असून राज्यभरातील ११८ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.सहाय्यक अभियंता जागा ३३९, एकूण अर्ज प्राप्त ४३३४५. कनिष्ठ अभियंता जागा एकूण ३२२, एकूण प्राप्त अर्ज ३७०९०. एकूण अर्ज ८०४३५ आले असून २६ एप्रिल ला ६३ केंद्रे, २७ एप्रिल ला ११८ केंद्रे, २८ एप्रिल ला २८ केंद्रांवर ही परिक्षा घेण्यात येणार आहे. २६ एप्रिलला दोन सत्रांमध्ये, २७ एप्रिल ला तीन सत्रांमध्ये तर २८ एप्रिल ला एका सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे.

उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर एस.एम.एस. देखील पाठविण्यात आले आहे. परिक्षेसंदर्भात काही अडचण निर्माण झाल्यास अधिक माहितीकरिता ०२२- ६९४३५०००, agmhrrc@ mahagenco.in तसेच आय.बी.पी.एस. हेल्प डेस्क नंबर 18001034566 यावर संपर्क साधावा.

महानिर्मितीची भरती प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारावर पारदर्शकपणे केली जाते. उमेदवारांनी त्यांना कोणीही व्यक्ती, नोकरी मिळवून देतो असे आश्वासन देत असल्यास त्यांच्या भूलथापांना किंवा आमिषाला बळी पडू नये, कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आणून दिल्यास महानिर्मितीतर्फे तातडीने उचित कारवाई करण्यात येईल असे महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) डॉ.धनंजय सावळकर यांनी कळविले आहे. 

गुरुवार, मार्च ०२, २०२३

लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ४ मार्चला लाईनमन दिवस

लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ४ मार्चला लाईनमन दिवस

चंद्रपूर :
देशभरातील लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र शासनाने येत्या दि. ४ मार्च २०२३ रोजी देशभरात लाईनमन दिवस साजरा करणेबाबत सर्व सार्वजनिक व खासगी विद्युत क्षेत्रातील आस्थापनांना सुचना केल्या आहेत. त्याअनुषंगाने येत्या ४ मार्च रोजी महावितरणमध्ये सर्वत्र लाईनमन दिवस साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे चंद्रपूर परिमंडळात आयोजन करण्यात आले आहे.

जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच इतरही अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ते चोवीस तास सेवादेतात. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महावितरणच्या राज्यभरातील प्रादेशिक व परिमंडलस्तरावर आयोजित मुख्य कार्यक्रमांमध्ये नियमित व बाह्यस्त्रोत महिला व पुरुष लाईनमनचा प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंता यांच्याहस्ते गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय ग्रामीण भागात विभाग कार्यालयाचे कार्यक्षेत्र विस्तारलेले व दुर्गम आहे अशा विभागांतील उपविभाग कार्यालय किंवा अतिदुर्गम शाखा कार्यालयांमध्ये स्वतंत्रपणे लाईनमन दिवसाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना वीजसुरक्षेची शपथ देऊन वीजसुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येईल. सोबतच सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता आदी कार्यालय प्रमुख या कार्यक्रमास मार्गदर्शन करतील. शिवाय महिला व पुरुष लाईनमन यांचे अनुभव कथन होऊन त्यात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

बल्लारपूर रोड वरील बाबुपेठ कार्यालयात, सकाळी ११ वाजता मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. तसेच सर्वच ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये वीजसुरक्षेची शपथ, वीजसुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. राज्यात विविध स्तरावर ४ मार्च रोजी होणाऱ्या या लाईनमन दिवस कार्यक्रमास नियमित व बाहयस्त्रोत अशा सर्व महिला व पुरुष जनमित्रांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.


चंद्रपूर परिमंडळात ,‘लाईनमन ’ म्हणजेच प्रकाशदुत किंवा जनेतचा मित्र ‘जनमित्रांनी ’ चंद्रपूर व गडचिरेालीसारखा दुर्गम प्रदेश, जंगल, दऱ्या खोरे, पहाडावर काम कधी वादळ कधी वारा, पूरपाऊस तर कधी कडयाक्याची थंडी. हे सर्व ऋतू एक प्रकारे महावितरणच्या कर्मचाऱ्याची परिक्षा पहात असतात. गडचिरेाली सारख्या दुर्गम जंगली भागात शकडो किमी वीजवाहिनीची देखभाल दुरूस्ती, तर कधी पावसात, नदी नाल्यातून गेलेल्या वीजवाहिण्या, इंसुलेटर्सची दुरूस्ती वीजग्राहकांचा वीजपुरवठा लवकरात लवकर दुरूस्त होणे हे एकमेव ध्येयाने वीजेरी, डिसचार्ज रॅाड, वितळतार इ. इत्यादी साधने घेवून , चंद्रपूर वाघांचे नंदनवन, अशा या वाघासारखे हिंस्त्र प्राण्याच्या सानिध्यात रात्री अपरात्री वीजपुरवठा सुरळीत केला आहे.

