Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी ०६, २०२२

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आ. मुनगंटीवार यांनी लिहले आरोग्य मंत्र्यांना पत्र @smungantiwar

कोरोनापासून बचाव करण्यासाठी राज्याचे माजी वित्तमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चाचणी, जनजागरण आणि लसीकरण ही त्रीसुत्री राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सुचविली आहे. यासंदर्भात लिहिलेल्या एका पत्रातून विविध उपाययोजना करण्यासंदर्भात त्यांनी आरोग्य मंत्र्यांना सुचविले आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादर्भाव रोखण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्याबाबत आ. मुनगंटीवार यांनी पत्रातून सूचित केल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढलीच तर वेळेवर धावपळ न करता आधीच उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी प्रामुख्याने चाचणी, जनजागरण आणि लसीकरण या त्रीसुत्रीच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याची गरज असल्याचे मत आ. मुनगंटीवार यांनी या पत्रातून मांडले आहे. रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळाली पाहिजे. लवकरात लवकर ऑक्सीजन बेड, आय. सी. यु. बेड, व्हेंटीलेटर बेड उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हास्तरावर योग्य नियोजन आधीच केले पाहिजे. जिल्ह्यातील सभागृहांची, हॉटेल्सची यादी तयार करून त्यामध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा आधीच तयार करून ती ठिकाणे रुग्णांसाठी सुसज्ज करण्याची आवश्यकता असल्याचे पत्रात म्हटले आहे. रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना टोल फ्री नंबरच्या माध्यमातून आवश्यक ती माहिती त्वरित मिळाली पाहिजे याची व्यवस्था यंत्रणेकडून लवकरात लवकर झाली पाहिजे. रुग्णांना नेमके कोणत्या दवाखान्यात उपचारार्थ दाखल व्हायचे आहे यासाठी बेड मॉनीटरींग सिस्टीम सॉफ्टवेअर तयार करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यामध्ये सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, किंवा जिल्हा रुग्णालय असेल येथील सर्व रिक्त पदांचा आढावा घेऊन ती पदे भरण्यासाठी पाठपुरावा करावा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पदे तातडीने भरावीत. प्रामुख्याने डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आदींच्या जागा तातडीने भराव्यात, असेही आ. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांना इंजेक्शन्स उपलब्ध होत नाहीत, यादृष्टीने नियोजन केले पाहिजे. रुग्णांना आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट २४ तासांच्या आत मिळालाच पाहिजे अशी व्यवस्था करण्याची गरज आहे. कोरोनाबाबत नागरिकांच्या मनात भिती निर्माण होऊ नये यासाठी योग्य जनजागृती करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीच्या स्तरावर आशावर्कर कडे व ग्रामपंचायतीकडे एक आॅक्सीमिटर, एक थरमामिटर व जनजागरणाचा एक फलक देण्याची आवश्यकता आहे. तसेच सोबत एक माहिती पत्रक देण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने योग्य नियोजन करण्यात यावे. प्रत्येक ग्रामपंचायतीला वरील प्रयोजनासाठी विकास निधीच्या माध्यमातून २ हजार लोकसंख्येच्या आत १ लाख व २ हजार ते ५ हजार लोकसंख्येसाठी ५ लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे. रुग्णवाहीके संदर्भात जिल्हा स्तरावर एक डिरेक्टरी करून, कोवीड ची एक वेबसाईडट तयार करून, व्हाट्स अ‍ॅप नंबर उपलब्ध करत तसेच उपलब्ध बेडची माहिती मिळू शकेल, रुग्णवाहिका सहज उपलब्ध होईल यासाठी संबंधितांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून सहज बेडस व रूग्णवाहीका उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. जे लोक घरात क्वॉरंटाईन होतात त्यांनी कोणती काळजी घेतली पाहीजे यासाठी मार्गदर्शन करावे तसेच घरातील व्यक्तींना काय काळजी घेतली पाहीजे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एक ई-बुक, डिजीटल बुक तयार केले पाहिजे. मृत्यू संख्या वाढत असताना एकाच स्मशानभूमीमध्ये कोविड रुग्ण किंवा नॉन कोविड रुग्ण यांचा दहनविधी करणे धोक्याचे आहे. यासाठी प्रत्येक तालुकास्तरावरील स्मशानभूमीत योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे. कोवीडच्या या संकटाची तीव्रता असताना हार्टअटॅक, ब्रेन हॅमरेज, पॅरालीसीस, टीबी, कॅन्सर किंवा किडनी आजार असलेल्या डायलीसीस उपचार घेणा-या रुग्णांवर दुर्लक्ष होता कामा नये, यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने व आरोग्य यंत्रणेने योग्य काळजी घेतली पाहिजे. लसीकरणा संदर्भात जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण सहज होईल व ४५ वर्षे पर्यंत वयाच्या नागरिकांना लसीकरणाचा लाभ घेता येईल, यादृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. औषधांची विशेषत: टॅबलेटची उपलब्धता हा महत्वाचा विषय असून कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता औषधांचा साठा करता येईल का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. सर्व सार्वजनिक जागेवर सॅनिटायझर मशिन लावल्या पाहिजे. टेस्टींग करीत असताना एकाच ठिकाणी पॉझीटीव्ह व निगेटीव्ह असे दोन्ही प्रकारचे व्यक्ती एकत्र येत असतात. सुरक्षित अंतर ठेवून आर.