Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून २६, २०१०

स्मशानभूमीच्या वाटेवरही मरणयातना

सकाळ वृत्तसेवा

Friday, June 25, 2010 AT 01:00 AM (IST)

Tags: crematorium, smashan, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - जीवनाचा अंतिम श्‍वास घेतल्यानंतर स्मशानभूमीकडे प्रवास सुरू होतो. या प्रवासात आप्त, सगेसोयरे आणि मित्रमंडळींची रांग असते. आत्म्याला शांती लाभावी म्हणून दोन मिनिटे मौन पाळून ईश्‍वराकडे याचना केली जाते. मात्र, कायमचे डोळे मिटून जगाचा निरोप घेतलेल्या मृतदेहाला स्मशानभूमीच्या वाटेवरून नेताना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांतील स्मशानभूमी दूरवर असून, जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. टिनांचे शेड किंवा चिताग्नीसाठी व्यवस्थाच नसल्याने मोठी गैरसोय होऊ लागली आहे.
चंद्रपूर शहरात दाताळा मार्गावरील इरई नदीच्या तीरावर मृतदेह जाळले जातात. या ठिकाणी कशाचीच व्यवस्था नाही. नगरपालिकेकडे स्मशानभूमीच्या विकासासाठी दरवर्षी दहा ते बारा लाखांचा निधी असतो. मात्र, हा निधी नेमका कुठे जातो, हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे. बिनबा गेटबाहेर इरई नदीच्या तीरावर शांतिधाम ट्रस्टच्या वतीने स्मशानभूमी बांधण्यात आली. शहरात ही एकमेव स्मशानभूमी चांगल्या अवस्थेत आहे. मात्र, याही ठिकाणी आता निधीअभावी अडचणी निर्माण झाल्या आहेत. या ठिकाणी शेडची आवश्‍यकता आहे. ट्रस्टकडे पैसे नाहीत. 2006 ला आलेल्या पुरात नदीकाठावरचा सिंमेटने बांधलेला घाट वाहून गेला. तोही तशाच स्थितीत आहे.
हिंदू धर्मीयांमध्ये मृतदेहाची राख नदीत विसर्जित करण्याची प्रथा आहे. त्यामुळे बहुतांश स्मशानभूमी या गावाच्या बाहेर नदी, नाल्याच्या काठावर आहेत. गाव तिथे स्मशानभूमी असतेच. त्यामुळे स्मशानभूमीच्या विकासासाठी शासनाने धोरण आखले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. सोबतच स्मशानभूमीत टिनांचे शेड असावे, पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप असावे, यासाठीही निधीची तरतूद आहे. काही ठिकाणी रस्त्याचे बांधकाम झाले. मात्र, ते निकृष्ट दर्जाचे असल्याने वर्षभरात उखडले. ज्या ठिकाणी हातपंप बांधण्यात आले, तिथे आता पाणीच नाही. शेडच्या टिना चोरीला गेल्या आहेत. ही परिस्थिती बहुतांश तालुक्‍यांच्या स्थळी आणि मोठ्या गावांत आहे. मात्र, या महत्त्वाच्या प्रश्‍नाचे कुणालाच गांभीर्य नाही. परिणामी पावसाळ्यात स्मशानभूमीपर्यंत मृतदेह नेताना मृताच्या नातेवाइकांना अक्षरश: मरणयातना भोगाव्या लागतात. शेडच नसल्याने मृतदेह जाळण्यासाठीही अडचणी निर्माण होतात.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.