भर उन्हात दुपारी ११ वा १२ ची वेळ किंवा संध्याकाळ, रात्र केव्हाही वीज पुरवठा खंडीत झाल्याची तक्रार सोडविण्यासाठी लाईनमन आपली, कवच कुंडले, रबराचेहातमोजे, डिस्चार्ज रॉड, हारनेस, झुला घेवून वीजेच्या खांबावर रोहित्रांवर काम उन्हाच्या चटक्याची पर्वा न करता, मार्च, एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधित महावितरणच्या प्रकाशदुतांनी तांत्रिकस्वरूपाच्या ४३ हजार ३३४ तक्रारी भर उन्हातान्हात, रात्रीच्या उकाडयात, कडाक्याच्य थंडीत व पावसात, जंगलात वाघ अस्वले तथा वण्यप्राण्यांच्या सानिध्यात सोडवल्या आहेत.

 चंद्रपूर वीज केंद्र पॅट सायकल-२ करीता राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

चंद्रपूर वीज केंद्र पॅट सायकल-२ करीता राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने विविध ऊर्जा संवर्धनाच्या प्रयोगानंतर नेट युनिट उष्णता दर २५९८.१ किलोकॅलरी/केडब्ल्यूएच साध्य केले

चंद्रपूर २ मार्च २०२३ :
२९२० मेगावाट स्थापित क्षमता असलेले चंद्रपूर महाऔष्णिक विदयुत निर्मिती केंद्राचा वीज उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीचा नावलौकिक आहे. महाराष्ट्राला नियमित आणि स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मोठे योगदान आहे.

कामगिरी व कार्यक्षमता सातत्याने उत्कृष्ट ठेवण्यासाठी चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राने पॅट सायकल -२ मधे वाढीव यश मिळविले आहे. पॅट (PAT) ही नॅशनल मिशन फॉर इनहान्स्ड एनर्जी National Mission for Enhanced Energy Efficiency (NMEEE) अंतर्गत बाजारपेठेवर आधारीत यंत्रणा आहे ज्यात व्यापार करता येणाऱ्या ऊर्जा बचतीच्या प्रमाणाद्वारे ऊर्जेची बचत अधिक खर्च प्रभावी बनवते. पर्यावरणपूरक जीवन ही संकल्पना या आयोजनामागची आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने विविध ऊर्जा संवर्धनाच्या प्रयोगानंतर नेट युनिट उष्णता दर २५९८.१ किलोकॅलरी/केडब्ल्यूएच साध्य केले व लक्षित नेट युनिट उष्णता दरात १३९.४९ किलोकॅलरी/केडब्ल्यूएच ने कमी करण्यात यश संपादन केले. सदर यशामुळे पर्यावरणाचा ऱ्हास/हानी कमी होण्यास हातभार लागला आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राकडे सकारात्मक ESCerts ची संख्या १८८८९५ आहे, अंदाजे त्याची किंमत ३४.७६ कोटी रुपये आहे. देशात एकूण सर्व नियुक्त ग्राहकांना (designated consumers) मिळालेल्या ESCerts पैकी १० टक्के वाटा हा निव्वळ चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राचा आहे.

Bureau of Energy Efficiency च्या स्थापना दिनी म्हणजेच १ मार्च रोजी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. PAT-२ अंतर्गत १५४ राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्रामध्ये देशातील सर्वाधिक ESCerts मिळवत चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रथम असल्यामुळे सदर कार्यक्रमात चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राचा यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी आर. के. सिंग, मंत्री (ऊर्जा, नवीन व नविकरणीय ऊर्जा)भारत सरकार यांचे हस्ते चंद्रपूर वीज केंद्राला सन्मानित करण्यात आले. महानिर्मितीचे कार्यकारी संचालक पंकज सपाटे यांनी हा सन्मान नवी दिल्ली येथे स्वीकारला. याप्रसंगी भारत सरकारचे आलोक कुमार, सचिव, ऊर्जा मंत्रालय, आशिष उपाध्याय, अतिरिक्त सचिव ऊर्जा मंत्रालय, अजय तिवारी, BEE चे महासंचालक अभय भाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन, संचालक (संचलन) संजय मारुडकर यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले तसेच चंद्रपूर वीज केंद्रात कार्यरत अधिकारी,अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी यांचे कामाप्रति असलेले समर्पण आणि उत्स्फूर्त सहभागाचा हा परिपाक असल्याचे कार्यकारी संचालक पंकज सपाटे यांनी सांगितले. त्यांनी चंद्रपूर वीज केंद्राच्या संबंधित सर्वाचे विशेष अभिनंदन केले आहे.