टी.पी.सी.आर. व अ‍ॅन्टीजेन टेस्टींग करताना योग्य सुविधा उपलब्ध करत अंतर राखून टेस्टीग करण्याची व्यवस्था काटेकोरपणे राबविण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर मध्ये सि. टी. स्कॅन मशिन दिवसा नॉन कोविड पेशंट साठी व रात्री कोविड पेशंटसाठी वापरल्या जाते. कोविडचे संकट किती वर्षे, किती महिने राहील हे सांगता येत नसल्याने आपल्याला सिटी स्कॉन चालविणारे तज्ज्ञ नियुक्त करण्याची आवश्यकता आहे. वेकोलिच्या सि.एम.डी. सोबत एक बैठक घेऊन वेकोलिकडे उपलब्ध असलेल्या सर्व आरोग्य सुविधा या संकट काळात आपल्याला वापरता येतील का, यादृष्टीने योग्य नियोजन व उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात छोट्या घरामध्ये राहणाºया रुग्णांना एकच शौचालय असल्यामुळे अडचण निर्माण होते. त्यामुळे २ हजारांच्या वर लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात होम आयसोलेशनच्या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्यासाठी योग्य विचार करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागामध्ये टेस्टींग संदर्भात जनतेच्या मनातील संशय व संभ्रमावस्था दूर करण्याच्या दृष्टीने योग्य जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. बल्लारपूर तालुक्यातील मानोरा आणि कळमना येथे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधून तयार आहे. ही प्राथमिक आरोग्य केंद्रे तातडीने सुरू करून त्यामाध्यमातून आरोग्य सेवा देण्याची व्यवस्था करता येऊ शकते. आरटीपीसीआर सेंटर सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्यासाठी योग्य व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. मास्क न लावलेल्या व्यक्तींवर दंडाची आकारणी करून त्यातून त्याला मास्क उपलब्ध करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून शृंखला तयार करून बचत गटांना काम मिळेल, अशा दृष्टीने योग्य योजना आखता येईल, याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे. आरोग्य यंत्रणेतील कोरोना योध्दे अधिकारी व कर्मचाºयांना कोरोना झाल्यास त्यांच्या योग्य काळजीची व्यवस्था करावी तसेच त्यांच्या जागी इतर कर्मचाºयांची व्यवस्था करावी. गर्दीच्या ठिकाणी पोलीसांची नियुक्ती करून मास्क न लावणाºयांवर दंडात्मक कारवाई करावी. सर्व सरकारी कार्यालयामध्ये जंतुनाशक फवारणी करण्याच्या दृष्टीने विचार करावा. चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अपग्रेडेशनचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाने तयार केला आहे. त्याला मंजुरी देत निधी उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ११ तालुके मानव विकास अंतर्गत येतात. त्यामुळे प्रत्येकी १ कोटी निधी या तालुक्यांना उपलब्ध करणे गरजेचे आहे. मेडिकल वेस्ट डिस्पोजलची योग्य व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. आॅक्सीजन, रेमडेसिवीर यांचा पुरवठा योग्य व्हावा व त्याची टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आशावर्कर व अंगणवाडी सेविका व कोरोना योध्दा म्हणून काम करणारे सर्व डॉक्टर्स, अधिपरिचारीका यांना या संकटामध्ये दुप्पट पगार देण्याच्या दृष्टीने सुध्दा विचार व्हावा असेही आ. मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रातून सूचित केले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातुन पगार होईलच पण खनिज विकास निधीतून त्यांना प्रोत्साहन म्हणून एक बोनस पगार देण्याची आवश्यकता आहे. सर्व तालुक्यांमध्ये संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. त्याठिकाणच्या पंचायत समिती, तहसिल कार्यालय, नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरण करण्याची आवश्यकता आहे. हे करताना भोजनाची व्यवस्था उत्तम दर्जाची असावी याचीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी सुचविण्यात आलेल्या या सर्व उपाययोजनांकडे आरोग्य मंत्री टोपे यांनी जातीने लक्ष देऊन संबंधित यंत्रणेला तशा सूचना द्याव्या, असे आ. मुनगंटीवार यांनी या पत्रात म्हटले आहे




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.