pay online bill
नागपूर :
वीजबिलात मिळणारी सवलत आणि रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल ऑनलाइन भरण्यास प्राधान्य मिळत आहे. जुलै महिन्यात महावितरणच्या नागपूर परिमंडलातील 5 लाख 95 हजार 173 ग्राहकांनी 216 कोटी 7 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे.
महावितरणने वेबसाईटवर ऑनलाइन बिल पेमेंट सुविधेसह मोबाइल ॲप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहण्यासाठी व भरण्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाइल वॉलेट व कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध आहे. महावितरणच्या आवाहनास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांचे बिल भरणा केंद्रासमोरील रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत आहे.जुलै महिन्यात नागपूर शहर मंडलात 4 लाख 6 हजार 605 ग्राहकांनी 163 कोटी 60 लाख, नागपूर ग्रामीण मंडलात 1 लाख 6 हजार 419 ग्राहकांनी 30 कोटी 70 लाख तर वर्धा मंडलात 82 हजार 149 ग्राहकांनी 21 कोटी 77 लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाइन भरले आहे.
बिलात 0.25 टक्के सूट - ग्राहकांना वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट सुलभतेने करता यावे व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रेडिट कार्ड वगळता नेट बॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास महावितरणने ग्राहकांना ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन पेमेंट केल्यास वीजबिलात 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सवलत मिळते.
तत्काळ मिळते पोच - वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट केल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच वेबसाईटवर ‘पेमेंट हिस्ट्री’ तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाइन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.‘गो-ग्रीन’द्वारे वर्षाला 120 रुपये वाचवा - महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल ऑनलाइन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा 10 रुपये सूट मिळते.
ऑनलाईन वीजबिल भरण्याचे फायदे - ऑनलाईन वीजबिल भरण्याचे अनेक फायदे आहेत. इथे वेळेसोबत इंधनाची देखील बचत होते. संकेतस्थळ, मोबाईल ॲप, युपीआय यापर्यायाद्वारे एका क्लिकवर ग्राहकाला वीज बील भरता येते. वीजबिल तयार झाल्यापासून पहिल्या सात दिवसांत वीजबिल भरले तर जवळपास 1 टक्का सूट मिळते. याशिवाय ऑनलाईन भरल्यामुळे अतिरिक्त पाव टक्का असे मिळून सव्वा टक्क्यांची बचत करता येते.