*लाखो रुपये खर्चूनही शेत कोरडेच*
*विनोद चौधरी*
*प्रतिनिधी ब्रम्हपुरी* : तालुक्यात गेल्या तीन ते चार वर्षांत महावितरणकडे कृषी वीज पंपाकरीता विद्युत पुरवठ्यासाठी ४७७ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहे. २७२शेतकऱ्यांनी डिमांडचे पैसे भरल्यानंतरही कृषि पंपासाठी प्रत्यक्ष वीज जोडणी करण्यात महावितरणकडून विलंब होत आहे. तर विद्युत पुरवठ्यासाठी अर्ज केल्यापैकी २०५ शेतकऱ्यांचे डिमांड निघूनही अद्याप अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले नाही . शेती व्यवसायातून आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याकरिता तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी विविध योजनांमधून शेतात सिंचनाकरिता विहिरी खोदलेल्या आहेत. काहींनी पदरचा पैसा लावून तर काहींनी उसनवार करून शेतात विहिरी खोदलेल्या आहेत. मात्र वीज जोडणी अभावी लाखो रुपये खर्चूनही शेत जमीन कोरडी असल्याने शेतकरी अधिक उत्पन्न घेण्यापासून वंचित आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर आर्थिक ओझं वाढू लागला आहे.यामुळे शेतकरी चिंतातून झालेला दिसून येत आहे. विज जोडणी करिता गेल्या तीन चार वर्षापासून महावितरणच्या हेलपाट्या शेतकरी वर्ग मारताना दिसून येत आहेत .
*सौर कृषी पंप योजनामुळे विज जोडणीला लागले ग्रहण*
महावितरण कडे कृषी पंपाकरिता विज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज केले. अशातच शासनाने सौर कृषी पंप योजना अमलात आणल्यामुळे महावितरण कडून सौर पंपाकरिता प्रथम प्राधान्य दिले गेले . डिमांड भरलेल्याना विज जोडणी बंद झालेली असून सौर पॅनल चा वापर करा असा नोटीस महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून बजावण्यात आल्या . याला काहींनी प्रतिसाद दिला तर अनेकांनी विरोध केल्याने अनेक विज जोडणी अजूनही रखडली आहेत. शासनाने सौर कृषी पंप योजनेवर अधिक भर दिल्याने विद्युत कनेक्शन थांबविण्यात आले. शेतकरी अजूनही विद्युत जोडणी व सौर पंपाच्या प्रतीक्षेतच आहेत.
*वीज जोडणी अभावी अनेक शेतकरी कृषी योजनांपासून वंचित*
शेतीला संरक्षित सिंचनाची जोड देऊन उत्पादकतेत वाढ होण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत व कृषि विभगामार्फत विविध योजना शासन राबवित आहे. मात्र अनेक ठिकाणी डिमांड भरूनही वीज जोडणी झाली नसल्याने शेतात सिंचनाची सुविधा झाली .नाही यामुळे शेतकरी कृषी विभागाच्या विविध योजनांकरिता अर्ज करू शकत नसल्याने अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.
*महावितरणच्या कर्मचाऱ्यांना या संकटाचा करावा लागतो सामना*
कृषी पंपाकरिता वीज जोडणी मंजूर असलेले ठिकाण हे गावाबाहेर, शेतामध्ये दूरवर असल्याने विहिरींकरिता कनेक्शन देताना अनेक अडचणी येत आहेत. कृषी पंपाला वीज कनेक्शन देण्यासाठी विद्युत खांब आधी उभे करावे लागतात. अनेकांच्या शेतात उभे पीक असल्याने विजेचे खांब उभारणे, तार जोडणे, ट्रान्सफॉर्मर बसवणे ही कामे करता येत नाही. मंजूर असलेल्या ठिकाणी वीज जोडणी होत नाही.
*शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष*
वीज जोडणीचे काम होत नसल्याने शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली आहे मात्र त्याचा काहीच फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याने लोकप्रतिनिधीनींही शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.